रोज रात्री सकाळी लवकर उठू या निर्धारानं झोपणारे आणि ठरवूनही सकाळी लवकर उठण्याचा (waking up early) कंटाळा करणारे अनेकजण आहेत. मग उशिरा उठल्यानं कामांना होणारा उशिर, घाईगर्दी, त्यातून होणारी चिडचिड हे सगळं मग झोपेपर्यंत सुरुच राहातं. पुन्हा झोपताना लवकर उठण्याचा निर्धार आणि पुन्हा उठायला उशीर हे चक्र न संपणारं होतं. हे चक्र जर भेदायचं असेल तर लवकर उठण्याचा केवळ निर्धार करुन चालणार नाही. तर त्यासाठी लवकर उठण्याची काहीतरी प्रेरणा मिळायला हवी. समजा कोणी तुम्हाला पहाटे 5 वाजता उठण्याचे 5 चांगले परिणाम (benefits of waking up at 5 am) सांगितले तर हीच कारणं तुम्हाला लवकर ऊठण्यासाठी नक्कीच प्रेरित करतील.
Image: Google
पहाटे 5 वाजता उठल्यास..
1. तज्ज्ञ सांगतात पहाटे 5 वाजता उठल्यास संपूर्ण दिवस शरीर आणि मनाची ऊर्जा टिकून राहाते. यामागचं कारण म्हणजे सकाळी उठायला जर उशीर झाला तर व्यायामाला बुट्टी मारली जाते. पण तेच सकाळी लवकर उठल्यास शांततेत व्यायाम करण्यास पुरेसा वेळ मिळतो. व्यायाम चांगला झाला की शरीराल आणि मनालाही ऊर्जा मिळते.
2. पहाटे लवकर उठल्यास काम करण्याची ऊर्जा वाढते. सकाळच्या वेळेत कामं भराभर पूर्ण होतात. कारण सकाळी लक्ष विचलित करणारे घटक कमी असतात. सकाळच्या वेळेत कामं पटकन झाली तर पुढची कामं करायला पुरेसा वेळ मिळतो. पहाटे लवकर उठल्यानं ठरवलेली कामं वेळेत संपतात. वेळ पुरला नाही म्हणून साचून राहाणाऱ्या कामांची यादी कमी होते.
Image: Google
3. पहाटे लवकर उठण्याचा परिणाम मनावरही होतो. आपली इच्छाशक्ती वाढते. या इच्छाशक्तीच्या मध्ये अडसर येणाऱ्या गोष्टींना टाळणं जमतं. इंद्रियांच्या प्रलोभनांवर सहज विजय मिळवता येतो. दिवसभर फसवी भूक कमी लागते. काम करताना लक्ष विचलित होत नाही. अनुत्पादक गोष्टीत वेळ कमी जातो आणि दिवस सार्थकी लागल्याची भावना, समाधान मिळाल्याची भावना निर्माण होते.
4. उशीरा उठल्यानं होणारी कामांची गर्दी, घाई घाई यामुळे होणारी चिडचिड यातून मनात नकारात्मक भावना, विचार तयार होतात. ज्या गोष्टी सहज जमू शकतात त्यावरही वेळ नाही, जमणार नाही, माझ्यासाठी अमूक अशक्य, तमूक अवघड म्हणून फुल्या मारल्या जातात. पण पहाटे लवकर उठल्यास कामं शांतपणे आटोपायला वेळ मिळतो. यातून कामं पार पडण्यानं सकारात्मकता वाढते. आणि अवघड गोष्टी करुन पाहाण्यास मन धजावत, त्या गोष्टी करुन पाहातं. यामुळे मनाची उमेद आणि ताकद वाढते.
5. पहाटेची शांत वेळ मन एकाग्र करण्यासाठी उत्तम वेळ असते. दिवसभराच्या धावपळीत शांत बसून मना एकाग्र करायला, ध्यानधारणा करायला उसंत मिळत नाही ती पहाटे लवकर उठल्यास मिळते. ध्यानधारणा केल्यानं मनाची ताकद वाढते. यातून काम करण्यास सकारात्मक ऊर्जा मिळते. मनाची आणि शरीराची ताकद वाढवणारे, दिवस सार्थकी लावणारे, मनाला समाधान देणारे हे परिणाम वाचून तुम्हालाही नक्कीच पहाटे 5 वाजता उठण्याची प्रेरणा मिळेल. मग ठरवताय ना पहाटे लवकर उठायचं!