उन्हाळ्याच्या दिवसांत डोक्यावर ऊन तापत असताना आपल्याला सतत पाणीदार आणि गारेगार काहीतरी खावसं किंवा प्यावसं वाटतं. याचवेळी बाजारात द्राक्षं, कलिंगड, खरबूज, अननस अशी फळं येतात. उन्हाने शरीराची होणारी लाहीलाही कमी करण्यासाठी आणि शरीरातील पाण्याची पातळी उत्तम राखण्यासाठी आहारात या फळांचा आवर्जून समावेश करायला हवा. कलिंगड रवाळ आणि गोड असेल तर ठिक, पण हे कलिंगड बेचव असेल तर मात्र आपल्याला ते खाण्याची अजिबात इच्छा होत नाही. मनाची आणि शरीराची तहान शमवणारे हे कलिंगड उन्हाळ्यात का खायला हवे याविषयी (Benefits Of Watermelon)...
१. कलिंगड हे पाणीदार फळ असल्याने उन्हाळ्याच्या दिवसांत होणारे डिहायड्रेशन कमी करण्याचे काम या फळामुळे होते. चवीला गोड असलेले कलिंगड खाऊन उन्हामुळे आलेली मरगळ निघून जाण्यास मदत होते. त्यामुळे कार्यक्षमतेत वाढ होण्यास मदत होते.
२. कलिंगडमध्ये अँटिऑक्सिडेंट्स, जीवनसत्त्वे बी, सी आणि डी मोठ्या प्रमाणात आढळतात. उन्हाळ्यात शरीराची लाहीलाही होत असल्याने पुरेसे अन्न खाल्ले जात नाही. सतत पाणी, सरबत, ज्यूस या गोष्टी घ्याव्याशा वाटतात. अशात कलिंगड खाल्ल्यास शरीराला आवश्यक असणारी जीवनसत्त्वे मिळण्याचे काम कलिंगडाच्यामार्फत होते. त्यामुळे शरीराचे पोषण करण्याचे काम कलिंगड करते.
३. कलिंगड खाल्ल्याने गॅसेस, बद्धकोष्ठता या तक्रारी दूर होण्यास मदत होते. हल्ली जीवनशैलीतील बदलामुळे पचनाशी निगडीत तक्रारींचे प्रमाण वाढले आहे. मात्र कलिंगडामुळे या तक्रारी दूर होतात. असे असले तरी आवडते म्हणून किंवा उन्हाचा त्रास होतो म्हणून प्रमाणापेक्षा जास्त कलिंगड खाल्ल्यास पोट खराब होण्याचीही शक्यता असते.
४. कडक उन्हात फिरल्याने अनेकांना ग्लानी येणे किंवा डोळ्यासमोर अंधारी येणे असे त्रास होतात. अशावेळी कलिंगड खाल्लेले असल्यास या त्रासांचे प्रमाण कमी होऊ शकते. त्यामुळे घरातून बाहेर पडताना कलिंगड खाल्लेले चांगले. पण कडक उन्हातून आल्या आल्या कलिंगड खाऊ नये, त्यामुळे त्रास होऊ शकतो.
५. कलिंगड नाश्ता झाल्यावर, दुपारच्या वेळी किंवा संध्याकाळीही शरीराची लाहीलाही होत असताना खावे. सकाळी उठल्यावर उपाशी पोटी कलिंगड खाल्ल्यास त्याचाही शरीराला त्रास होऊ शकतो. कलिंगडामुळे रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते. तसेच कोलेस्टेरॉल नियंत्रणात राहण्यासाठी आणि हृदयाचे कार्य सुरळीत चालण्यासाठीही कलिंगड खाणे अतिशय फायदेशीर असते.