Join us   

डाेकेदुखी-गळणारे केस-त्वचेचे आजार यावर १ सोपा उपाय, तज्ज्ञ सांगतात-रोज ५ मिनिटं आणि..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2023 9:56 AM

Best Ayurvedic Remedy For Health Issues : आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. दिक्षा भावसार यासाठी एक अतिशय सोपी उपचारपद्धती सांगतात.

आपण रोज इतके धावत राहतो की अनेकदा आपल्याला खूप ताण होतो किंवा विशिष्ट गोष्टींवर फोकस करणे अवघड जाते. यामागे मानसिक आणि शारीरिक आरोग्याच्या तक्रारी ही महत्त्वाची कारणे असतात. यामध्ये अगदी केस पांढरे होणे, केस जास्त प्रमाणात गळणे, रात्री शांत झोप न लागणे इथपासून ते मायग्रेन, घोरणे आणि त्वचा निस्तेज होणे अशा विविध प्रकारच्या तक्रारींचा समावेश असतो. आपला आहार, व्यायाम, झोप हे योग्य असेल तर आपले आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते. मात्र जीवनशैली योग्य नसेल तर मात्र आपल्याला आरोग्याच्या आणि सौंदर्याच्या समस्या भेडसावतात. त्यासाठी जीवनशैलीतील काही गोष्टींकडे आवर्जून लक्ष द्यायला हवे. प्रसिद्ध आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. दिक्षा भावसार यासाठी एक अतिशय सोपी उपचारपद्धती सांगतात (Best Ayurvedic Remedy For Health Issues). 

उपाय काय? 

‘नस्य’ असे या क्रियेचे नाव असून आयुर्वेदातील ही क्रिया नियमितपणे केल्यास त्याचा या सर्व तक्रारी दूर होण्यास चांगला फायदा होतो. दररोज सकाळी उठल्यावर किंवा रात्री झोपताना कोमट केलेले गाईचे तूप दोन्ही नाकपुड्यांमध्ये टाकावे. यासाठी डोके मागच्या बाजूला करुन ड्रॉपरने २ थेंब तूप घालावे. यासाठी वयाची अट नसून कोणत्याही वयोगटातील व्यक्तींसाठी तो फायदेशीर ठरु शकतो. शांत झोप लागण्यासाठी, मायग्रेन किंवा इतर कारणांनी होणारी डोकेदुखी कमी होण्यासाठी, प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी, त्वचा मुलायम होण्यासाठी याचा चांगला उपयोग होतो. 

तसेच मानसिक आरोग्य चांगले राहण्यासाठी हा उपाय फायदेशीर असतो. विविध प्रकारच्या अॅलर्जी असतील तर त्यावर नियंत्रण येण्यास या उपायाचा फायदा होतो. मेंदूचे योग्य पद्धतीने पोषण होण्यासाठी नाकात टाकलेले तूप अतिशय महत्त्वाचे कार्य करते. खांद्याच्या वरच्या भागात भेडसावणाऱ्या अडचणी नस्य या क्रियेमुळे दूर होण्यास उपयुक्त ठरतात. यामध्ये मेंदू, डोकं, कान, नाक, तोंड, डोळे, केस, त्वचा यांचा समावेश होतो. थायरॉईड, अथ्रायटीस, स्क्लेरोसिस यांसारख्या तक्रारींवरही नस्य क्रिया उपयुक्त असते. सुरुवातीला हा उपाय तुम्ही जवळच्या आयुर्वेदिक डॉक्टरांच्या देखरेखीखाली केला तर नंतर घरी करणे अधिक सोपे जाते. गायीचे तूप वापरायचे नसल्यास अनुतेल वापरुन हा उपाय करता येतो. यासाठी आयुर्वेदतज्ज्ञांचा सल्ला घेणे उपयुक्त ठरते.  

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सलाइफस्टाइल