Join us

नजरेनं कमी दिसू लागल्यावर समजा शरीरात हे व्हिटॅमिन्स झाले कमी, वाचा कसे मिळवाल...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2025 13:38 IST

Vitamins for Eyes : जर डोळ्यांसाठी आवश्यक असलेले व्हिटॅमिन्स शरीराला मिळत नसतील तर डोळ्यांची दृष्टी नक्कीच कमजोर होणार. अशात कोणत्या व्हिटॅमिन्स कमतरतेमुळे डोळे कमजोर होतात.

Vitamins for Eyes : अलिकडे लाइफस्टाईलमध्ये झालेला मोठा बदल, खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी, लॅपटॉप, मोबाइल, टीव्ही, कॉम्प्युटर समोर जास्त वेळ बसणे या गोष्टींचा प्रभाव डोळ्यांवर पडतो. इतकंच नाही तर खाण्या-पिण्याच्या सवयींचा सुद्धा डोळ्यांवर प्रभाव पडतो. जर डोळ्यांसाठी आवश्यक असलेले व्हिटॅमिन्स शरीराला मिळत नसतील तर डोळ्यांची दृष्टी नक्कीच कमजोर होणार. अशात कोणत्या व्हिटॅमिन्स कमतरतेमुळे डोळे कमजोर होतात आणि हे व्हिटॅमिन्स कशातून मिळवायचे याबाबत जाणून घेऊया.

डोळ्यांसाठी आवश्यक व्हिटॅमिन्स कोणते?

व्हिटॅमिन ए

डोळ्यांसाठी आवश्यक व्हिटॅमिन्समध्ये सगळ्यात आधी व्हिटॅमिन ए चा नंबर लागतो. याला रेटिनॉल असंही म्हटलं जातं. या व्हिटॅमिनमुळे डोळ्यांमध्ये ओलावा कायम राहतो. यानं कॉर्नियाची लेअर सुद्धा सुरक्षित राहते. व्हिटॅमिन ए जर शरीरात कमी झालं तर रातआंधळेपणाची समस्या होऊ शकते. व्हिटॅमिन ए रेटिना डॅमेज होण्यापासून वाचवतं. व्हिटॅमिन ए मिळवण्यासाठी तुम्ही गाजर, ब्रोकली, पालक, हिरव्या पालेभाज्या, पिवळ्या भाज्या, शिमला मिरची आणि कोहळं खाऊ शकता.

व्हिटॅमिन बी

डोळ्यांसाठी व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स गरजेचं आहे. ज्यात व्हिटॅमिन बी१, बी१, बी३, बी६ आणि बी१२ चा समावेश आहे. हे व्हिटॅमिन ऑक्सिडेटिव स्ट्रेस कमी करतं. ज्यामुळे फ्री रॅडिकल्सपासून डोळ्यांचं होणारं नुकसानही टाळलं जातं. व्हिटॅमिन बी नं कॉर्निया आणि रेटिनाची रक्षा केली जाते. व्हिटॅमिन बी ची कमतरता दूर करण्यासाठी हिरव्या पालेभाज्या, शेंगा, दूध, दही आणि सूर्यफुलाच्या बीया खाव्यात.

व्हिटॅमिन सी

दृष्टी चांगली ठेवण्यासाठी व्हिटॅमिन सी असलेल्या गोष्टी भरपूर खाव्यात. व्हिटॅमिन सी हे एक शक्तिशाली अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट मानलं जातं, जे डोळ्यांचं फ्री रॅडिकल्सपासून होणारं नुकसान टाळतं. व्हिटॅमिन सी नं मोतिबिंदू आणि वयानुसार रेटिनाचं होणारं नुकसान टाळलं जातं. यासाठी व्हिटॅमिन सी भरपूर असलेली फळं जसे की, संत्री, द्राक्ष, कीवी, आंबे, अननस, पपई, कलिंकड, स्ट्रॉबेरी, ब्लूबेरी खावेत. तसेच टोमॅटो, हिरव्या भाज्या, ब्रोकली, फ्लॉवर, पालक, रताळे या भाज्याही खाव्यात.

व्हिटॅमिन डी

व्हिटॅमिन डी डोळ्यांसाठी गरजेचं मानलं जातं. व्हिटॅमिन डी नं डोळ्यांची जळजळ कमी होते. तसेच डोळे ड्राय होण्यापासून, मोतिबिंदूपासूनही बचाव होतो. व्हिटॅमिन डी मिळवण्यासाठी एकतर थोडा वेळ उन्हात बसा किंवा हे तुम्ही गायीचं दूध, सोया मिल्क यातूनही मिळवू शकता.

व्हिटॅमिन ई 

शरीरात व्हिटॅमिन ई कमी झाल्याचा प्रभाव डोळ्यांवरही दिसतो. डोळ्यांच्या अनेक स्थिती ऑक्सीडेटिव स्ट्रेसशी संबंधित असतात. जे अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट्स आणि फ्री रॅडिकल्सच्या असंतुलनामुळे होतं. अशात व्हिटॅमिन ई महत्वाचं ठरतं. हे मिळवण्यासाठी तुम्ही अ‍ॅवाकाडो, हिरव्या पालेभाज्या, नट्स, सूर्यफुलाच्या बीया खा आणि सोयाबीन तेल वापरा.

टॅग्स : डोळ्यांची निगाहेल्थ टिप्स