भारतीय पदार्थांमध्ये आवर्जून वापरल्या जाणाऱ्या मसाल्याच्या पदार्थांमध्ये कांदा, लसूण, खोबरं, खडा मसाला या गोष्टींचा समावेश होतो. वाटण-घाटण करायचं म्हणजे तर कांदा लसणाला पर्यायच नाही. लसूण तर अनेकांच्या आवडीचा घटक असल्याने कोणत्याही पदार्थाला फोडणी देताना किंवा ग्रेव्हीमध्ये लसूण वापरला जातो. लसणामुळे पदार्थाचा केवळ स्वादच वाढत नाही तर आरोग्यासाठीही लसूण खाणे अतिशय चांगले असते. पचनक्रिया सुधारण्यापासून ते कोलेस्टेरॉल नियंत्रणात ठेवण्यापर्यंत लसूण खाण्याचे असंख्य फायदे असतात. पण तुम्ही स्वयंपाक करताना लसणाचा कशाप्रकारे वापर केल्यास त्याचे जास्त फायदे मिळू शकतात हे समजून घेणे गरजेचे आहे. प्रसिद्ध आहारतज्ज्ञ रिधिमा बत्रा यांनी लसूण वापरण्याची योग्य पद्धत सांगितली आहे. ही पद्धत कोणती आणि त्यामुळे काय फायदे होतात पाहूया (Best Way to Eat Garlic by Dietitian)...
१. लसणाचा वापर करताना पूर्णच्या पूर्ण पाकळी न वापरता त्याचे बारीक तुकडे करुन किंवा ठेचून लसूण वापरावा. त्यामुळे स्वाद तर चांगला लागतोच पण त्यातील उपयुक्त घटक योग्य प्रमाणात शरीराला मिळतात.
२. आपण एखाद्या पदार्थाला फोडणी टाकल्यानंतर लसूण सोलायला किंवा चिरायला घेतो. मात्र असे न करता लसणाचे काप करुन ठेवावेत आणि साधारण १० मिनीटानी तो फोडणीत किंवा कोणत्याही पदार्थात घालावा. यामुळे लसणातील एलिनोज नावाचे एंझाइम अॅक्टीव्हेट होते मग त्याचे एलिनिन आणि एलिसिनमध्ये रुपांतर होते. प्रत्यक्षात शरीराला एलिसिनचीच जास्त आवश्यकता असते.
३. लसूण कापून काही वेळ ठेवल्यानंतर त्यामध्ये एजोइन नावाचे एंझाइम अॅक्टीव्हेट होते, ज्यामुळे कोरोनरी आर्टरी डिसिज कमी होण्यास मदत होते.
लसूण खाण्याचे फायदे...
१. लसणामुळे प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते त्यामुळे इम्युनिटी बूस्टर म्हणून लसणाचा आहारात आवर्जून समावेश करायला हवा.
२. लसणात अँटीबायोटीक, अँटीव्हायरल आणि अँटीफंगल असे बरेच गुण असतात, त्यामुळे हवा बदल झाला की आवर्जून लसूण खायला हवा.
३. रिकाम्या पोटी १ पाकळी लसूण खाल्ला तर शरीराला त्याचे बरेच फायदे मिळतात.
४. पोटाच्या बऱ्याच समस्यांसाठी लसूण फायदेशीर असतो, पचनाची समस्या असेल आणि पोटात गॅसेस होत असतील तर अवश्य लसूण खायला हवा.
५. काही व्यक्तींनी विशिष्ट आजार असतील तर लसूण न खाण्याचा सल्ला दिला जातो, अशावेळी डॉक्टरांचा सल्ला घेणे केव्हाही फायदेशीर असते.