Join us   

भोगीला कढी-खिचडीचा बेत करण्याचे पारंपरिक महत्त्व, साध्या पदार्थांतूनही मिळेल भरपूर पोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2024 1:11 PM

Bhogi makar sankranti importance of Kadhi Khichadi menu : हे पदार्थ अतिशय साधे आणि नेहमीचे वाटत असतील तरी ते आरोग्यदायी असतात...

मकर संक्रांत हा सण राज्यात आणि इतर राज्यांतही मोठ्या उत्साहात साजरा केला जाणारा सण. संक्रमणाचा काळ म्हणून या सणाला विशेष महत्त्व असते. हिवाळा संपून उन्हाळा सुरू होण्याचा हा कालावधी असतो. या दिवसानंतर दिवस मोठा होत जातो आणि रात्र लहान होत जाते. हवेतला गारठा कमी होतो आणि उन्हाचा पारा चढतो. आपल्याकडे प्रत्येक सणाला ठराविक पदार्थ करण्याला विशेष महत्त्व आहे. यामागे धार्मिक कारणे सांगितली जात असली तरी शास्त्रीय आणि आरोग्याच्या दृष्टीने याला विशेष महत्त्व असते. संक्रांतीला थंडी असल्याने तीळ, गूळ खाण्याला विशेष महत्त्व असते (Bhogi makar sankranti importance of Kadhi Khichadi menu). 

त्याचप्रमाणे संक्रांतीच्या आदल्या दिवशी म्हणजेच भोगीला बाजरीची तीळ लावलेली भाकरी आणि लेकुरवाळी भाजी खाण्याला विशेष महत्त्व आहे. त्याचप्रमाणे यादिवशी आणखी २ पदार्थ केले जातात. ते म्हणजे ताकाची कढी आणि मूगाच्या डाळीची खिचडी. वाटायला हे पदार्थ अतिशय साधे आणि नेहमीचे वाटत असतील तरी हे दोन्ही पदार्थ थंडीच्या दिवसांत शरीराला पोषण देणारे असल्याने ते भोगीच्या दिवशी आवर्जून केले जातात. पाहूयात कढी आणि खिचडी खाण्याचे महत्त्व... 

(Image : Google)

म्हणून भोगीला खाल्ली जाते खिचडी

मूगाच्या डाळीची खिचडी ही आपल्याकडे रात्रीच्या वेळी झटपट होणारा आणि हलका आहार म्हणून घेतला जाणारा पदार्थ. पण या खिचडीमुळे शरीराचे खऱ्या अर्थाने चांगले पोषण होते. यातील मूगाची डाळ ही हिरव्या सालांची असेल तर त्यातून प्रथिने जास्त मिळतात. तसेच भोगीला या खिचडीमध्ये तीळ, दाणे यांचा वापर केल्याने तिचे पोषण वाढण्यास मदत होते. गाजर, मटार, फरसबी, कोबी यांसारख्या भाज्या घातल्यास भाज्याही पोटात जायला मदत होते.  एरवी आपण ही खिचडी थोडी घट्टसर करतो. पण भोगीच्या दिवशी केली जाणारी खिचडी थोडी पातळसर असते त्यामुळे ती पचायला जास्त हलकी होते. त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर, ओलं खोबरं, तूपाची धार घातल्याने पोषण आणखी वाढते.

ताकाची कढी आरोग्यासाठी उत्तम...

कढीमध्ये ताकासोबतच फोडणीसाठी आलं, कडीपत्ता, मेथ्या हे घटक असतात. थंडीच्या दिवसांत उद्भवणारे पचनक्रियेच्या आणि सर्दी-खोकल्याच्या समस्या दूर होण्यासाठी याचा चांगला उपयोग होतो.  थंडीत आपण दही जास्त खात नाही. पण दह्यामध्ये असणारे बॅक्टेरीया आरोग्यासाठी उपयुक्त असतात. अशावेळी गार दही किंवा ताक घेण्यापेक्षा जीऱ्याची फोडणी दिलेला गरम कढी घेतली तर घशालाही चांगला आराम मिळण्यास मदत होते. 

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्समकर संक्रांतीआहार योजना