अन्नपदार्थांसाठी प्लास्टिकच्या कंटेनरचा वापर वाढला आहे. अन्न पॅकेजिंगसाठी ब्लॅक प्लास्टिकच्या कंटेनरचा वापर केला जातो. स्वस्त आणि टिकाऊ असल्याने त्यांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. पण तुम्हाला माहिती आहे का की काळ्या रंगाच्या प्लास्टिकच्या कंटेनरचा जास्त वापर केल्यामुळे कॅन्सरसारखे धोकादायक आजार होऊ शकतात.
आरोग्य तज्ञांचे म्हणणं आहे की, हे ब्लॅक प्लास्टिकचे कंटेनर हे रिसायकल केलेल्या प्लास्टिकपासून बनवले जातात. ते बनवण्याच्या प्रक्रियेत अनेक हानिकारक केमिकल्स वापरली जातात, जी गरम अन्न ठेवताच त्यात विरघळतात आणि आरोग्यासाठी धोका निर्माण करू शकतात. यामुळे कोणतं नुकसान होऊ शकतं त्याबाबत जाणून घेऊया
ब्लॅक प्लास्टिकचे कंटेनर धोकादायक का असतात?
रिसायकल केलेल्या प्लास्टिकपासून बनवलेल्या कंटेनरला काळा रंग देण्यासाठी कार्बन ब्लॅक सारख्या केमिकल्सचा वापर केला जातो. रिसायकलमध्ये अनेक प्रकारचे प्लास्टिक मिसळले जाते. ज्यामध्ये हानिकारक केमिकल्स देखील असतात. एम्स्टर्डमच्या टॉक्सिक-फ्री फ्युचर आणि व्रिजे युनिव्हर्सिटीने केलेल्या संशोधनात असं आढळून आलं आहे की, ब्लॅक प्लास्टिकपासून बनवलेल्या अनेक घरगुती उत्पादनांमुळे कॅन्सर होऊ शकतो आणि हार्मोन्सवर परिणाम होऊ शकतो. या आधारावर, असं मानलं जातं की ब्लॅक प्लास्टिकच्या कंटेनरमुळे देखील कॅन्सरचा धोका निर्माण होऊ शकतो.
प्लास्टिकच्या कंटेनरमुळे डीएनएचं नुकसान
बिस्फेनॉल ए अनेक रिसायकल केलेल्या ब्लॅक प्लास्टिक कंटेनरमध्ये आढळतं, ज्यामुळे शरीरात हार्मोनल असंतुलनाचा धोका वाढू शकतो. यामुळे कॅन्सरसारख्या अनेक धोकादायक आजारांचा धोका निर्माण होऊ शकतो. ब्लॅक प्लास्टिकमध्ये फेथलेट्स हे केमिकल देखील आढळतं, जे शरीरात प्रवेश केल्यानंतर डीएनएला नुकसान पोहोचवू शकतं.
ब्लॅक प्लास्टिकच्या कंटेनर वापरताना अशी घ्या काळजी
- गरम अन्न ठेवण्याऐवजी, तुम्ही थंड अन्न ब्लॅक प्लास्टिकच्या कंटेनरमध्ये ठेवू शकता.
- रिसायकल केलेल्या प्लास्टिकचा वारंवार वापर केल्याने अन्नाद्वारे हानिकारक रसायने शरीरात प्रवेश करू शकतात. ते वारंवार वापरणं टाळा.
- 'फूड-ग्रेड' असं लेबल असलेले प्लास्टिकचे कंटेनर वापरा. त्यामध्ये खाणं सुरक्षित असू शकतं.
- शक्य तितकं ब्लॅक प्लास्टिकच्या कंटेनर वापर करणं टाळण्याचा प्रयत्न करा.