डायबिटीस हा आजार नसून ही जीवनशैलीविषयक समस्या आहे. गेल्या काही काळात डायबिटीसचे प्रमाण इतके जास्त वाढले आहे की घरोघरी या समस्येने त्रस्त असलेल्या व्यक्ती पाहायला मिळतात. अनुवंशिकता, चुकीची जीवनशैली, आहाराच्या चुकीच्या पद्धती, ताणतणाव यांसारख्या विविध गोष्टींमुळे डायबिटीसची समस्या उद्भवते. एकदा डायबिटीस झाला की तो नियंत्रणात ठेवण्याशिवाय पर्याय नसतो. कारण शुगरचे प्रमाण वाढते राहीले तर त्याचा शरीराच्या विविध अवयवांवर परिणाम होतो. परिणामी अवयव निकामी होण्याचीही शक्यता असते (Black Rice For Diabetes alternative to white rice for blood sugar level).
मात्र डायबिटीस नियंत्रणात राहावा यासाठी आहाराच्या बाबतीत योग्य काळजी घेण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जातो. योग्य औषधोपचार आणि आहाराचे नियोजन यांच्या माध्यमातून डायबिटीस नियंत्रणात ठेवता येतो. डायबिटीस म्हटल्यावर सर्वात आधी गोड आणि भात यांवर नियंत्रण ठेवण्यास सांगण्यात येते. मात्र गोड आणि भात या अनेकांसाठी आवडीच्या गोष्टी असतात. भाताशिवाय तर जेवण पूर्ण झाल्य़ासारखे वाटत नसल्याने आपण थोडा का होईा भात जेवणात आवर्जून घेतोच. पण पांढरा भात खाण्याने रक्तातील साखरेच्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता असते. आहारतज्ज्ञ डॉ. आयुषी यादव डायबिटीसच्या रुग्णांनी पांढऱ्या भाताऐवजी कोणता भात खावा याविषयी काही खास गोष्टी सांगतात, त्या कोणत्या ते पाहूया...
काळा तांदूळ खाण्याचे फायदे
आपल्याला हातसडीचा, लाल तांदूळ किंवा तांदळाच्या विविध जाती माहित असतात. पण काळा तांदूळ सगळ्यांनाच माहित असेल असे नाही. काळ्या तांदळाला आपल्याकडे काही वेळा निषिद्ध मानले जाते. मात्र भारतातील ईशान्य भारतात असणाऱ्या मणिपूर येथे पिकवला जाणारा हा तांदूळ आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असतो. ब्लॅक राइस मधे 123 प्रकारचे अँण्टिऑक्सिडण्टस असतात. तांदळाच्या इतर कोणत्याच प्रकारात इतक्या प्रमाणात अँण्टिऑक्सिडण्टस नसतात. याशिवाय या तांदळात प्रथिनं, फायबर आणि लोहाचं प्रमाणही चांगलं असतं. या तांदळात फ्लेवोनॉइडस भरपूर असतात. त्यामुळे शरीरातील गुड कोलेस्टेरॉल वाढवण्यास मदत होते आणि तांदळातल्या या गुणामुळे शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी होतं. या तांदळात प्रोटीन आणि लोहही चांगल्या प्रमाणात असते त्यामुळे हा तांदूळ डायबिटीस असणाऱ्यांसाठी फायदेशीर असतो. फायबरचे प्रमाण चांगले असल्याने हा भात खाल्ल्यावर बराच काळ पोट भरलेले राहते, तसेच बराच काळ भूक लागत नाही त्यामुळे वजन नियंत्रणात राहण्यास या तांदळाचा चांगला उपयोग होतो. याबरोबरच हृदयाचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठीही काळा तांदूळ खाणे फायद्याचे ठरते.