डायबिटीस ही एक अशी समस्या आहे जी हळूहळू शरीरात पसरत जाते आणि संपूर्ण शरीराचा ताबा घेते. शुगर असणाऱ्या व्यक्तींसाठी ती नियंत्रणात राहणे अतिशय गरजेचे असते. एकदा शुगर वाढली की त्यातून आरोग्याच्या इतर समस्या उदभवतात. डायबिटीससाठी अद्याप कोणताही ठोस उपाय सापडलेला नसून जीवनशैलीमध्ये बदल करणे हेच डायबिटीससाठी सर्वात महत्त्वाचे असते. शुगर वाढायला लागली की वजन एकाएकी कमी होणे, अंधुक दिसणे, सतत तहान लागणे, सारखे गोड खावेसे वाटणे अशा समस्या निर्माण होतात. अशावेळी वैद्यकीय तपासणी करुन घेणे आणि योग्य ते निदान करणे आवश्यक असते. आता शुगर नियंत्रणात ठेवायची तर औषधे तर घ्यायलाच हवीत. मात्र औषधांबरोबरच आयुर्वेदीक उपचार घेतल्यास त्याचा निश्चितच चांगला फायदा होऊ शकतो.
प्रसिद्ध आयुर्वेदतज्ज्ञ दिक्षा भावसार काही हर्बल उपचार सांगतात, ज्य़ामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहू शकते. यामध्ये आयुर्वेदीक जडीबूटीपासून तयार केलेले चूर्ण आहे. डॉ. दिक्षा भावसार नियमितपणे आपल्या फॉलोअर्सना काही ना काही चांगली माहिती देण्याचा प्रयत्न करत असतात, आताची ही पोस्टही तशाच स्वरुपाची आहे. या चूर्णाची ५०० हून अधिक डायबिटीस रुग्णांवर चाचणी करण्यात आली असून त्याचा निकाल ९५ टक्क्यांहून अधिक आहे. यामध्ये कडूलिंब, गोक्षुर, मधुनाशिनी, सुंठ, मंजिष्ठा, मारीच, बिल्व, पुनर्नवा, जांभूळ, कारले, त्रिफळा यांचा समावेश आहे. ज्यांच्या शुगर लेव्हल काठावर आहेत त्यांच्यासाठीही हे चूर्ण अतिशय उपयुक्त असल्याचे डॉ. भावसार सांगतात. तसेच या चूर्णाचा डोस कसा घ्यायचा याबाबतची माहिती डॉ. भावसार यांनी आपल्या पोस्टमध्ये दिली आहे.
या चूर्णाचा काय फायदा होईल...
१. ऊर्जा टिकून राहण्यास मदत २. कोलेस्टेरॉल नियंत्रणात राहण्यास मदत ३. अतिरिक्त ताणावर नियंत्रण ४. चयापचय क्रिया सुरळीत होण्यास फायदेशीर ५. यकृत आणि स्वादुपिंडाचे काम चांगले होण्यास मदत ६. शुगरमुळे उद्भवणाऱ्या विविध प्रकारच्या समस्यांपासून दूर राहायला मदत होईल