Join us   

पावसाळ्यात ताप नसूनही अंग गरम आहे, ताप आला असं वाटतं? डॉक्टर सांगतात, तो ताप खरा की..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2022 10:35 AM

Body Temperature : सामान्यपणे शरीराचे तापमान ९८ डीग्री फॅरेनहाइट असते पण ते ९९ झाले की आपल्याला ताप आला असे आपल्याला वाटू शकते.

ठळक मुद्दे लहान मुलांमध्ये ९९.७ डिग्री फॅरेनहाइट तापमान असेल तर मुलांना ताप आला असे समजावे. शरीराचे तापमान थोडे जास्त असेल आणि त्याबरोबर श्वास घ्यायला त्रास होत असेल, अंगदुखी, लघवीला त्रास असे होत असेल तर डॉक्टरांकडे जाण्याची आवश्यकता आहे हे लक्षात घ्यायला हवे

पावसाळा म्हटलं की हवेत गारठा पडतो आणि या काळात संसर्गजन्य आजारांचे प्रमाणही वाढते. ताप, सर्दी, खोकला, जुलाब हे तर पावसाळ्याच्या दिवसांत हमखास होणारे आजार. ताप आला की आपण पार गळून जातो, पण अनेकदा आपल्याला आतून अंग गरम लागत असते मात्र म्हणावा तितका ताप नसतो. सकाळच्या वेळी आपल्या शरीराचे तापमान तुलनेने कमी असते आणि दुपारच्या वेळी ते काही प्रमाणात वाढते. काही वेळा आपण शरीराचे तापमान तपासले तर ते ९९ डीग्री फॅरेनहाइट असते. सामान्यपणे शरीराचे तापमान ९८ डीग्री फॅरेनहाइट असते पण ते ९९ झाले की आपल्याला ताप आला असे आपल्याला वाटू शकते. अनेकदा शरीराचे तापमान वाढले म्हणून आपण औषधेही घेतो (Body Temperature). 

(Image : Google)

पण ९९ डीग्री फॅरेनहाइट म्हणजे खरंच ताप आहे असं समजायचं का? तज्ज्ञांचे म्हणणे आहे की ९९ डीग्री म्हणजे ताप नाही. तर वेगवेगळ्या कारणांमुळे शरीराच्या तापमानात वाढ झालेली असू शकते. प्रत्येक व्यक्तीच्या शरीराच्या तापमानाची रेंज वेगवेगळी असते. त्यामुळे केवळ तापमान वाढणे याला आपण ताप आला असे म्हणू शकत नाही. डॉ. शरांग सचदेव यांच्या म्हणण्यानुसार, आपल्या शरीराचे तापमान दिवसभर बदलत असते. त्यामुळे जर तुमच्या शरीराचे तापमान ९९ डीग्री सेल्सियस असेल तर तुम्ही चिंता करण्याची आवश्यकता नसते. 

(Image : Google)

साधारणपणे वयस्कर लोकांच्या शरीराचे सामान्य तापमान ९८.६ अंश पेक्षा कमी असू शकते. पण तरुण आणि काम करणाऱ्या लोकांमध्ये शरीराचे तापमान यापेक्षा जास्त असण्याची शक्यता असते. जास्त तापमान असेल तरी या लोकांची तब्येत सामान्य असते हे लक्षात घ्यायला हवे. २००१ मध्ये जपानमध्ये करण्यात आलेल्या एका अभ्यासानुसार, व्यायाम, एखादे कष्टाचे काम, गर्भावस्था आणि जेवणाच्या दरम्यान शरीराचे तापमान वाढण्याची शक्यता असते. मात्र शरीराचे तापमान थोडे जास्त असेल आणि त्याबरोबर श्वास घ्यायला त्रास होत असेल, अंगदुखी, लघवीला त्रास असे होत असेल तर डॉक्टरांकडे जाण्याची आवश्यकता आहे हे लक्षात घ्यायला हवे. पण लहान मुलांमध्ये ९९.७ डिग्री फॅरेनहाइट तापमान असेल तर मुलांना ताप आला असे समजावे. 

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सलाइफस्टाइल