थंडीच्या दिवसांत हाडांचे दुखणे डोके वर काढते. या काळात गारठ्याने हाडं अचानक ठणकायला लागतात. कधी हे दुखणे जुने असते तर कधी नव्याने उद्भवलेले असते. वय वाढतं तशी हाडं ठिसूळ झाल्याने बरेचदा हाडं दुखण्याची समस्या उद्भवते. हाडांसाठी कॅल्शियम हा अतिशय उपयुक्त घटक असून आहारातून शरीराला जास्तीत जास्त कॅल्शियम मिळणे आवश्यक असते. तसेच शरीरात व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन ए आणि मॅग्नेशियम योग्य प्रमाणात असेल तर हा कॅल्शियम हाडात शोषला जाण्यास मदत होते. आता आहारात असे कोणते घटक घ्यायला हवेत की ज्यामुळे आपली कॅल्शियमची कमतरता भरुन निघायला मदत होईल. विशेष म्हणजे आपण खात असलेल्या कोणत्या पदार्थातून आपल्या शरीराला किती प्रमाणात कॅल्शियम मिळते याविषयी आपल्याला पुरेशी माहिती नसते (Bone Strengthening Foods Which Contain Calcium).
यासाठीच प्रसिद्ध आहारतज्ज्ञ अंजली मुखर्जी आपल्याला हाडांचा बळकटपणा वाढावा यासाठी कोणते पदार्थ किती प्रमाणात खावेत आणि त्यातून आपल्याला किती कॅल्शियम मिळते याविषयी माहिती देतात. एका तरुण व्यक्तीला हाडं बळकट ठेवण्यासाठी दिवसाला १००० मिलीग्रॅम कॅल्शियमची आवश्यकता असते. हाडांचे आरोग्य चांगले नसेल तर मुडदूस, ऑस्टीओपोरॅसिस तसेच हाडे मोडण्याच्या समस्या वाढण्याची शक्यता असते. अनेकदा शरीराला पुरेसे कॅल्शियम मिळावे म्हणून आपण आहारात दुधाचा समावेश करतो. पण फक्त दूध घेऊन उपयोग नसतो तर त्यासाठी आहारात कॅल्शियम असलेल्या इतर घटकांचाही योग्य प्रमाणात समावेश करायला हवा. आता हे पदार्थ कोणते आणि ते किती प्रमाणात घेतल्यास त्यातून किती कॅल्शियम मिळतो पाहूया...
१. गाजर आणि पालक
६ गाजर आणि ५० ग्रॅम पालक यांचा ज्यूस केल्यास त्यातून आपल्याला साधारणपणे ३०० मिलीग्रॅम कॅल्शियम मिळते. यामध्ये अँटीऑक्सिडंटसचे प्रमाणही जास्त असल्याने त्वचेसाठी ते अतिशय चांगले असते.
२. कडधान्ये
राजमा, काबुली चना, कुळीथ, काळी डाळ जवळपास १०० ग्रॅम घेतल्यास त्यातून आपल्या शरीराला २०० ते २५० ग्रॅम कॅल्शियम मिळण्यास मदत होते.
३. तीळ
दररोज आपण २ ते ३ चमचे पांढरे आणि काळे तीळ खाल्ल्यास खूप जास्त प्रमाणात कॅल्शियम मिळण्यास मदत होते. १०० ग्रॅम तीळामध्ये साधारणपणे १४०० ग्रॅम कॅल्शियम असल्याने तीळ हा कॅल्शियमचा सर्वात महत्त्वाचा स्त्रोत आहे. तीळाचे लाडू, चटणी अशा कोणत्याही स्वरुपात आपण आहारात तिळाचा समावेश करु शकतो.
याशिवाय मासे, पालेभाज्या, ब्रोकोली, सोयाबिन, अंजीर आणि तृणधान्ये यांच्या माध्यमातूनही आपल्याला बऱ्याच प्रमाणात कॅल्शियम मिळण्यास मदत होते.