Join us   

बायांनो हाडं ठणकतायेत? पाठ- कंबर- गुडघा जाम? फक्त कॅल्शियमच नाही, 'हे' घटकही हवेतच आहारात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 03, 2021 5:04 PM

कॅल्शियमबरोबरच इतरही घटकांचा आहारात समावेश गरजेचा, ज्यामुळे हाडांची झीज भरुन येण्यास होईल मदत 

ठळक मुद्दे कॅल्शियम हा हाडांसाठी एक महत्त्वाचा घटक असला तरी तो एकमेव घटक नाही शरीरातील आवश्यक घटकांची कमतरता हे एक प्रमुख कारण कॅल्शियम सप्लिमेंटस किडनी आणि हृदयासाठी घातक

हाडं फार ठणकतात अशी तक्रार सर्वच वयोगटातील महिला वारंवार करताना दिसतात. आता हाडं दुखण्याची अनेक कारणे असतील तरी शरीरातील आवश्यक घटकांची कमतरता हे एक प्रमुख कारण आहे. हाडांचे दुखणे कमी करण्यासाठी आहारातील कॅल्शियमचे प्रमाण योग्य हवे असे आपण नेहमी ऐकतो. पण त्याशिवाय इतरही अनेक घटक आहेत जे शरीराला आणि मुख्यत: हाडांना पोषण मिळण्यासाठी उपयुक्त ठरतात. हाडांचे दुखणे कमी करण्यासाठी आणि त्यांची झीज भरुन काढण्यासाठी आहारातील हे घटक फायदेशीर ठरतात. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार अनेकजण कोणताही सल्ला न घेता हाडांच्या दुखण्यावर उपाय म्हणून कॅल्शियम सप्लिमेंटस घेतात. मात्र त्यामुळे हाडांची झीज भरुन निघण्यास मदत होत असली तरी किडनी आणि हृदयावर त्याचा विपरित परिणाम होतो. कॅल्शियम हा हाडांसाठी एक महत्त्वाचा घटक असला तरी तो एकमेव घटक नाही हे लक्षात घेणे गरजेचे आहे. पाहूयात असे कोणते महत्त्वाचे घटक आहेत ज्यामुळे हाडांचे आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते. 

व्हिटॅमिन डी ३ - कॅल्शियम शरीरात एका मर्यादेपर्यंतच शोषला जाऊ शकतो. त्याहून जास्त कॅल्शियम घेतला तर त्याचा शरीराला काहीही उपयोग नसतो. कॅल्शियमबरोबरच व्हिटॅमिन डी ३ घेतल्यास त्याचा निश्चितच फायदा होतो. कारण शरीरात व्हिटॅमिन डी ३ चे प्रमाण योग्य असेल तरच कॅल्शियम योग्य पद्धतीने शोषला जाऊ शकतो. त्यामुळे हे दोन्ही घटक एकमेकांना पूरक आहेत असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. हा घटक शरीराला कोवळ्या उन्हातून मिळत असल्याने अनेकदा डॉक्टर नवजात बालकापासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांना कोवळे उन अंगावर घेण्याचा सल्ला देतात. याचा गांभीर्याने विचार होणे आवश्यक असून त्यामुळे तुमच्या हाडांचे आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते. 

( Image : Google)

मॅग्नेशियम, झिंक आणि व्हिटॅमिन K2 - व्हिटॅमिन K2 हा घटक हाडांची घनता चांगली राहण्यासाठी उपयुक्त असतो. तुमच्या आहारात डाळी, धान्य, कडधान्य, दूध आणि दुग्धजन्य पदार्थ, अंडी, फळे सर्व प्रकारच्या भाज्या असे संतुलन असेल तर हे तिन्ही घटक शरीरात तयार होतात आणि हाडे मजबूत राहण्यास त्याचा फायदा होतो. तेव्हा संतुलित आहार घेणे गरजेचे असल्याचा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञ देताना दिसतात. 

प्रथिने - प्रथिने हा शरीरातील एक महत्त्वाचा घटक असून त्याचे प्रमाण योग्य असणे अत्यावश्यक आहे. हाडांचा ५० टक्के भाग हो प्रोटीनने तयार झालेला असतो. त्यामुळे प्रथिने शरीराच्या इतर कार्यांसाठी ज्याप्रमाणे उपयुक्त असते त्याचप्रमाणे ती हाडांसाठीही अतिशय आवश्यक असतात. यासाठी तुमच्या आहारात नेहमी विविध रंगांची फळे आणि भाज्या यांचा समावेश ठेवा. काही लोक वाढलेले वजन कमी करण्यासाठी डाएट करतात. मात्र त्याचा शरीरावर विपरित परिणाम होतो आणि हाडांचे आरोग्य बिघडल्याचे पाहायला मिळते. प्रथिने मिळण्यासाठी आहारात दुग्धजन्य पदार्थ, पालेभाज्या, अंडी, मासे यांचा समावेश गरजेचा असतो. 

( Image : Google)

क जीवनसत्त्व - जीवनसत्त्वांमध्ये अनेक प्रकार असतात. त्यातील क जीवनसत्त्व हा एक महत्त्वाचा घटक आहे. प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी क जीवनसत्त्वाची आवश्यकता असते हे आपल्याला माहित असते मात्र हाडांसाठीही हा घटक गरजेचा असतो. त्यामुळे प्रत्येकाने आहारात संत्री, लिंबू, आवळा यांचा समावेश करणे गरजेचे आहे. त्यामुळे हाडांचे आरोग्य निश्चितच सुधारते.  

 

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्यपौष्टिक आहार