कधी चालताना तर कधी उठता-बसताना आपली हाडं ठणकतात. एकाएकी मान दुखते तर कधी अचनाकच पाय दुखायला लागतात. कमी वयातही अशा समस्या सध्या अनेकांना त्रास देतात. हाडं ठणकायला लागली की काय करावं कळत नाही. कमी वयात होणारा हाडांचा ठिसूळपणा किंवा हाडांमध्य़े नसलेली ताकद ही यामागील मुख्य कारणे असतात. हाडं ठणकतात यामागे प्रामुख्याने हाडांना न मिळणारे पोषण म्हणजेच आहार, व्यायामाचा अभाव आणि इतर काही कारणे असतात. पण ही हाडांची दुखणी आपण टाळू शकतो. त्यासाठी आहारात नियमितपणे काही गोष्टींचा समावेश करायला हवा. पाहूयात हाडांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी आहारात असायलाच हव्यात अशा ४ गोष्टी कोणत्या...
१. दूध आणि दुग्धजन्य पदार्थ
दूध आणि दुधाच्या पदार्थांमध्ये कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी चांगल्या प्रमाणात असते. एक कप दुधात ३०० मिलीग्रॅम कॅल्शियम असतो. इतकेच नाही तर आपण दिवसभरात जितके व्हिटॅमिन डी घेतो त्यातील १५ टक्के हे दुधातून मिळते. तर आपल्या रोजच्या गरजेतील १० टक्के पोटॅशियम दुधातून मिळते.
२. ग्रीक योगर्ट
ग्रीक योगर्ट हा आपल्याला काहीतरी मॉडर्न पदार्थ वाटत असला तरी तो दह्यासारखाच लागतो. यातून शरीराला जास्त प्रमाणात कॅल्शियम आणि प्रोटीन्स मिळतात. त्यामुळे ग्रीक योगर्टचा हाडांच्या बळकटीसाठी आहारात आवर्जून समावेश करायला हवा. हे दुधापासूनच तयार झालेले असल्याने दुधातून मिळणारे सर्व पोषण आपल्याला यातून सहज मिळते. १२ आठवडे ठराविक व्ययाम करुन नियमितपणे ग्रीक योगर्ट खाल्ल्यास हाडांची घनता चांगल्यारितीने वाढते याबाबतचे एक संशोधन नुकतेच प्रसिद्ध करण्यात आले.
३. मशरुम
आपण ज्याप्रमाणे इतर भाड्या नियमितपणे खातो, त्याप्रमाणे आपण मशरुम नियमितपणे खात नाही. मात्र नियमितपणे मशरुम खाल्ल्यास आपल्या शरीरातील व्हिटॅमिन डी वाढण्यास मदत होते. व्हिटॅमिन डी हाडांच्या आरोग्यासाठी सर्वात महत्त्वाचा घटक असून मशरुममध्ये हा घटक मोठ्या प्रमाणात असतो. हाडांची घनता वाढविण्यासाठी डॉक्टर आणि आहारतज्ज्ञही अनेकदा मशरुम खाण्याचा सल्ला देतात.
४. संत्र्याचा ज्यूस
संत्री आरोग्यासाठी फायदेशीर असतात हे आपल्याला माहित आहे. संत्र्यामध्ये व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणात असल्याने प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी संत्री खाल्लेली चांगली असतात. संत्र्याच्या ज्यूसमधून व्हिटॅमिन डी आणि कॅल्शियम चांगल्या प्रमाणात मिळते. हाडांच्या बळकटीसाठी हे दोन्ही घटक अतिशय फायदेशीर असून आहारात नियमितपणे संत्री आणि ज्यूस घ्यायला हवा.