उच्च रक्तदाब म्हणजेच हाय बीपी ही सध्या अतिशय सामान्य समस्या झालेली आहे. बीपी हा पूर्वी ज्येष्ठ मंडळीना होत होता पण वाढते ताणतणाव, जीवनशैलीतील बदल यांमुळे अगदी तिशी आणि चाळीशीतच बीपीची समस्या उद्भवायला लागली. आरोग्याच्या बहुतांश समस्यांवर औषधोपचार असतातच पण त्याचबरोबरच आहार सर्वात महत्त्वाचा भाग असतो. तुम्ही कसा, कोणत्या वेळेला, काय आणि किती आहार घेता यावर तुमच्या तब्येतीच्या बराचशा गोष्टी अवलंबून असतात. आरोग्याच्या तक्रारींनुसार आपण आहारात बदल केले तर आपली तब्येत सुधारण्यास त्याचा निश्चितच फायदा होतो. प्रसिद्ध आहारतज्ज्ञ श्वेता शाह-पांचाळ यांनी बीपीच्या समस्येसाठी नुकत्याच काही टिप्स शेअर केल्या आहेत (How To Control High Blood Pressure easy tips by Dietician) .
जीवनशैली आणि आहारातील बदलांनी वाढलेला बीपी नियंत्रणात ठेवणे शक्य आहे असे त्यांचे म्हणणे आहे. १२०/८० हे सामान्य ब्लड प्रेशर आहे. १३०/९० असले तरी चिंता करण्याची फार आवश्यकता नसते. मात्र ते त्याहून जास्त झाले तर वेळीच योग्य त्या उपाययोजना करायला हव्यात. कारण वाढलेल्या रक्तदाबावर वेळीच उपचार न केल्यास हृदयाशी निगडीत समस्यांना कारणीभूत ठरु शकते. जवळपास ९० टक्के बीपीचे रुग्ण हे चुकीची जीवनशैली आणि चुकीच्या आहारपद्धती यांमुळे या समस्येचा सामना करत असतात.
ब्लड प्रेशर वाढण्याची कारणे
१. आयुष्यात ताणतणावाच्या गोष्टींचा सामना करावा लागणे
२. डायबिटीस
३
. सतत बैठे काम करणाऱ्या व्यक्ती
मग हा वाढता रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी उपाय काय?
१. नायट्रीक अॅसिड असलेल्या पदार्थांचा आहारात समावेश करायला हवा. यामध्ये पालक, केल, बीट यांसारख्या भाज्यांचा समावेश होतो. याबबरोबरच अमिनो अॅसिडचा आहारात समावेश करणेही तितकेच गरजेचे असते. यामुळे आपल्या नसा आणि धमन्या मोकळ्या राहण्यास मदत होते आणि रक्तप्रवाह सुरळीत होऊन रक्तदाब नियंत्रणात येण्यास मदत होते.
२. झोप ही रक्तदाब नियंत्रणात राहण्यासाठी अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. डोक्यात सतत विचार आणि ताण असेल तर आपल्याला वेळच्या वेळी झोप येत नाही. त्याचा आरोग्यावर विपरीत परीणाम होतो आणि रक्तदाब वाढण्याचे हे एक महत्त्वाचे कारण असते. तुम्हाला सतत तणाव वाटत असेल तर थोडं थांबण्याची, शांतपणे श्वासोच्छवास करण्याची आवश्यकता आहे हे लक्षात घ्यायला हवे. केवळ ५ मिनीटे दिर्घ श्वसन केल्यास त्याचा रक्तदाब नियंत्रणात राहण्यावर खूप चांगला परीणाम होईल हे लक्षात घ्या.
३. बैठे काम हे आणखी एक महत्त्वाचे कारण असून तुमचा जॉब बैठ्या स्वरुपाचा असेल तर दर काही वेळाने जागेवरुन उठणे, चालणे, सकाळी किंवा संध्याकाळी आवर्जून व्यायाम करणे या गोष्टींची आवश्यकता असते हे लक्षात घ्यायला हवे. बसल्याने शरीरात चरबी साठऊन राहते आणि त्यामुळे लठ्ठपणा आणि नकळत रक्तदाबाची समस्या निर्माण होते.