Join us   

ब्रेस्ट कॅन्सर फक्त बायकांनाच होतो? दिल्लीत एका आजोबांना झाला ब्रेस्ट कॅन्सर; हा आजार काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2021 4:58 PM

ब्रेस्ट कॅन्सर म्हणजे स्तनाचा कर्करोग हे फक्त बायकांचच दुखणं, असं वाटतं ना तुम्हाला? पण दिल्लीत एका ७० वर्षाच्या पुरुषाला पछाडलंय स्तनाच्या कर्करोगाने.. काय हा आजार, त्याची कोणती लक्षणं पुरुषांमध्ये दिसून येतात?

ठळक मुद्दे कोणत्या पुरुषांना होतो स्तनाचा कर्करोग, कोणत्या पुरुषांनी हा आजार होऊ नये, म्हणून विशेष काळजी घेण्याची गरज आहे, हे प्रत्येक पुरुषाला आणि स्त्रीला देखील माहिती असायलाच हवं. 

स्तनाचा कर्करोग होण्याचं प्रमाण महिलांमध्ये किती जास्त आहे, हे आपण जाणतोच. स्तनाचा कर्करोग म्हंटलं की हा आजार एखाद्या महिलेलाच झाला असणार, हे आपण पक्क ठरवून घेतलेलं असतं. यात गैर काहीच नाही कारण आपण आजवर अशाच केसेस बघत आणि ऐकत आलो आहोत. पण असं नाही. प्रत्येक वेळी हा आजार एखाद्या महिलेलाच गाठेल असं नाही. पुरुषांनाही स्तनाचा कर्करोग होऊ शकतो, हे आता पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. त्यामुळे महिलांना जसा स्तनाच्या कर्करोगाचा धोका आहे, तसाच तो पुरुषांनाही आहे. कोणत्या पुरुषांना होतो स्तनाचा कर्करोग, कोणत्या पुरुषांनी हा आजार होऊ नये, म्हणून विशेष काळजी घेण्याची गरज आहे, हे प्रत्येक पुरुषाला आणि स्त्रीला देखील माहिती असायलाच हवं. 

 

राजधानी दिल्लीमध्ये अशी एक केस नुकतीच आढळून आली आहे. तिथे एका खाजगी हॉस्पिटलमध्ये एका ७० वर्षीय आजोबांना ब्रेस्ट कॅन्सर झाल्याचं निदान डॉक्टरांनी केलं. त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी यासंदर्भात बोलताना सांगितलं की आजवर केवळ महिलांनाच स्तनाचा कर्करोग होऊ शकतो, या आपल्या विचारांना तोडणारी ही घटना आहे. महिलांच्या तुलनेत पुरुषांना या आजाराचा धोका खूप कमी असला तरी सध्या स्तनाचा कर्करोग होणाऱ्या पुरुषांची संख्या वाढते आहे, असंही तज्ज्ञांनी सांगितलं. ब्रेस्ट कॅन्सरने त्रस्त असणाऱ्या या आजोबांवर उपचार करणारे डॉक्टर म्हणाले की, रूग्णावर उपचार सुरु असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. सप्टेंबर महिन्यात या आजोबांचा एक स्तन काढण्यात आला असून सध्या त्यांच्यावर केमोथेरपी सुरू आहे. 

 

पुरुषांना स्तनाचा कर्करोग होण्याचे प्रमाण खूप कमी असले तरी हा एक आक्रमक आजार आहे. त्यामुळे वेळेत हा आजार लक्षात आला, तर त्यावर उपचार करणे सोपे जाते. अमेरिकन कॅन्सर सोसायटीने केलेल्या अभ्यासानुसार पुरुषांमध्ये ब्रेस्ट कॅन्सर होण्याचा धोका प्रत्येक ८३३ पुरुषांमागे एका जणाला आहे. यातही ६० वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्या पुरुषांना या आजाराचा जास्त धोका आहे. पुरुषांमध्ये हा आजार लक्षात न येण्याचे कारण म्हणजे या बाबतीत पुरुषांमध्ये जागरुकता नसणे. महिलांना माहिती असते की त्यांना कर्करोगाचा धोका आहे. त्यामुळे या संदर्भात काहीही लक्षणं जाणवली तरी त्या लगेच तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकतात. मात्र बहुसंख्य पुरुषांना हेच माहिती नसते की त्यांनाही स्तनाचा कर्करोग होऊ शकतो. त्यामुळे जागरुकतेअभावी ते उपचार घेण्यास विलंब करतात. उपचार घेण्यात विलंब झाला तर ते जीवावर बेतणारे ठरू शकते. त्यामुळे स्तनाच्या कर्करोगाची पुरुषांमध्ये काय लक्षणे दिसून येतात, याविषयी प्रत्येकाला माहिती असावी. 

 

पुरुषांमध्ये दिसून येणारी स्तनाच्या कर्करोगाची लक्षणे १. छातीवर गाठ येणं महिलांमध्येही हे लक्षण दिसून येतं. जर पुरुषांच्या छातीवर स्तनाच्या आसपास गाठ दिसून आली तर त्याकडे दुर्लक्ष करु नका. ही गाठ दाबून बघा. दुखत नसेल तर लगेचच डॉक्टरांकडे जा. या गाठीकडे दुर्लक्ष केलं तर हळूहळू हा आजार स्तनांपासून मानेपर्यंत आणि शरीराच्या इतर भागांकडे पसरत जातो. 

२. निप्पल डिस्चार्ज जर निप्पलमधून कसला स्त्राव निघत असेल, तर ती एक धोक्याची सुचना असू शकते. अनेकदा पांढरट, पिवळट पाणी किंवा काही प्रसंगी रक्त देखील निप्पलमधून निघू शकतं. त्यामुळे शर्टवर अशा प्रकारचा कोणता डाग दिसत असेल तर तातडीने स्तन तपासणी करून घ्यावी. 

३. निप्पलचे तोंड दबणे पुरुषांच्या स्तनामध्ये जेव्हा कर्करोगाची गाठ वाढत जाते, तेव्हा त्यांची स्तनाग्रे आत खेचली जातात. आजूबाजूची त्वचा कोरडी होते. या त्वचेला खाज येऊ लागते. त्यामुळे जर निप्पल्स आत गेलेले दिसले तर ही गोष्ट दुर्लक्ष करण्यासारखी नाही, हे लक्षात घ्यावे.  

 

या पुरुषांना आहे स्तनाच्या कर्करोगाचा धोका ज्याप्रमाणे ज्या महिलांच्या आई, आजी, मावशी, आत्या या जवळच्या नात्यातल्या महिलांना स्तनाचा कर्करोग झाला असेल, तर त्या महिलांना अनुवंशिकतेमुळे कर्करोग होण्याचा धोका जास्त असतो. तसेच पुरुषांच्या बाबतीतही आहे. ज्या पुरुषांच्या रक्ताच्या नात्यातील महिलांना स्तनाचा कर्करोग झाला आहे, अशा पुरुषांना या आजाराचा धोका तुलनेने अधिक आहे. 

 

टॅग्स : आरोग्यस्तनाचा कर्करोगस्तनांची काळजीहेल्थ टिप्स