Join us   

Breast Cancer : कॅन्सरची लक्षणं ठरतात स्तनांमध्ये दिसणारे हे बदल; धोका टाळण्यासाठी काय खायचं, काय नाही? वाचा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2021 5:36 PM

Breast Cancer Stages Symptoms and Preventions : स्तनाचा कर्करोग झालेल्या स्त्रिया त्यातून पूर्णपणे बऱ्या होण्याचे प्रमाण भारतात कमी आहे कारण हा आजार झाला आहे हेच मुळात उशिरा लक्षात येते.

स्तनाचा कर्करोग (Breast cancer)  हा भारतीय महिलांच्या बाबतीत एक सर्वसामान्य आजार बनत चालला आहे.  कर्करोग त्याच्या वाढीच्या अधिक पुढच्या टप्प्यांपर्यंत पोहोचलेला असल्यास त्यातून सुटका होणे अधिक जास्त जिकिरीचे होऊन बसते आणि भारतीय महिलांमध्ये ५०% पेक्षा जास्त जणी तिसऱ्या व चौथ्या टप्प्यातील स्तनाच्या कर्करोगाने ग्रस्त असतात.

स्तनाच्या कर्करोगातून सुखरूप सुटका झालेल्या स्त्रियांचे प्रमाण भारतात कमी असण्याचे सर्वात प्रमुख कारण म्हणजे आजाराविषयीच्या जागरूकतेचा अभाव आणि आजाराच्या अगदी सुरुवातीच्या टप्प्यात तपासणी न केली जाणे हे आहे. याबाबत डॉ. भाविशा घुगरे, (कन्सल्टन्ट, सर्जिकल ऑन्कोलॉजी, कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल, मुंबई) यांनी अधिक माहिती दिली आहे. 

स्तनाचा कर्करोग झालेल्या स्त्रिया त्यातून पूर्णपणे बऱ्या होण्याचे प्रमाण भारतात कमी आहे कारण हा आजार झाला आहे हेच मुळात उशिरा लक्षात येते.  ही परिस्थिती बदलण्यासाठीचा एकमेव उपाय म्हणजे जागरूकता वाढवणे हा आहे.  स्तनाच्या कर्करोगावर उपचार केले जाऊ शकतात आणि हा आजार जर वेळीच लक्षात आला तर तो पूर्णपणे बरा करता येण्याची शक्यता खूप जास्त असते.

आजार लवकरात लवकर लक्षात यावा यासाठीच्या तीन प्रमुख बाबी पुढीलप्रमाणे आहेत:

स्तनांची स्वतः तपासणी करणे  

मॅमोग्राम 

क्लिनिकल तपासणी 

स्तनांची स्वतः तपासणी करणे ही महिलांसाठी स्वतःच्या स्तनांना समजून घेण्याची संधी असते.  दर महिन्याला नियमितपणे स्तन आणि काखेच्या भागाची स्वतः तपासणी केल्यास त्याठिकाणी काही बदल झाला असल्यास तो चटकन लक्षात येतो.

 वयाच्या विसाव्या वर्षापासून स्व-तपासणीला सुरुवात करावी. चाळीस वर्षे आणि त्यापेक्षा अधिक वयाच्या महिलांनी दरवर्षी मॅमोग्राम करून घेतला पाहिजे.  स्तनामध्ये छोट्या गाठी तयार होणे, त्यावरील त्वचा सुरकुतणे, त्वचेच्या रंगामध्ये बदल होणे, स्तनाग्रे आत ओढली जाणे, स्तनाग्रांमधून द्रव बाहेर येणे यासारखे कोणतेही, अगदी थोड्या प्रमाणातील बदल जरी होत असतील तरी महिलांना त्याची त्वरित जाणीव होणे खूप आवश्यक आहे.

स्तनाच्या कर्करोगामागील एक प्रमुख जोखीम म्हणजे स्थूलपणा. प्रत्येक महिलेने आपले वजन निरोगी व संतुलित राखणे आवश्यक आहे.  मद्यपान, धूम्रपान, व्यायामाचा अभाव, कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला कर्करोग झालेला असणे या देखील इतर काही बाबी आहेत ज्यामुळे स्तनाचा कर्करोग होण्याचा धोका वाढतो.  संशोधनातून असे देखील आढळून आले आहे की ड जीवनसत्त्वाच्या कमतरतेचा देखील स्तनाच्या कर्करोगाच्या वाढलेल्या प्रमाणाशी  तसेच रोगनिदान नीट न केले जाण्याशी  जवळचा संबंध आहे.

स्तनाचा कर्करोग फक्त वयस्क स्त्रियांनाच होतो आणि स्तनातील कर्करोगाच्या गाठी नेहमीच वेदनादायी असतात हे या आजाराविषयीचे सर्वात मोठे गैरसमज आहेत.  पुरुषांमध्ये देखील स्तन पेशी असतात आणि या पेशींमध्ये देखील कर्करोगजन्य बदल होऊ शकतात.  पुरुषांमध्ये स्तनाच्या कर्करोगाचे सर्वात प्रमुख लक्षण म्हणजे स्तनातील गाठ.

आजाराला प्रतिबंध घातल्याने आपण त्या आजारापासून पूर्णपणे मुक्त होण्याच्या अधिक जवळ जातो.  वजन नियंत्रणात राखणे, धूम्रपान न करणे, अल्कोहोल टाळणे आणि शारीरिकदृष्ट्या सक्रिय राहणे या गोष्टी करून स्तनाच्या कर्करोगाचा धोका कमी केला जाऊ शकतो. 

स्तनाचा कर्करोग झाला आहे हे निदान केले जाणे ही बाब त्या व्यक्तीच्या शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी अतिशय धक्कादायक ठरू शकते. पण संशोधनातून असे सिद्ध झाले आहे की, पूरक उपचार म्हणून योगासनासारख्या व्यायामांना लवकरात लवकर सुरुवात केल्याने जीवनाच्या गुणवत्तेवर सकारात्मक प्रभाव पडतो व शारीरिक क्षमता सुधारते.    स्तनाच्या कर्करोगाशी लढा देण्याचे सर्वात महत्त्वाचे हत्यार म्हणजे आजार लवकरात लवकर लक्षात येणे हे आहे.  स्तनांची तपासणी करवून घेण्यासाठी लाजणे, आढेवेढे घेणे महिलांनी निग्रहपूर्वक सोडून दिले पाहिजे. 

स्तनाच्या कर्करोगाचा धोका टाळता यावा यासाठी खाण्याच्या कोणत्या सवयी चांगल्या अशा स्वरूपाचे प्रश्न एक डॉक्टर म्हणून मला बऱ्याचदा विचारले जातात. पाश्चिमात्त्य आहारासहित काही आहारांमध्ये प्रक्रिया केलेल्या खाद्यपदार्थांचे प्रमाण खूप जास्त असते, असा आहार घेत राहिल्याने स्तनाच्या कर्करोगाचा धोका वाढतो.  तसेच काही अन्नपदार्थ असे देखील असतात जे या आजाराविरोधात आपले संरक्षण करू शकतात.  संशोधनांमध्ये असे आढळून आले आहे की, पुढील अन्नपदार्थांचा नियमित आहारात समावेश करून तुम्ही स्वतःला स्तनाचा कर्करोग होण्याचा धोका कमी करू शकता.

हिरव्या पालेभाज्यांमध्ये कॅरोटेनॉइड आणि बीटा कॅरोटीन, ल्युटीन आणि झिझेथिन यांसह इतर अँटिऑक्सिडंट्स असतात. 

सिट्रस (लिंबूवर्गीय) फळे - अँटिऑक्सिडंट्स, अँटी-कॅन्सर व अँटी-इन्फ्लेमेटरी प्रभाव करतात.  ८००० पेक्षा जास्त व्यक्तींवर करण्यात आलेल्या ६ संशोधनांमध्ये आढळून आले आहे की सिट्रस फळांच्या नियमित सेवनामुळे स्तनाच्या कर्करोगात १०% घट होते.  

फॅटी मासे - यांमध्ये देखील कर्करोगापासून बचाव करण्याचे गुणधर्म असतात.  फॅटी मासे जास्त प्रमाणात खाऊन ओमेगा ३ ते ओमेगा ६ संतुलित करून आणि रिफाईंड तेल व प्रक्रिया केलेले खाद्यपदार्थ कमी करून तुम्ही स्तनाच्या कर्करोगाचा धोका कमी करू शकता. 

बेरी फळे 

आंबवलेले अन्नपदार्थ - दही 

पीच, सफरचंद, पेर 

कोबीवर्गीय भाज्या - कोबी, ब्रोकोली 

शेंगावर्गीय भाज्या 

करक्युमिन - यामध्ये कर्करोगाविरोधी गुणधर्म लक्षणीय प्रमाणात असतात.  कर्करोगाचा धोका ज्यामुळे वाढू शकतो अशा अन्नपदार्थांमध्ये अल्कोहोल, फास्ट फूड, तळलेले पदार्थ, प्रक्रिया केलेले मांस, अतिरिक्त साखर, रिफाईंड कर्बोदके यांचा समावेश होतो.  

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्यस्तनांची काळजीस्तनाचा कर्करोग