Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > Breastfeeding week 2022 : स्तनपानामुळे स्तन ओघळल्यासारखे दिसतात? स्तनपानाबद्दलचे समज गैरमसज... तज्ज्ञ सांगतात

Breastfeeding week 2022 : स्तनपानामुळे स्तन ओघळल्यासारखे दिसतात? स्तनपानाबद्दलचे समज गैरमसज... तज्ज्ञ सांगतात

Breastfeeding week 2022 : गरोदरपणाचा संपूर्ण कालावधी झाल्यावर जन्माला आलेल्या बहुतांश बाळांच्या बाबतीत आईचे दूध आपोआप येते ही बाब जरी खरी असली तरी हा काही नियम नाही आणि सर्वांच्याच बाबतीत हे होत नाही.  

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2022 06:58 PM2022-07-31T18:58:14+5:302022-07-31T19:38:51+5:30

Breastfeeding week 2022 : गरोदरपणाचा संपूर्ण कालावधी झाल्यावर जन्माला आलेल्या बहुतांश बाळांच्या बाबतीत आईचे दूध आपोआप येते ही बाब जरी खरी असली तरी हा काही नियम नाही आणि सर्वांच्याच बाबतीत हे होत नाही.  

Breastfeeding week 2022 : Myths Vs Facts Breastfeeding | Breastfeeding week 2022 : स्तनपानामुळे स्तन ओघळल्यासारखे दिसतात? स्तनपानाबद्दलचे समज गैरमसज... तज्ज्ञ सांगतात

Breastfeeding week 2022 : स्तनपानामुळे स्तन ओघळल्यासारखे दिसतात? स्तनपानाबद्दलचे समज गैरमसज... तज्ज्ञ सांगतात

गरोदरपणात,बाळंत झाल्यानंतर आईच्या मनात स्तनपानाविषयी अनेक प्रश्न येत असतात.आपण बाळाला दूध योग्य पद्धतीने पाजू शकू का? बाळाला पुरेसे दूध मिळेल का? स्तनपानामुळे आपले शरीर बेढब तर दिसणार नाही ना? आपण नोकरी, व्यवसायाला सुरुवात कशी करणार? असे अनेक प्रश्न आणि प्रत्येक प्रश्नासोबत येते गैरसमजूतींची एक मोठी यादी.... 

अनुभवी माता आणि घरातील, कुटुंबातील, शेजारपाजारच्या, ओळखीच्या इतर महिला या यादीत आपआपल्या परीने भर टाकतच असतात. (Breastfeeding week 2022) नेहा पवार कन्सल्टन्ट, गायनॅकॉलॉजी (कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल,मुंबई) यांनी याबाबत लोकमत सखीला अधिक माहिती दिली आहे.  (Myths Vs Facts Breastfeeding)

बाळाचे संगोपन करणे,खासकरून त्याला स्वतःचे अंगावरचे दूध पाजणे हा एक अतिशय खास आणि खूप सुंदर अनुभव असतो, या अनुभवाला, नव्हे या आनंदाला आत्मविश्वासाने सामोरे जाता यावे यासाठी योग्य माहितीची गरज असते. योग्य माहिती जर तुमच्याकडे असेल तर प्रसूतीनंतर येणारा ताण, उद्भवणाऱ्या चिंता बऱ्याच प्रमाणात कमी होऊ शकतात. 

याठिकाणी आपण काही सर्वसाधारण गैरसमजुतींविषयी चर्चा करणार आहोत. स्तनपान करणाऱ्या आईनेच नव्हे तर, तिच्या कुटुंबियांनी, तिची व बाळाची काळजी घेणाऱ्या इतर व्यक्तींनी देखील या गैरसमजूती समजून घेऊन दूर केल्या पाहिजेत. प्रत्येक बाळाला आईचे अंगावरचे दूध पाजले जाण्याला प्रोत्साहन देणारे वातावरण निर्माण व्हावे यासाठी हे खूप गरजेचे आहे.

गैरसमज:

स्तनपान ही सोपी आणि नैसर्गिक प्रक्रिया आहे आणि जर एखाद्या स्त्रीला स्तनपान करवण्यात अडचण येत असेल तर तिच्या दुधामध्येच काहीतरी समस्या आहे.  

तथ्य: 

गरोदरपणाचा संपूर्ण कालावधी झाल्यावर जन्माला आलेल्या बहुतांश बाळांच्या बाबतीत आईचे दूध आपोआप येते ही बाब जरी खरी असली तरी हा काही नियम नाही आणि सर्वांच्याच बाबतीत हे होत नाही.  बऱ्याचदा असे आढळून येते की, नवजात बाळाला योग्य पद्धतीने आणि बाळाची भूक भागेल इतके दूध पाजण्यासाठी आईला खूप धडपड करावी लागते.

ही धडपड, त्यातून येणारा ताण, प्रत्येक वेळी होणारी घाई यामुळे बहुतांश महिला बाळाला अंगावरचे दूध पाजण्याचे प्रयत्न सोडून देतात आणि बाळाला व स्वतःला खुश ठेवण्यासाठी फॉर्म्युला दुधाचा सोपा पर्याय स्वीकारतात. पण खरेतर अशावेळी गरज असते नेटाने योग्य प्रयत्न करत राहण्याची आणि स्तनपानाची योग्य प्रक्रिया नीट समजून घेण्यासाठी बाळाचे डॉक्टर किंवा लॅक्टेशन विशेषज्ञाची मदत घेण्याची.  नेमकी कोणती पद्धत सर्वात चांगली ठरेल हे समजून येण्यासाठी वेळ लागतो.  प्रसूतीनंतर पहिले काही दिवस किंवा आठवडे हा असा काळ असतो जेव्हा आई आणि बाळ एकमेकांविषयी समजून घेत असतात.  आपण एखाद्या गोष्टीचा सराव करतो त्याप्रमाणे नियमितपणे, नेटाने प्रयत्न करत राहा आणि लवकरच तुम्हाला तुमच्या बाळासोबत कसे वागायचे याची लय सापडेल.   

गैरसमज:

बाळ जन्मल्यानंतर पहिले काही दिवस जर दूध कमी येत असेल तर नवजात बाळाच्या आवश्यकता पूर्ण करण्यासाठी त्याला पाणी किंवा मध दिला पाहिजे. 

तथ्य: 

बाळ जन्मल्यानंतर सुरुवातीच्या दिवसात आईच्या अंगावर जे दूध येते त्याला कोलोस्ट्रम किंवा "तरल सुवर्ण" म्हटले जाते. या दुधामध्ये बाळाला आवश्यक असलेली सर्व पोषकतत्त्वे असतात. हे दूध जरी कमी प्रमाणात असले तरी नवजात बाळाचे छोटेसे पोट भरण्यासाठी पुरेसे असते.

गैरसमज:

स्तनपानामुळे स्तन ओघळल्यासारखे दिसतात. 

तथ्य: 

स्तन ओघळल्यासारखे दिसतात याचा दोष बाळाला दूध पाजावे लागण्याला देऊ नये. संशोधनातून असे आढळून आले आहे की, या काळात स्तनांचा आकार बदलतो याचे प्रमुख कारण गरोदरपणात होणारे हार्मोनल बदल आणि वजनात होणारे चढउतार हे आहे. वाढते वय आणि आनुवंशिकता हे देखील बऱ्याच अंशी कारणीभूत असतात. बाळाला अंगावरचे दूध पाजल्याने गरोदरपणात वाढलेले वजन कमी होण्यात मदत होते तसेच आईला मधुमेह, हायपरटेन्शन आणि पोस्टपार्टम डिप्रेशन होण्याचा धोका देखील कमी होतो. 

गैरसमज:

फॉर्म्युला दूध हे आईच्या अंगावरील दुधाइतकेच चांगले असते.  

तथ्य: 

आईचे अंगावरील दूध हे तिच्या बाळाच्या विकासाच्या प्रत्येक टप्प्यानुसार खास तयार होत असते.  त्यामध्ये पोषकतत्त्वे, अँटीबॉडीज, अँटी-व्हायरस शक्ती, हार्मोन्स आणि अँटी-ऍलर्जेन्स असतात जे तुमच्या बाळाला आजारांपासून दूर ठेवतात. आईचे दूध पचायला हलके असते. यामध्ये फॉर्म्युला दुधापेक्षा जास्त जीवनसत्त्वे व खनिजे असतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आईचे दूध ताजे, सुरक्षित असते, त्यासाठी वेगळा खर्च करावा लागत नाही. आईचे दूध बाळ कधीही, कुठेही सहज, अगदी आनंदाने पिऊ शकते.       

गैरसमज:

बाळाने दूध सोडल्यानंतर, स्तनपान करवणे हे बाळाला शांत करण्यापुरतेच उपयोगी असते. 

तथ्य:

बाळाने दूध सोडल्यानंतर देखील आईच्या अंगावरील दुधामध्ये भरपूर पोषकतत्त्वे आणि आरोग्यासाठी संरक्षक घटक असतात.  बाळाच्या शारीरिक गरजांनुसार आईच्या दुधातील घटक बदलत जातात.  अमेरिकन अकॅडेमी ऑफ पेडियाट्रिक्सने सांगितले आहे की दोन किंवा त्यापेक्षा मोठ्या वयाच्या बाळांना देखील आईचे अंगावरील दूध पाजले गेले पाहिजे.


गैरसमज:

बाळ जसजसे मोठे होत जाते, तसतसे आईचे दूध त्याच्या वाढीसाठी अपुरे पडू शकते.  फॉर्म्युला दूध किंवा पाणी किंवा गायीचे दूध लहान वयापासून सुरु केले पाहिजे. 

तथ्य:

बाळाला अंगावरील दूध पुरेसे आहे की नाही, बाळाचे पोट भरले की नाही हे समजून न आल्याने अनेक महिलांना चिंता वाटते.  बाळाची नीट वाढ होत असेल तर तुम्ही अगदी निवांत राहू शकता कारण बाळाला अंगावरून मिळणारे दूध अगदी पुरेसे आहे.

गैरसमज:

आईला फ्ल्यू किंवा कोविड संसर्ग झाला असेल तर तिने बाळाला अंगावर पाजणे थांबवावे. 

तथ्य:

जेव्हा तुम्ही सर्दी, ताप किंवा संसर्गामुळे आजारी पडता तेव्हा त्याला कारणीभूत असलेल्या जंतू, विषाणूला मारण्यासाठी तुमच्या शरीरात अँटीबॉडीज निर्माण होतात. हे जंतू आईच्या शरीरात निर्माण होणाऱ्या दुधात जात नाहीत पण अँटीबॉडीज मात्र त्या दुधात जातात. याचाच अर्थ असा की, तुम्हाला जरी बरे वाटत नसले तरी (अगदी कोविड-१९ संसर्ग झाला असेल तरी) तुमचे अंगावरील दूध तुमच्या बाळाला आजारी पडण्यापासून वाचवू शकते. 

गैरसमज:

बाळाला अंगावर पाजणारी महिला गरोदर राहू शकत नाही. 

तथ्य:

स्तनपानाचा ओव्यूलेशन आणि फर्टिलिटी (प्रजननक्षमतेवर) परिणाम होतो पण संततिनियमनाचा हा काही खात्रीशीर उपाय नाही.  बाळाला जन्म दिल्यानंतर जवळपास ६ महिन्यांनी आईची मासिक पाळी पुन्हा सुरु होते पण ओव्यूलेशन मात्र त्याच्या खूप आधी सुरु झालेले असते, खासकरून स्तनपान न करवणाऱ्या महिलांमध्ये ओव्यूलेशन घडून येण्यास आधीच सुरुवात झालेली असते. संततीनियमनाचे असे अनेक पर्याय उपलब्ध आहेत ज्यामुळे स्तनपानात काहीही अडथळा येत नाही. नको असलेले गर्भारपण टाळण्यासाठी  सुरक्षित पर्यायांचा अवश्य उपयोग करावा.      

Web Title: Breastfeeding week 2022 : Myths Vs Facts Breastfeeding

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.