आपल्या दैनंदिन जीवनात स्वयंपाकघरातील भांडी खूप महत्त्वाची असतात. परंतु अलीकडील एका अभ्यासात, तज्ज्ञांनी इशारा दिला आहे की, स्वयंपाकघरातील काही भांडी आपल्या आरोग्यासाठी धोकादायक असू शकतात, विशेषतः कॅन्सरसारख्या गंभीर आजारांचं कारण ठरू शकतात. या अभ्यासानुसार, स्वयंपाकघरातील भांड्यांमध्ये असलेलं मायक्रो प्लास्टिक आपल्या आरोग्यासाठी मोठा धोका निर्माण करू शकतात.
डेली मेलमधील एका वृत्तानुसार, तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, अनेक भांड्यांमध्ये प्लास्टिकचे कण असतात जे उष्णतेच्या संपर्कात आल्यानंतर आपल्या अन्नात विरघळू शकतात. हे मायक्रो प्लास्टिकचे कण शरीरात जमा होऊ लागतात, ज्यामुळे आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. शरीरात मायक्रोप्लास्टिक जमा झाल्यामुळे कॅन्सर, हार्मोनल असंतुलन आणि इतर गंभीर आजार होऊ शकतात, असंही या अभ्यासातून समोर आलं आहे.
तज्ज्ञ काय म्हणतात?
तज्ज्ञांचं म्हणणं आहे की स्वयंपाकघरात वापरली जाणारी काही भांडी जसं की प्लास्टिकची भांडी, काही नॉन-स्टिक पॅन आणि प्लास्टिक रॅप्समध्ये मायक्रोप्लास्टिक्स असू शकतात. ही भांडी उष्णतेच्या संपर्कात येताच हे कण बाहेर येतात, जे नंतर आपल्या अन्नात मिसळतात. त्याचे दीर्घकालीन परिणाम शरीरात विविध प्रकारच्या आजारांच्या स्वरूपात दिसून येऊ शकतात.
यावर उपाय काय?
अशा भांड्यांचा वापर ताबडतोब थांबवावा असं शास्त्रज्ञांचं मत आहे. लोकांनी स्टेनलेस स्टील, काच आणि बांबूपासून बनवलेली भांडी वापरावीत, जी आरोग्यासाठी सुरक्षित मानली जातात. प्लास्टिकची भांडी आणि नॉन-स्टिक पॅनचा वापर कमीत कमी करा, कारण त्यातून बाहेर पडणारे मायक्रो प्लास्टिक कण आपल्या आरोग्यावर दीर्घकालीन परिणाम करू शकतात.