- डॉ.श्रृती काटे (कन्सल्टंट, मेडिकल ऑन्कॉलॉजी) भारतात कर्करोग ही अत्यंत गंभीर आरोग्य समस्या म्हणून पुढे येते आहे. ग्लोबोकॅन डेटा २०२० नुसार भारतात एकूण कर्करोगग्रस्तांपैकी स्तनांच्या कर्करोगाचे प्रमाण १३.५ टक्के (१ लाख ७८ हजार ३६१) इतके आहे. त्याहून गंभीर म्हणजे मृत्यूचे प्रमाण १०.६ टक्के (९० हजार ४०८) इतके आहे. अन्य वेगवेगळ्या कर्करोगांच्या प्रमाणातही झपाट्याने वाढ होते आहे. आता विषय येतो की, आपण कर्करोगाचा संभाव्य धोका टाळू शकतो का? तर बऱ्याच प्रमाणात आपण कर्करोगाचा धोका टाळू शकतो. त्यासाठी पौष्टिक व योग्य आहार, जीवनशैलीतील बदल अंगीकारून व विशेषतः महिलांनी मासिक पाळीदरम्यान स्वच्छता पाळताना कर्करोगापासून आपला बचाव करून घेता येऊ शकतो. सध्याच्या निरीक्षणांनुसार पाश्चात्त्य देशांच्या तुलनेत भारतातील महिलांमध्ये युवा वर्गात स्तनांच्या कर्करोगाचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. आयसीएमआर यांच्या अभ्यासानुसार ९ पैकी १ व्यक्तीला त्यांच्या जीवनमानात कर्करोगाला तोंड द्यावे लागते. आणखी विश्लेषण केल्यास ६८ पैकी १ पुरुषाला फुफुसाचा कर्करोग होण्याचा धोका असतो. तर २९ पैकी १ महिलेला स्तनाचा कर्करोग होण्याचा धोका उद्भवतो. परिस्थितीचे आकलन झाले असले तरी आपण कर्करोग कशा प्रकारे टाळू शकतो, यावर अधिक भर देणे आवश्यक आहे. जीवनशैलीतील व्यापक बदल करून स्तनांच्या कर्करोगापासून बचाव करता येऊ शकतो. आनुवंशिक बदल, पेशींचे (हार्मोनल) बदल, आणि रोगप्रतिकारक यंत्रणा असे अंतर्गत घटक आदींमुळे कर्करोगाची शक्यता बळावते. दुसरीकडे पर्यावरणीय, व आहार-विहाराशी निगडीत जसे की तंबाखूचे सेवन, आहार, रेडिएशन आणि संसर्ग यांचाही प्रभाव पडतो. शास्त्रोक्त विश्लेषणानुसार कर्करोगामुळे होणाऱ्या मृत्यूंपैकी सुमारे २५ ते ३० टक्के मृत्यू तंबाखू सेवनामुळे होत असून, ३० ते ३५ टक्के आहाराशी निगडित आहेत, १५ ते २० हे संसर्गाशी निगडित आहेत. उर्वरित मृत्यू हे प्रदूषण, रेडिएशन, तणाव, शारीरिक व्यायामाचा अभावासह अन्य विविध कारणांनी होत आहेत. कुठल्याही स्वरूपातील तंबाखूचे सेवन हे कर्करोगासाठी कारणीभूत ठरू शकते. तंबाखूमध्ये असलेल्या ७०० हून अधिक रसायनांपैकी ५० पेक्षा अधिक रसायनांमुळे कर्करोग होण्याची शक्यता असते. भारतामध्ये धूम्रपानाची सवय धोकादायकरीत्या वाढत असून त्यावर नियंत्रण आणायला हवे.
काय करता येईल?
१. पौष्टिक आहार महत्त्वाचा पौष्टिक आहार शैलीमुळे कर्करोगाचा धोका १० ते २० टक्यांपर्यंत कमी करण्यास मदत होऊ शकते. पुरुष असो किंवा महिला प्रत्येकाने आपल्या आहार पद्धतीत सुधारणा करणे अपेक्षित आहे. २. वजन मर्यादित ठेवणे उत्तम डब्ल्यूसीआरएफ / एआयसीआर यांच्यातर्फे मेटा ॲनालिसिस करण्यात आले. त्यानुसार बॉडी मास स इन्डेक्स (बीएमआय) मध्ये दर्शविल्यापेक्षा अतिरिक्त चरबी (फॅट्स), कंबरेचा मोठा घेर आणि कंबर व नितंबांचे विस्कळीत प्रमाण यांमुळे काही प्रकारच्या कर्करोगांचा धोका वाढल्याचे पुरावे आढळले आहेत. ३. आहार बजावतो महत्त्वाची भूमिक मांसाहार (रेड मिट) चे अतिसेवन टाळायला हवे. असा कुठला आहार नाही, ज्यामुळे कर्करोग न होण्याची शाश्वती दिली जाईल. परंतु काही खाद्य पदार्थ आहेत, ज्यांमुळे कर्करोग होण्याचा धोका कमी करता येऊ शकतो. विशेषतः आतड्यांच्या कर्करोगाबाबत आहार महत्वाचाच ठरतो. उच्च-फायबरयुक्त आहार- तृणधान्यांच्या सेवनातून उच्च फायबरयुक्त आहार मिळविता येऊ शकतो. यामुळे वजन वाढणे, लठ्ठपणा यांसारख्या कारणांमुळे कर्करोगाचा संभाव्य धोका कमी करता येऊ शकतो, असे अभ्यासातून समोर आले आहे. किमान पाच प्रकारची फळं, पालेभाज्यांचा दैनंदिन आहारात समावेश करतांना शरीराला पोषक घटक प्राप्त करून द्यावे. फॉलीक ॲसिड, फायबर, विटॅमिन्स सी व ई यांसह सेलेनियम अशा विविध घटकांमुळे सुदृढ राहाण्यास मदत होते. ४. मद्यपानाला मर्यादा हवी. मद्यपानाच्या अतिसेवनामुळे तोंडाचा, अन्ननलिकेचा, यकृत तसेच स्तनांच्या कर्करोगाचा धोका अधिक असल्याचे शास्त्रोक्त अध्ययनातून स्पष्ट झाले आहे. दर दिवशी प्रति १० ग्रॅम अल्कोहोलचे सेवन हे कर्करोग होण्याचा धोका ४ ते २५ टक्यांपर्यंत वाढविते. जवळपास सर्वच मद्याचे प्रकार कर्करोगासाठी समसमान कारणीभूत असल्याचेही अध्ययनातून समोर आलेले आहे. ५. फास्ट फूडचा मोह आवरा. चव व आकर्षणापोटी फास्टफूडचे सेवन वाढते आहे. परंतु बर्गर, फ्राईड चिकन, फ्रेंच फ्राईज, हाय कॅलरी ड्रिंक्स (शर्करा असलेले सोडा, शेक व अन्य आरोग्यासाठी अपायकारक पेय) यामुळेदेखील कर्करोग होण्याची शक्यता बळावते. ६. मासिक पाळीदरम्यान स्वच्छता गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाचे महिलांमध्ये प्रमाण वाढत असून, स्वच्छतेचा अभाव, मासिकपाळीदरम्यान स्वच्छतेकडे दुर्लक्ष आदींमुळे संसर्ग होऊन गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग होतो आहे. त्यामुळे नियमित स्वच्छता राखण्यासह मासिक पाळीच्या काळात महिलांनी विशेष शारीरिक स्वच्छतेवर भर द्यावा. त्यासाठी पाळीदरम्यान दर ३-४ तासांनी पॅड बदलणे, स्वच्छता राखतांना सदरचा भाग कोरडा व स्वच्छ ठेवणे. सार्वजनिक ठिकाणच्या प्रसाधनगृहांचा वापर टाळणे. योनीच्या भागात पुरळ, खाज येत असेल तर दुर्लक्ष न करता उपचार घेणे. वावरण्यास सुलभ ठरतील असे अंतरवस्त्र परिधान करणे. पाळीदरम्यान वापरलेले सॅनेटरी पॅडची योग्य विल्हेवाट लावत संसर्ग पसरण्यापासून टाळावा. ५. ह्यूमन पॅपिलोमाव्हायरस (एचपीव्ही) लसीकरण- गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग टाळण्यासाठी एचपीव्ही लसीकरण हा अत्यंत प्रभावी उपाय आहे. लहान मुली किंवा युवतींचा कर्करोगापासून बचाव करण्यासाठी लसीकरण करून घेतले पाहिजे. तसेच पॅप स्मेअर चाचणी व एचपीव्ही चाचणी या माध्यमातून वेळोवेळी तपासण्या करून घेतांना कर्करोगाचा संभाव्य धोका जाणून घेता येऊ शकतो. व त्यावर वेळीच उपचार करून गुंतागुंत टाळता येऊ शकते.
(लेखिका, कन्सल्टंट, मेडिकल ऑन्कॉलॉजी आहेत.) अधिक माहिती आणि संपर्क HCG मानवता कॅन्सर सेंटर् उमेद पेशंट सपोर्ट ग्रुप umed.warriors@gmail.com फोन- 9145500381