यंदाचा उन्हाळा भयंकर आहे असे आपण गेली काही वर्षे सतत म्हणतो आहोतच. पण यंदा मात्र एप्रिलमध्येच ऊन खूप वाढते आहे. दिवसा घराबाहेर पडलं की ऊन भाजून काढतं. त्यामुळे उष्णतेचे विकार वाढणार आहेत आणि आपल्यालाच नेमकं कळत नाही की सायंकाळी भयंकर तगमग होते. उन्हातून आल्यावर घेरी येते. मलमळतं. डोळ्यांची आग होते. मळमळ-उलटी-जुलाबही होतात. हे सारं म्हणजे केवळ ऊन लागणं, उष्णतेचा त्रास की उष्माघात हे कसं ओळखायचं?
(Image : google)
उष्माघात म्हणजे काय? वैद्य राजश्री कुलकर्णी सांगतात..
१. प्रदीर्घ काळ तीव्र सूर्यप्रकाशात राहिल्यामुळे शरीराचे तापमान खूप वाढल्यामुळे जी स्थिती निर्माण होते त्याला उष्माघात म्हणतात. २. मार्च ते जून महिन्यात जेव्हा उन्हाची तीव्रता अत्यधिक असते आणि दिवसाच्या साधारण ११ ते ४ या वेळात जर असं ऊन लागलं तर होणारे परिणाम अतिशय तीव्र,वेगवान व गंभीर असतात. ३. अधिक काळ उन्हाशी संपर्क आल्यामुळे शरीराचे तापमान खूप वाढते, म्हणजे 40 अंश सेल्सिअस किंवा त्यापेक्षाही जास्त होते.
४. मनाची स्थिती बिघडते, गोंधळ होतो. व्यक्ती असंबंध बडबड करते. ५. चिडचिड करते. जिभ जड होते. ६. चक्कर येते,थकवा येतो. ७. खूप जास्त घाम येतो. ८. पायात गोळे येतात. ९.डोकं खूप दुखतं. मळमळ व उलटी होणे.
उष्माघात टाळण्यासाठी काय कराल? १. गरज नसेल तर उन्हात बाहेर फिरु नये. दुपारी तर नाहीच. बाहेर जाताना गॉगल, टोपी, पाणी, सोबत हवे. सन कोट हवा. जर काही कारणानं बाहेर जावं लागलंच तर उन्हापासून संरक्षण होईल अशी सर्व काळजी घेणं गरजेचं आहे, म्हणजे,डोक्यावर टोपी अथवा रुमाल, छत्री , २. भरपूर पाणी प्यावे, इतर द्रवपदार्थ, सरबत, ताक, पन्हं असे द्रव घेत राहावेत. ३. डॉक्टरांचा सल्ला तातडीने घ्यावा.