डॉ. दाक्षायणी पंडित
विज्ञानातील संशोधनामुळे आपल्या जीवनात खूप सकारात्मक बदल घडून आले आणि त्यामुळे मानवी आयुष्य अतिशय सुखकर झाले आहे. यातीलच एक म्हणजे लसीकरण. सुरुवातीच्या लसी या मुख्यत्वे संसर्गजन्य आजारांना कारणीभूत असलेल्या रोगजंतूंविरुद्ध निर्माण करण्यात आल्या व त्यांना भरपूर यशही मिळाले. यामुळे अनेक संसर्गांमुळे होणाऱ्या मृत्यूंच्या प्रमाणात लक्षणीय घट झाली. नंतरही नवनवे जंतू येवून नवे आजार पसरवू लागले पण आता शास्त्रज्ञ लसी बनवण्यात तरबेज झाले आहेत. त्वरेने संशोधन करून लस निर्मिती करणे व लोकांचे प्राण वाचवणे हे आता नेहमीचे झाले आहे.
संसर्गजन्य आजारांवर बऱ्यापैकी नियंत्रण आले तोपर्यंत कर्करोग वाढला होता. विविध कर्करोगांचे प्रमाण वाढू लागले होते. आता शास्त्रज्ञांनी तिकडे मोर्चा वळवला. भारतातील आकडेवारी असे दर्शवीत होती की महिलांमध्ये सर्वात जास्त प्रमाणात आढळणारा कर्करोग हा गर्भाशय ग्रीवेचा - गग्रिक (Cervical Cancer) होता तर पुरुषांमध्ये फुफ्फुसाचा कर्करोग प्रथम स्थानी होता. या दोन्ही कर्करोगांवर वेगाने संशोधन सुरु झाले.
शास्त्रज्ञांना गग्रिकच्या गाठींच्या नमुन्यात एक विषाणू सातत्याने सापडत होता. शरीराबाहेर या विषाणूची वाढ करून त्याच्यावर असंख्य चाचण्या केल्यावर गग्रिक व विषाणू यांच्यातील कार्यकारणभाव समजला. त्याचा संसर्ग स्त्रियांना लैंगिक संबंधातून होतो हेही कळले. शास्त्रज्ञ धडाडीने कामाला लागले आणि या विषाणू विरुद्ध लस तयार करण्यात त्यांना यश आले. ह्या विषाणूचे नाव ह्यूमन पॅपिलोमा विषाणू-एचपीव्ही (Human Papilloma Virus- HPV). हा लैंगिक संबंधातून स्त्रीच्या योनीमार्गात उतरतो. तिथल्या आवरणाच्या पेशींमध्ये घुसून त्यांचा केंद्रातील डीएनएमध्ये चिकटतो. तिथे तो अनेक वर्षे सुप्तावस्थेत राहतो. आणि मग अचानक वाढीला लागून तो गग्रिकची निर्मिती करतो. गग्रिकच्या जवळजवळ सर्व रुग्णांमध्ये एचपीव्ही सापडतो. HPVचे सुमारे २०० भाऊबंद आहेत, व त्यांना १ ते २०० क्रमांक दिले आहेत. यापैकी १६, १८, ३१, व ४५ हे सर्वाधिक कर्ककारक आहेत.
लस- एचपीव्हीचे १६, १८, ३१, ४५ हे चार विषाणू वापरून लस बनवतात. आपल्याकडे गारडॅसिल व सर्व्हारीक्स या दोन लसी उपलब्ध आहेत.
केव्हा व किती मात्रा घ्यायच्या?- पहिल्या लैंगिक संबंधापूर्वी देणे. साधारण वय वर्षे ९ ते २६ पर्यंत दिल्यास उत्तम संरक्षण होते. जितकी लवकर लस घ्याल तेव्हढे संरक्षण अधिक.
१) १५ व्या वर्षापर्यंत- पहिली मात्रा घेतल्यानंतर ६ महिन्यांनी दुसरी मात्रा.
२) १५ ते २६ वर्षापर्यंत- पहिल्या मात्रेनंतर १ महिन्याने दुसरी मात्रा
३) पहिल्या मात्रेनंतर ६ महिन्यांनी तिसरी मात्रा
हे इंजेक्शन दंडावर देतात. याचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत. त्यामुळे ही लस नक्की घ्या, आपल्या मुलींना द्या व आपल्या मैत्रिणींना परिचितांना सर्वांना सांगा आणि या कर्करोगापासून स्वतःचे आणि इतर स्त्रियांचे संरक्षण करण्याच्या कार्यक्रमात सहभागी व्हा.
(लोखिका एम बी बी एस, एम डी. असून डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथील सूक्ष्मजीवशास्त्र विभाग व चिकित्सा प्रयोगशाळेच्या प्रमुख निवृत्त प्राध्यापिका आहेत. )