Join us   

चांदीपुरा व्हायरस इन्फेक्शन नक्की काय आहे? लहान मुलांनाच हे इन्फेक्शन का होतं आहे, वाचा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2024 3:14 PM

Tips to protect your kids from deadly chandipura virus : गुजरातमधे लहान मुलांना चांदीपुरा व्हायरसचं इन्फेक्शन होत आहे, ते नक्की काय आहे..

सध्या सर्वत्र चर्चा आहे ती गुजरातमध्ये शिरकाव केलेल्या चांदीपुरा व्हायरसची. गुजरातमध्ये या व्हायरसने खूप मोठ्या प्रमाणावर कहर केला आहे. एकापाठोपाठ एक नवीन व्हायरसच्या प्रवेशामुळे नागरिकांमध्ये भीती आणि चिंतेचे वातावरण दिसत आहे. नुकतेच सगळे कोरोना व्हायरसच्या भीतीतून सावरले असता, त्यातच एका नवीन व्हायरसने गुजरातमध्ये दहशत निर्माण केली आहे.  गुजरातमधील चांदीपुरा व्हायरसची (Chandipura virus) वाढती प्रकरणे आणि त्यामुळे होणारे मृत्यू यामुळे चिंतेमध्ये वाढ झाली आहे(What is Chandipura virus, how does it spread).

१९६५ मध्ये पहिल्यांदा दिसलेला चांदीपुरा व्हायरस पुन्हा एकदा गुजरातमध्ये डोकं वर काढत असल्याचे चित्र दिसत आहे.   गेल्या दोन आठवड्यात या विषाणूमुळे आतापर्यंत १५ जणांचा मृत्यू झाला आहे. गुजरातमधील १२ जिल्ह्यांमध्ये हा व्हायरस पसरला आहे. गुजरातमधील साबरकांठा आणि अरावलीमध्ये या व्हायरसचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. चांदीपूर व्हायरसमुळे अरवली साबरकांठामधील ग्रामीण भागात भीतीचे वातावरण आहे. हा व्हायरस प्रामुख्याने लहान मुलांसाठी अधिक धोकादायक असल्याचे सांगितल जाते आहे. त्यामुळे या व्हायरसची मुलांना लागण होऊ नये म्हणून त्यांची विशेष काळजी घेणे गरजेचे असते(What is the Chandipura virus Know the symptoms, treatment, prevention, and more)

चांदीपुरा व्हायरस म्हणजे काय?

चांदीपुरा विषाणू हा आरएनए विषाणू आहे, जो सामान्यतः मादी फ्लेबोटोमाइन माशीद्वारे पसरतो. चांदीपुरा डास, माशा आणि किटकांद्वारे पसरतो. चांदीपुरा व्हायरस हा माशी किंवा डास चावल्यामुळे होणारा संसर्गजन्य आजार आहे. महाराष्ट्रात  १९६६ मध्ये पहिल्यांदाच यासंबंधीचे प्रकरण समोर आले. नागपूरच्या चांदीपूर गावात हा व्हायरस पहिल्यांदा आढळून आला, म्हणून त्याला 'चांदीपुरा व्हायरस' असे नाव देण्यात आले. त्यानंतर २००४ ते २००६ आणि २०१९ मध्ये आंध्र प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये हा विषाणू आढळून आला. चांदीपुरा व्हायरसचे सर्वाधिक बळी १५ वर्षांखालील मुले आहेत. या वयातील मुलांमध्ये मृत्यूचे प्रमाण सर्वाधिक आहे.   

चांदीपुरा व्हायरसची लक्षणे कोणती ? 

चांदीपुरा व्हायरसची लागण झाल्यास प्रथम ताप येतो, याची लक्षणे थोडीफार फ्लूसारखीच आहेत. चांदीपुरा व्हायरसची लागण झाल्यास रुग्णाला ताप, डोकेदुखी, अंगदुखी, उलट्या, जुलाब, चक्कर येणे, मेंदूला सूज येणे अशी लक्षणे प्रामुख्याने दिसून येतात  यामुळे गंभीर एन्सेफलायटीस होतो. एन्सेफलायटीस हा एक आजार आहे ज्यामुळे मेंदूला सूज येते. काही रुग्णांमध्ये श्वासोच्छवासाचा त्रास आणि अशक्तपणा यांसारखी लक्षणेही दिसून आली आहेत. या आजारामुळे लहान मुलांच्या मेंदूला सूज येण्याचे प्रमाण अधिक दिसून आले आहे. 

हा व्हायरस लहान मुलांसाठी अधिक धोकादायक... 

'चांदीपुरा व्हायरस' हा लहान मुलांसाठी अधिक धोकादायक असल्याचे समोर येत आहे. चांदीपुरा व्हायरसची लागण प्रामुख्याने ९ ते १४ वर्षे वयोगटातील मुलांना होण्याची अधिक शक्यता आहे, आणि याचा मृत्यू दरही जास्त आहे. चांदीपुरा व्हायरसमुळे १०० पैकी ७० मुलांचा मृत्यू होऊ शकतो. यामध्ये मृत्युदर ५६ ते ७०% आहे. या व्हायरसची लागण झाल्यास फारच कमी वेळात म्हणजेच २४ ते ४८ तासांत मृत्यू होऊ शकतो. याचा लहान मुलांच्या  मेंदूवर फार लवकर परिणाम होणारं दिसत आहे.  यामुळे मूल कोमात जाऊन त्यांचा मृत्यूही होऊ शकतो.

हा व्हायरस विशेषत: लहान मुलांवर परिणाम करतो. 'चांदीपुरा व्हायरस' भारताच्या विविध भागांमध्ये, तसेच आशिया आणि आफ्रिकेतील इतर देशांमध्ये आढळून आला आहे. मध्य भारतात २००३ - २००४ दरम्यान या विषाणूचा उद्रेक झाला होता. या विषाणूमुळे त्यावेळी देशभरात ३२२ मुलांचा मृत्यू झाला. आंध्र प्रदेशात १८३, महाराष्ट्रात ११५ आणि गुजरातमध्ये २४ मृत्युंची नोंद करण्यात आली होती.

चांदीपुरा व्हायरस' पासून लहान मुलांचा बचाव कसा करावा ? 

चांदीपुरावर उपचारासाठी अद्याप कोणतेही औषध किंवा लस आलेली नाही. त्यामुळे, काळजी हा एकमेव पर्याय आहे. योग्य पोषण देणारा आहार, स्वच्छता, आरोग्य आणि जनजागृती यांद्वारे या व्हायरसचा प्रसार रोखण्यात मदत होऊ शकते.

१. डास, माश्या, किटकांपासून दूर राहावे.  २. लहान मुलांना फुल स्लिव्हचे कपडे घालावेत.  ३. डास चावण्यापासून वाचण्यासाठी रात्री शक्यतो मच्छरदाणी लावून त्यात झोपावे.  ४. मॉस्किटो रिपेलेंटचा वापर करावा.  ५. घरच्या खिडक्या दरवाजे बंद ठेवा.  ६. आरोग्यविषयक समस्या जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्स