आपलं खाणं हे आपलं औषध असतं आणि आजारी पडण्याचं कारणही. पचनाच्या संबंधित अनेक आजार खाण्याच्या चुकीच्या सवयीमुळे होतात. डॉक्टर जेव्हा खोलात जाऊन आपल्या खाण्या पिण्याच्या सवयीबद्दल विचारतात तेव्हा आपल्या सवयी आणि आपल्याला होणार्या त्रासाचा संबंध लक्षात येतो.
पचनासंबंधीचे अनेक विकार हे शिळ्या अन्नाचं सेवन केल्यानं उद्भवतात. म्हणून डॉक्टर, वैद्य ताजं आणि गरम जेवण करण्याचा सल्ला देतात. अनेकजण कौतुकानं सांगतात की, मला तव्यावरची गरम पोळीच लागते. पण ताटात गरम पोळीचा आग्रह धरणार्यांना पचनाच्या त्रासामुळे सारखा दवाखाना गाठावा लागतो. याचं कारण आहारतज्ज्ञांच्या मते शिळ्या कणकेच्या पोळ्या खाणं हे असतं.
Image: Google
कणिक मळणं ही अनेकजणींसाठी कंटाळवाणी बाब असते. तर काहीजणींना सकाळी किंवा संध्याकाळी स्वयंपाकाची घाई असते. कमी वेळात स्वयंपाक आटोपायचा असतो. कणिक मळणं, ती थोडा वेळ सेट होऊ देणं आणि मग पोळ्या करणं यात बराच वेळ जातो म्हणून अनेकजणी घाईच्या वेळेत पंचाईत नको म्हणून कणिक मळून फ्रिजमधे ठेवतात पोळ्या करण्याच्या आधी ती काहीवेळ बाहेर काढून मग पोळ्या करतात. ताज्या कणकेच्या तुलनेत शिळ्या कणकेच्या पोळ्या या रंगाने उतरलेल्या असतात, लाटतानाही पीठ सैल होत असल्यानं त्रास होतो हे जाणवतं, पण गरम पोळ्या तर मिळताय ना खायला या विचारानं पोळ्यांच्या रंग रुपाकडे दुर्लक्ष केलं जातं. पण शिळ्या कणकेच्या पोळ्या ताज्या असल्या तरी त्या खाणं आरोग्यासाठी हानिकारक असतं असं तज्ज्ञ सांगतात. कणिक मळल्यानंतर आंबण्याची प्रक्रिया सुरु होते. त्यात जिवाणू तयार व्हायला सुरुवात होते. तज्ज्ञांच्या मते शिळ्या कणकेच्या पोळ्या गरम असल्या तरी त्याने पोट बिघडणं, पोटात दुखणं, बध्दकोष्ठता, पचनाशी निगडित समस्या उद्भवतात.
Image: Google
शिळ्या कणकेच्या गरम पोळ्या आरोग्यास हानिकारक कशा याबद्दल नाशिकस्थित प्रसिध्द आयुर्वेद तज्ज्ञ वैद्य.राजश्री कुलकर्णी यांच्याशी बोलल्यानंतर केवळ शिळी कणीकच नाही तर शिळं अन्न आरोग्यास कसं घातक आहे याबद्दल त्यांनी सविस्तर सांगितलं.
शिळी कणकेच्या पोळ्या हानिकारक कशा?
वैद्य. राजश्री कुलकर्णी ( एम.डी. आयुर्वेद, नाशिक) सांगतात की, हल्लीच्या काळात फ्रिजचा वापर अनिवार्य झाला आहे. भाज्या, फळं रोज ताजे आणून खाणं शक्य नसतं. त्यामुळे भाज्या,फळं फ्रिजमधे ठेवून बाहेर काढून नॉर्मलला आल्यावर मग त्याचा वापर करणं योग्य. पण असे पदार्थ ज्यांच्यासाठीची सामग्री आधी भिजवून ते फ्रीजमधे ठेवून मग त्या शिजवणं हे आरोग्यास त्रासदायक ठरतं. कारण अशा गोष्टींवर फ्रिजच्या थंडाव्याचा परिणाम होतो. असे पदार्थ खाल्ले की मग आपल्या शरीरातील अग्नीवर परिणाम होतो. म्हणजे आपली जी पाचक शक्ती असते, त्याचा जो अग्नी असतो तो मंद होतो. असं जर वांरवार झालं तर त्याचा पचनसंस्थेवर वाईट परिणाम होतो.
अनेक घरात अशी सवय असते की कणकेचा गोळा भिजवून फ्रिजमधे ठेवायचा. किंवा चार पाच दिवसांसाठीची कणिक एकदम मळून ती फ्रीजमधे ठेवायची आणि लागेल तेव्हा गरम पोळ्या करुन घ्यायच्या असं करतात. पण हे योग्य नाही. ही सवय आपल्या अग्नीवर परिणाम करते. घरात चार पाच माणसांसाठीच्या पोळ्यांची कणिक मळणं हे फार तर चार पाच मिनिटांचं काम आहे. अनेकींना हे जिकरीचं वाटतं म्हणून त्या कणीक मळून फ्रिजमधे ठेवतात. पण आरोग्याचा विचार करता हे टाळायला हवं. पोळ्यांसाठीची कणिक ही ताजीच मळलेली असावी.
Image: Google
हा नियम शिजवून खाण्याच्या प्रत्येक पदार्थालाच लागू होतो. आमटी, भाजी उरली की ती फ्रिजमधे ठेवायची आणि मग नॉर्मलला आणून गरम करुन खायची ही सवयही पचनास हानिकारकच आहे. भाज्या, फळं, दूध ताजं आणि चांगलं राहाण्यासाठी म्हणून फ्रिजचा वापर असा मर्यादित व्हायला हवा. कणिक मळून ठेवणे, शिजवलेल्या वरणाचा गोळा आमटीसाठी म्हणून फ्रिजमधे ठेवणे या सवयी चुकीच्या आहेत.
परदेशात अन्न शिजवून फ्रिजमधे स्टोअर करुन मग मायक्रोवेवमधे गरम करुन खाण्याची पध्दत आहे. तिथे जे भारतीय राहातात त्यातील बर्याच जणांना भारतीय पध्दतीचंच जेवण लागतं. पण मग तिथे थेट पोळ्या लाटून त्याच डीप फ्रिजरमधे ठेवल्या जातात. आणि आयत्या वेळी भाजून खाल्ल्या जातात. अनेकांना जडलेली ही सवय भारतात आली तरी बदलत नाही. चार पाच दिवसांसाठी लागणार्या पोळ्या एकदम लाटून त्या डीप फ्रिजरमधे ठेवल्या जातात. अशी पध्दत सोयिस्कर वाटत असली तरी हानिकारक आहे, हे मात्रं खरं!