थंडीच्या दिवसांत हमखास उद्भवणारी समस्या म्हणजे सर्दी आणि खोकला. हवेत गारठा असल्याने लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत अनेकांना या काळात सर्दी-कफ आणि खोकल्याची समस्या उद्भवते. कधी हा खोकला कोरडा असतो तर कधी कफामुळे झालेला ओला खोकला असतो. खोकल्याची उबळ साधारणपणे रात्री झोपल्यावर लागते. एकदा हा खोकला सुरू झाला की तो काही केल्या थांबायचे नाव घेत नाही. अनेकदा खोकल्यामुळे झोप तर मोडतेच पण खोकल्याची ढास लागल्याने छाती, पोट, पाठ, आतडी सगळेच ओढल्यासारखे होते. हा खोकला कमी प्रमाणात असेल तर ठिक आहे. पण खोकल्याची ढास बरेच दिवस होऊनही न थांबणारी असेल तर त्यामुळे छातीत सूज येण्याची शक्यता असते. यालाच वैद्यकीय भाषेत प्लूरिसी (Pleurisy) म्हणतात (Chest pain while Coughing is Dangerous Sign of Pleurisy).
नेमके काय होते?
खोकला आटोक्यात असेल तर ठिक नाहीतर वेळीच डॉक्टरांना दाखवून घ्यावे. कारण खोकल्यामुळे छातीत दुखत असेल तर ही समस्या काही वेळा जीवघेणी होऊ शकते. बॅक्टेरीयल इन्फेक्शन, फंगल इन्फेक्शन, न्यूमोनिया या कारणांमुळे अशाप्रकारचा खोकला येतो. यामध्ये फुफ्फुसांच्या आतल्या भागाला खोकल्याने सूज येते आणि त्यांच्या कार्यात अडथळा निर्माण होतो.
कोणत्या समस्या उद्भवतात?
१. फुफ्फुसांचा कर्करोग २. फुफ्फुसातील रक्ताची गुठळी ३. फुफ्फुसांचा संधिवात ४. सिकलसेल अॅनिमिया ५. छातीची दुखापत ६. क्षयरोग
ही लक्षणं असतील तर वेळीच सावध व्हा...
१. श्वास घेताना छातीत दुखणे २. सलग खोकल्याची ढास लागणे ३. थंडी वाजून ताप येणे ४. घसा खवखवणे ५. सांधेदुखी आणि सूज ६. खांदे आणि पाठ ताणल्यावर छातीत दुखणे
उपाय काय ?
हे एकप्रकारचे व्हायरल इन्फेक्शन असून त्यावर वेळीच उपचार करायला हवेत. हा खोकला कमी प्रमाणात असला तर काही दिवसांतच तो बरा होतो. मात्र खोकला बरा होत नसेल तर डॉक्टर अँटीबायोटीक्स देऊन तो बरा करण्याचा प्रयत्न करतात. ल्सूरिसी डॉक्टरांनी तपासल्यावर त्यांना लक्षात येते. त्यानुसार डॉक्टर एक्सरे, अल्ट्रासाऊंड, सीटी स्कॅन, बायोप्सी यांसारख्या तपासण्या करुन या इन्फेक्शनची खात्री करतात. सुरुवातीला डॉक्टर अँटीइन्फ्लमेटरी औषधे देतात. पण आवश्यकता असेल तर काही वेळा स्टीरॉईडस द्यावी लागतात. मात्र जास्त खोकला असेल तर दुर्लक्ष न करता वेळीच उपचार घेणे आणि धूम्रपानापासून दूर राहणे आवश्यक असते.