- डॉ. प्रिया प्रभू (देशपांडे) सहयोगी प्राध्यापक, रोगप्रतिबंधक व सामाजिक औषधवैद्यक शास्त्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मिरज गेल्या आठवड्यामध्ये २०१९च्या डिसेंबरची आठवण ताजी झाली. कारण चीनमध्ये पुन्हा न्यूमोनिया वाढत असल्याच्या बातम्या वाचायला मिळाल्या. यावेळी मात्र लहान मुले आजारी आहेत व बीजिंग आणि लिओनिन्ग भागात बरीच मुले रुग्णालयांमध्ये दाखल असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या. त्यामुळे आपल्याकडेही मुलांच्या पालकांमध्ये भीतीची भावना निर्माण झाली. हे नेमके काय आहे? आणि मुख्य म्हणजे आपल्याकडे पालकांना चिंता वाटावी असे काही आहे का?
जागतिक आरोग्य संघटनेच्या डिसिज आऊटब्रेक न्यूज यासाइटवर चीनमधील न्यूमोनियाविषयी सविस्तर माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. लहान मुलांमधील हा न्यूमोनिया कोणत्याही नव्या विषाणूने झाला नसून याविषयी काही निर्बंधांची गरज नाही असेदेखील सांगितले आहे.
(Image :google)
न्यूमोनिया म्हणजे काय?
अंतर्गत श्वसनमार्गाच्या जंतूसंसर्गाने जेव्हा फुप्फुसांचा दाह होतो तेव्हा बाळाला गंभीर स्वरूपाचा संसर्ग झाला असे समजतात. कोणत्याही कारणाने सर्दी खोकला झाला असेल तरी त्यापासून संसर्ग जर फुप्फुसापर्यंत पोहोचला तर त्या भागाला सूज येते आणि फुप्फुसे व्यवस्थित काम करू शकत नाहीत. त्यामुळे बाळ जोरात व खोल श्वास घेऊ लागते व दम लागतो. हे न्यूमोनिया ओळखण्याची सोपी खूण आहे. बाळ अशक्त असेल तर असे सहजपणे घडते. अशी वेळी बाळाला तीव्र तापदेखील असतो. न्यूमोनिया विषाणूमुळे तसेच जिवाणूंमुळे होऊ शकतो. उदा. आरएसव्ही व कोरोनासारखे विषाणू तसेच मायकोप्लाझ्मा न्यूमोनीसारखे जीवाणू लहान मुलांमध्ये न्यूमोनिया निर्माण करू शकतात. जर तीव्र श्वसनदाह (न्यूमोनिया) असेल तर बाळाला रुग्णालयात दाखल करावे लागते. योग्य त्या औषधोपचारांनी न्यूमोनिया बरा होऊ शकतो. मात्र वेळेत उपचार न झाल्यास न्यूमोनियामुळे मृत्यूदेखील होऊ शकतो.
चीनमध्ये लहान मुलांमधील न्यूमोनिया का वाढला आहे?
थंडीचा मोसम हा बऱ्याच देशांमध्ये श्वसनाचे आजार वाढवणारा काळ असतो. कारण थंडीमुळे दारे खिडक्या बंद असल्याने बंदिस्त जागांमधील वायूव्हीजन कमी असते. तसेच सर्वजण खोल्यांमध्ये / घरामध्ये असल्याने संसर्ग सहजपणे फैलावतो. त्यामुळे अशा देशांमध्ये फ्लू सिझनपूर्वी सर्व नागरिकांना फ्लू शॉट्स दिले जातात. मात्र चीनमधील हा उद्रेक नेहमीपेक्षा एक महिना आधीच सुरू झाला आहे. मात्र घाबरुन जाण्याची गरज नाही.
या बातमीमुळे घाबरायची गरज आहे का?
नाही. कारण हे आजार कोणत्याही नव्या विषाणूमुळे झालेले नाहीत. हे सर्व जंतू भारतामध्ये आधीपासून आहेतच आणि कमी अधिक प्रमाणात आजार निर्माण करतात. तसेच भारताने कोविडनिर्बंध बरेच आधी उठवले असल्याने अशी घटना आता भारतात घडण्याची शक्यता कमी आहे.
जागतिक आरोग्य संस्थेने स्टेटमेंट दिल्याने भारतासह सर्व देशांमध्ये लहान मुलांमधील न्यूमोनियावर आता अधिक लक्ष ठेवले जाणार आहे. अशा रुग्णांची तपासणी विविध विषाणूंसाठी केली जाईल. हे कार्य नियमित सर्वेक्षणाचा भाग असेल. एखाद्या देशामध्ये आजार आढळून आल्यास सर्व देश सतर्क होतात.
(Image :google)
विविध देशांमध्ये कोणती ना कोणती साथ नेहमीच सुरू असते. मात्र इंटरनॅशल हेल्थ रेग्युलेशनमुळे प्रत्येक साथ पसरत नाही. सध्या कोंगोमध्ये मंकीपॉक्सची साथ सुरू आहे. ऑक्टोबरमध्ये केरळमध्ये निपाहची साथ होती आणि त्यात दोन मृत्यू झाले. पण अशा सर्व साथी स्थानिक स्तरावर थांबविल्या जातात. यासाठी तेथील सार्वजनिक आरोग्य खाते काम करीत असते. त्यामुळे रुग्णसंख्या वाढीच्या बातम्या आल्या की घाबरून न जाता खात्रीशीर स्त्रोताकडून अधिक माहिती मिळवणं आणि निर्देशांचे पालन करणं उत्तम. आपल्याकडेही मुलांना सर्दी-खोकला-श्वसनाचे आजार झाले तर काही काळजी पालकांनी घ्यायला हवी.
मुलांमधील श्वसनाच्या आजारांबाबत नेहमी कोणती काळजी घ्यावी?
१. मुलांना ताप, सर्दी, खोकल्याने आजारी असेल तर शाळेमध्ये पाठवू नये. इतरांसोबत खेळायला पाठवू नये. भरपूर विश्रांती व पुरेसे पाणी / द्रव मिळाल्यास आजार लवकर बरे होतात. २. शाळांनीदेखील आजारी मुलांना ताप उतरल्यानंतर शाळेत यायला सांगावे. शाळेमधील वायुवीजन चांगले ठेवावे. ३. घरातील वयस्कर व्यक्ती आणि लहान मुले यांची काळजी घ्यावी. ४. मूल ताप, सर्दी, खोकल्याने आजारी असल्यास त्याची श्वासाची गती मोजून न्यूमोनियाचा धोका ओळखता येतो. योग्य वेळी डॉक्टरांना दाखवावे.
५. मुलाला तीव्र ताप असल्यास अंगावर न काढता डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या. आवश्यकतेनुसार डॉक्टरांना तपासण्या करू द्या.
(Image :google)
६. डॉक्टरांनीदेखील मुलांमधील न्यूमोनिया , SARI आणि ILI यावर लक्ष ठेवावे व तत्कालीन निर्देशांचे पालन करावे.
७. घरातील कोणी आजारी असल्यास हातांची स्वच्छता नियमितपणे करा व हात नाका-तोंडाजवळ नेऊ नका. लहान मुलांना या दोन्ही सवयी लावा. तसेच त्यांना शिंकताना व खोकताना कोपराने तोंड झाकायची सवय लावा.
८. खिडक्या उघडून घरामध्ये खेळती हवा असू दे.
९. मुलांमध्ये रिस्पॅटरी रिझर्व्हज कमी असल्याने त्यांच्या आजारपणाची लपवाछपवी करू नये. पालकांनी योग्य माहिती देऊन आरोग्य कर्मचाऱ्यांना सहकार्य करायला हवे.
१०. प्रत्येक नवा विषाणू पॅण्डेमिक बनत नाही. त्यामुळे उगीच त्याबद्दल विचार करण्याची गरज नाही. मात्र वेळोवेळी दिलेले निर्देश पाळले नाही तर एखादा जुना आजार देखील विनाकारण त्रासदायक ठरू शकतो.
११. समाज माध्यमातील फॉरवर्डेड मेसेजवर अधिक विश्वास न ठेवता तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार वागणे अधिक सुरक्षित आहे. योग्य शास्त्रीय माहिती कधीही भीती वाढवत नाही तर सुरक्षेचा दिलासा आणि सुरक्षेसाठीचे मार्ग सांगते.
२०. कुठल्याही एखाद्या बातमीला न घाबरता फक्त स्थानिक आरोग्य व्यवस्थेने सतर्क राहणे आणि जनतेने आरोग्य व्यवस्थेला सहकार्य करणे एवढेच सर्वांच्या सुरक्षेसाठी महत्त्वाचे असते.