Join us   

Cleaning Tips : फक्त २ मिनिटात चकचकीत, स्वच्छ होतील खराब झालेले गॅस बर्नर, बटन्स; 'या' घ्या सोप्या ट्रिक्स 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2022 5:54 PM

Cleaning Tips : लिक्विड सोपच्या मदतीने तुम्ही स्वयंपाकघर तसेच गॅस नॉब सहज स्वच्छ करू शकता. ते घाणीवर रामबाण औषध म्हणून काम करते.

स्वयंपाकघरात वावरताना घरोघरच्या महिलांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. या सर्व समस्यांपैकी सर्वात सामान्य समस्या म्हणजे गॅस नॉब जॅम झाल्यामुळे अडकतो. चपाती, भाजी किंवा इतर कोणताही पदार्थ बनवताना  त्याचे छोटे कण किंवा बर्नरमध्ये तर कधी बटणांमध्ये अडकतात. (Cleaning Tips and Tricks)  भांडी घासून झाल्यानंतर अनेकजण गॅस ओटा स्वच्छ करतात पण बटन्स स्वच्छ करणं राहून जातं. म्हणूनच या लेखत तुम्हाला बटन्स, गॅस बर्नर स्वच्छ करण्याचे काही उपाय सांगणार आहोत. (How to clean gas stove knob in easiest way) सगळ्यात महत्वाचं म्हणजे गॅस व्यवस्थित बंद करून मगच  स्वच्छता करा. 

नॉब खोलून स्वच्छ करा

बहुतेक महिलांना ही सवय असते की त्या गॅस स्टोव्ह नीट स्वच्छ करतात पण अनेकदा नॉबकडे दुर्लक्ष करतात. बराच वेळ साफ न केल्यास घाण साचते आणि नॉब जाम होऊ लागतो. अशा परिस्थितीत तुम्ही नट बोल्ट उघडून नॉब काढा आणि कापडाने स्वच्छ करा. मग बोल्ट घट्ट करा. 

स्वच्छ करण्याची योग्य पद्धत

सर्व प्रथम  गॅस बंद करा. सूचनांनुसार नॉब्स काळजीपूर्वक अनस्क्रू करा नंतर त्यावर डिटर्जंट लावून नळाखाली धुवा. जर घाण लगेच निघत नसेल तर, डिटर्जंट, घरगुती रसायने किंवा कपडे धुण्याचे साबण वापरून कोमट पाण्यात भिजवा. नंतर त्यांना हार्ड स्पंज किंवा जुन्या टूथब्रशने हळूवारपणे स्क्रब करा. नंतर वाहत्या पाण्याखाली स्वच्छ करा. पाणी कोरडे होऊ द्या आणि नॉब्स पुसून टाका.

लिक्विड सोपचा वापर

लिक्विड सोपच्या मदतीने तुम्ही स्वयंपाकघर तसेच गॅस नॉब सहज स्वच्छ करू शकता. ते घाणीवर रामबाण औषध म्हणून काम करते. प्रथम  स्टोव्हच्या खाली कागद किंवा कापड ठेवा जेणेकरुन आपण साफ केल्यानंतर ते सहजपणे फेकून देऊ शकता. नॉब्स आणि संपूर्ण पॅनेलवर लिक्विड साबण लावा, थोडा वेळ राहू द्या. जर तुम्ही स्प्रे ने फवारणी केली तरी चालेल. नंतर टूथब्रश आणि टूथपिक वापरून स्वच्छ करा. मग स्वच्छ कापडानं पुसून घ्या. 

व्हिनेगर

घराच्या स्वच्छतेसाठी व्हाईट व्हिनेगरचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. याशिवाय तुम्ही याच्या मदतीने गॅस स्टोव्हचे नॉबही सहज स्वच्छ करू शकता. पाण्यात एक चमचा व्हिनेगर मिसळा आणि स्प्रे बाटलीत ठेवा. यानंतर गॅस स्टोव्हच्या नॉबवर स्प्रे करा आणि 5 ते 7 मिनिटे असेच राहू द्या. नंतर. चिमट्याच्या मदतीनं नॉब कापूस घालून स्वच्छ करा. 

मीठाचा वापर

मीठ आणि बेकिंग सोडाच्या मदतीने तुम्ही गॅस नॉब सहज साफ करू शकता. यासाठी प्रथम 1 चमचा बेकिंग सोडा आणि 1 चमचे मीठ थोड्या पाण्यात मिसळून द्रावण तयार करा. आता त्यात कापूस बुडवा आणि चिमट्याच्या मदतीने गॅस नॉब आतून स्वच्छ करा. असे केल्याने नॉबमध्ये अडकलेली घाण सहज साफ होईल.  

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्यकिचन टिप्स