झुरळं म्हणजे अनेकदा आपल्या घरातील न बोलावता ठाण मांडून बसलेले पाहुणेच. कितीही स्वच्छता करा तरी ही झुरळं काही केल्या हलायचं नाव घेत नाहीत. एकदा सुरुवात झाली की संपूर्ण किचनचा ताबा घेऊन ते आपली प्रजाती जास्तीत जास्त कशी वाढवता येईल याचाच प्रयत्न करत राहतात. सतत स्वच्छता केली तरी सिंकच्या आजुबाजूला, ट्रॉलीमध्ये, भांड्यांवर आणि काही वेळा पदार्थांवरही ही झुरळं सर्रास फिरत असतात. कधी आपण एखादी वस्तू काढायला जातो आणि ७-८ झुरळांची एकदम धावाधाव सुरू होते. मग आपण कधी घरगुती उपायांनी तर कधी पेस्ट कंट्रोल करुन ही झुरळं पळवून लावण्याचा विचार करतो. पण काही केल्या ती मात्र घरातून जायचं नाव घेत नाहीत.
उन्हाळ्याच्या दिवसांत तर त्यांचा सुळसुळाट आणखी वाढतो आणि एकामागे एक अंडी देत ते आपली संख्या वाढवण्याच्या मार्गावर असतात. आता झुरळांची किळस वाटते, त्यांच्यामुळे त्रास होतो हे सगळे ठिक आहे पण झुरळांच्या किचनमधील सततच्या वावराने आपल्या आरोग्यावरही त्याचा विपरित परिणाम होतो. झुरळांच्या भांड्यांमधील अन्न खाल्ल्याने आपल्याला काही समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे आरोग्याची काळजी घ्यायची असेल तर घरातून झुरळांना हद्दपार करायलाच हवे. पाहूयात झुरळांच्या वावराने आरोग्यावर कोणते परिणाम होतात.
विषबाधा होते -
अनेकदा अचानक आपले पोट बिघडते किंवा खूप इन्फेक्शन झाल्यासारखे होते. झुरळांमुळे अनेक बॅक्टेरिया अन्नात मिसळून विषबाधा किंवा टायफाईडचा प्रसार होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे पोटाच्या तक्रारींपासून दूर राहायचे असेल तर किचनमधील झुरळांचा नायनाट करायलाच हवा.
अॅलर्जी -
झुरळांमुळे अॅलर्जी होण्याची शक्यता असते. त्यांच्या लाळेतून व शरीरावरून बऱ्याच प्रकारच्या अॅलर्जी होण्याची शक्यता असते. यामुळे त्वचेवर रॅशेस येणे, डोळ्यांतून पाणी येणे ,सतत शिंका येणे अशी लक्षणं दिसू शकतात.
अस्थमा -
अस्थमाच्या रुग्णांसाठी झुरळं फारच त्रासदायक ठरू शकतात. जर अशा रुग़्णांच्या आसपास झुरळांचा वावर अधिक असेल तर त्यांना अस्थमाचा अटॅक येण्याची शक्यता अधिक असते. तसेच झुरळांमुळे होणाऱ्या अॅलर्जींमुळे गुंतागुंतीचे आजार वाढतात. ज्यांना अस्थम्याचा आधीपासून त्रास नाही त्यांना नव्याने या आजाराची समस्या उद्भवू शकते.
अन्न दुषित होते -
झुरळं काहीही खाऊन जीवंत राहू शकतात. आपण खात असलेल्या साध्या अन्नापासून कागद, कचरा अशा कोणत्याही गोष्टीवर ते जिवंत राहतात. त्यामुळेचे त्यांची वाढ वेगाने होते. वेळीच त्यांचा बंदोबस्त केला नाही तर ते उघड्या अन्नावर, भांड्यांमध्ये आपली अंडी, मृत त्वचा टाकतात. त्यामुळे ही भांडी आणि अन्न प्रदुषित होते आणि आपल्याला विविध प्रकारचे संसर्ग होण्याची शक्यता असते.