ज्या घरात झुरळं, त्या घरात आजारपणं.. असं म्हंटलं जातं. म्हणूनच लहानसहान दुखणीखुपणी, आजारपण आणि संसर्ग टाळायचा असेल तर सगळ्यात आधी किचनमधली आणि एकंदरीतच सगळ्याच घरातली झुरळं हकलून लावली पाहिजेत. एक झुरळ जरी घरात दिसलं, तरी ती गोष्ट अत्यंत गांभिर्याने घ्या. कारण त्या झुरळाकडे दुर्लक्ष केलं तर कधी त्याची पिलावळ वाढत जाईल आणि आपल्या स्वयंपाकघरात मोकळेपणाने नांदायला लागेल, हे देखील आपल्या लक्षात येत नाही.
वेगवेगळे आजार पसरवणारे झुरळं मारून टाकण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. पण घरात जर लहान मुले आणि वयस्कर माणसे असतील, तर अशी औषधी घरात फवारताना दहा वेळा विचार करावा लागतो. या औषधांचाच त्रास जर मुलाबाळांना झाला, तर काय करावे भीतीने अनेकजणी औषध फवारणी करणे टाळतात. म्हणूनच हे काही साधे सोपे उपाय करून पहा आणि तुमचे घर झुरळमुक्त करा.
झुरळांना द्या कॉफी
वाचून कदाचित आश्चर्य वाटले असेल, पण झुरळांना पळवून लावण्यासाठी हा एक उत्तम उपाय आहे. कॉफीचा सुगंध झुरळांना अजिबात चालत नाही. कॉफीमध्ये असणाऱ्या कॅफिनमुळे झुरळांची हालचाल कमी होते. त्यामुळे कॉफी पावडरच्या लहान लहान पुड्या करा आणि स्वयंपाक घरात ठिकठिकाणी ठेवून द्या. किंवा ज्या भागातून झुरळे फिरताना तुम्ही नेहमी पाहता, त्या भागात कॉफी पावडर टाकून ठेवा. काही दिवसातच झुरळे गायब होतील.
बोरीक पावडर
बोरीक पावडर हा झुरळांना पळवून लावणारा रामबाण उपाय आहे. बोरीक पावडरमध्ये थोडी साखर मिक्स करा आणि हे मिश्रण कागदावर टाकून घरात ठिकठिकाणी ठेवा. साखरेमुळे झुरळं ही पावडर खातात आणि मरतात. हे मिश्रण तयार करण्यासाठी ३: १ याप्रमाणात बोरीक पावडर आणि साखर घ्यावी. ज्या भागात झुरळं अधिक दिसतात, त्या भागात रात्रीच्या वेळी ही पावडर शिंपडली तरी चालते.
कडुलिंबाचे तेल
कोणत्याही प्रकारचा संसर्ग टाळण्यासाठी कडुलिंब अतिशय गुणकारी आहे, हे तर आपण जाणतोच. त्यामुळेच तर धान्याला किड लागू नये म्हणून फार पुर्वीपासून आपल्याकडे धान्यामध्ये कडुलिंबाचा पाला टाकला जातो. झुरळांना पळवून लावण्यासाठी आपल्याला कडुलिंबाचे तेल वापरायचे आहे. हा उपाय करण्यासाठी कापसाचे लहान लहान बोळे करा. हे बोळे कडुलिंबाच्या तेलात बुडवून घ्या आणि स्वयंपाक घराच्या कोपऱ्यांत जिथे झुरळांचा वावर अधिक असतो, त्याठिकाणी ठेवून द्या. अवघ्या दोन ते तीन दिवसात झुरळांचा नायनाट होऊन जाईल.