Join us   

नारळाच्या तेलाने गुळण्या? खूळ नव्हे उपाय! गुळण्या केल्याने होतात 4 फायदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2022 6:26 PM

तोंडाच्या आतील स्वच्छतेसोबतच फिटनेस राखण्यासाठी, वजन कमी करण्यासाठी तेलाची गुळणी केल्याने फायदे होतात. तज्ज्ञ नारळाच्या तेलाच्या गुळण्या करण्याचे 4 फायदे सांगतात. 

ठळक मुद्दे तेलाची गुळणी दिवसभरात कधीही करुन चालत नाही. ती सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी करावी असं तज्ज्ञ सांगतात.तेलाची गुळणी करण्यासाठी नारळाचं तेल वापरल्यानं त्याचे जास्त फायदे होतात. पचन सुधारुन वजन कमी करण्यासाठी नारळाच्या तेलाची गुळणी फायदेशीर ठरते. 

सकाळी उठल्यानंतर तोंड धुणं, दात घासणं हा सगळ्यांचा नित्यक्रम असतो. पण काहीजण सकाळी दात घासल्यानंतर तोंडात नारळाच्या तेलाची गुळणी धरतात. हा कुठला उपाय म्हणत अशा उपायाची खिल्ली उडवणारेही खूप आहेत. तेलाची गुळणी करणं हा प्राचीन उपाय आहे. यालाच माॅर्डन सवयीच्या भाषेत ऑइल पुलिंग असंही म्हणतात. अनुष्का शर्माचं माॅर्निंग रुटीन म्हणून ही संकल्पना नुकतीच चर्चेत आली होती. दात स्वच्छ घासल्यानंतरही तेलाची गुळणी करुन काय मिळतं? तेलाची गुळणी कशी करावी? कोणतं तेल वापरावं?   असे अनेक प्रश्न तेलाच्या गुळणीसंदर्भार्त निर्माण होतात.  तज्ज्ञ म्हणतात केवळ तोंडाच्या  आतील स्वच्छता, मुख आरोग्य यासाठीच नाही तर फिटनेस राखण्यासाठी, वजन कमी करण्यासाठी तेलाची गुळणी केल्याने फायदे होतात. तेलाची गुळणी करण्याचा उपाय आपल्या दिनचर्येत सामील करायचा असल्यास गुळणी करण्यासाठी नारळाचं तेल वापरण्याचा सल्ला दिला जातो.  तेलाच्या गुळणीचे फायदे मिळवण्यासाठी तेलाची गुळणी कशी करावी? काय काळजी घ्यावी हे समजून घेणं आवश्यक आहे.

Image: Google

तेलाची गुळणी कशी करावी?

तेलाची गुळणी करण्यासाठी शुध्द, नैसर्गिक स्वरुपातलं, घाणीचं किंवा आयुर्वेद दुकानात मिळणारं नारळाचं तेल वापरावं. एक चमचा नारळाचं तेल घ्यावं. ते घट्ट असल्यास गरम करुन पातळ करावं. ते सामान्य तापमानाला आलं की 1 चमचा तेल तोंडात टाकावं. तोंड बंद करुन तेल संपूर्ण तोंडात फिरवावं. तेल तोंडात फिरवताना हळू फिरवाव. ते गिळू नये. एक मिनिटानंतर गुळणी बाहेर  टाकावी. तेलाची गुळणीची सवय लावताना सुरुवातीला केवळ एक मिनीट गुळणी धरावी आणि मग हा वेळ पुढे 10-15 मिनिटापर्यंत वाढवता येतो.  तेलाची गुळणी दिवसभरात कधीही करुन चालत नाही. ती सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी करावी असं तज्ज्ञ सांगतात. 

Image: Google

गुळण्यांसाठी नारळाचंच तेल का?

सूर्यफूल, ऑलिव्ह ऑइलयापेक्षाही नारळाचं तेल गुळण्यांसाठी फायदेशीर ठरतं. नारळाच्या तेलात दाह विरोधी आणि सूजविरोधी घटक असतात. तसेच नारळाच्या तेलाद्वारे तोंडात आरोग्यास घातक जिवाणुंची, सूक्ष्म जिवाणुंची वाढ होत नाही.

Image: Google

नारळाच्या तेलाच्या गुळण्या  केल्याचे फायदे

1. नारळाच्या तेलाची गुळणी केल्याने तोंडातील घातक जिवाणू नष्ट होतात. दातांची संवेदनशिलता कमी होते. 

2. शरीरावर सूज येत असल्यास, हिरड्यांना सूज असल्यास नारळाच्या तेलाच्या गुळण्या केल्यानं सूज दूर होते.

3. नारळाच्या तेलाच्या गुळण्या केल्यानं शरीरात ऊर्जा निर्माण होते. 

4.  नारळाच्या तेलाची गुळणी करण्याचा सर्वात जास्त फायदा पचन व्यवस्थेला होतो. पचनाची सर्वात आधीची प्रक्रिया जिभेशी निगडित असते. जिभेद्वारे पदार्थातील पोषक तत्त्वांची जाणीव होऊन पचन व्यवस्थेला तसे आदेश जातात आणि पचनाची प्रक्रिया सुरु होते. पण जीभच जर अस्वच्छ असेल तर पचन व्यवस्थेला जिभेकडून कोणतेही संकेत मिळत नाही. त्यामुळे खाल्लेल्या अन्नाचं पचन होण्यास समस्यान निर्माण होतात. पचनाशी निगडित समस्या दूर करण्यासाठी नारळाच्या तेलाच्या गुळण्या फायदेशीर ठरतात, 

 

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्स