थंडी पडली की सगळीकडे खायची प्यायची सरबराई असते. बाजारात हिरव्यागार भाज्या, मटार, भरपूर फळे यांची रेलचेल आणि घरीही गरमागरम पदार्थांची सरबराई असते. पण याच थंडीत कधी पाणी कमी प्यायल्याने तर कधी हवेतील बदलामुळे कोठा जड होण्याची शक्यता असते. हल्ली अनेकांची कामेही बैठी असल्याने शरीराची हालचाल होत नाही. चलनवलन न झाल्याने पोट साफ न होण्याची तक्रार अनेक जण या काळात करताना दिसतात. आता असे झाल्यास आपण लगेच डॉक्टरकडे धाव घेतो. पण असे करण्याची अजिबात आवश्यकता नाही. आधी घरगुती उपाय करुन पाहिल्यास ही समस्या सुटू शकते. नाहीच सुटली तर डॉक्टर असतातच. पाहूयात कॉन्स्टिपेशनवर घरच्या घरी करता येतील असे काही सोपे उपाय...
१. जास्तीत जास्त पाणी प्या
थंडीच्या दिवसांत गारठ्यामुळे कमी पाणी प्यायले जाते. दिवसभरात शरीराला किमान तीन लिटर पाण्याची आवश्यकता असते. पण थंडीमुळे कमी पाणी प्यायल्याने शरीरातील अन्नाचे योग्य पद्धतीने पचन होत नाही. पचनाची क्रिया पूर्ण न झाल्यामुळे शरीर नको असलेले घटक शरीराबाहेर फेकण्यास तयार नसते. तसेच हे घटक तयार असतील तरी ते खालच्या बाजूला ढकलण्यासाठी पुरेशा पाण्याची आवश्यकता असते. त्यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास होणाऱ्यांनी न विसरता ठराविक वेळाने पाणी पिणे आवश्यक असते.
२. केळं आणि तूप खा
केळं हे चिकट फळ असल्याने कोठा साफ होण्यास मदत होते. रात्री झोपताना किंवा सकाळी उठल्यावर केळं खाल्ल्यास पोट मोकळे होण्यास त्याची चांगली मदत होते. याबरोबरच केळ्यावर तूप घालून खाल्ल्यास जड झालेला कोठा मऊ पडायला मदत होते. तूप वंगणाप्रमाणे काम करत असल्याने शरीरातील पचनक्रिया सुरळीत करण्यास मदत करते. मात्र तुम्हाला सर्दी किंवा कफ असेल तर केळं खाणे टाळावे.
३. आहारात फायबरचा समावेश असायला हवा
आहारात फायबर असलेल्या पदार्थांचा समावेश केल्यास कोठा साफ होतो. फायबर म्हणजे सलाड, पालेभाज्या, धान्ये, कडधान्ये, फळे यांमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते. फायबरमुळे पोट साफ होते, त्यामुळे जर तुम्हाला कॉन्स्टिपेशनचा त्रास होत असेल तर फायबर असलेल्या गोष्टींचा आहारात समावेश असायला हवा.
४. बडीशेप आणि कोमट पाणी
बडीशेपमधील घटक आरोग्यासाठी अतिशय चांगले असतात, म्हणून मसाल्याचा पदार्थ म्हणून आपल्याकडे बडीशेपचा वापर आवर्जून केला जातो. तसेच जेवणानंतरही बडीशेप खाण्याची पद्धत आहे. बडीशेपमुळे पचनसंस्थेतील गॅस्ट्रीक एंजाइम वाढण्यास मदत होते. त्यामुळे प्रत्येक जेवणानंतर न चुकता अर्धा चमचा बडीशेप किंवा बडीशेप पावडर खावी. त्यावर कोमट पाणी प्यायल्यास कॉन्स्टिपेशनचा त्रास कमी होण्यास मदत होते.
५. त्रिफळा चूर्ण, एरंडेल तेल यांसारखे आयुर्वेदिक उपाय
रात्री झोपताना पाण्यात त्रिफळा चूर्ण घालून प्यावे. कोमट पाण्यात हे चूर्ण मिसळावे आणि प्यावे. त्यामुळे दुसऱ्या दिवशी कोठा चांगला साफ होतो. ज्यांना थंडीत किंवा नियमितपणे बद्धकोष्ठतेचा त्रास होतो त्यांच्यासाठी हा अतिशय उत्तम उपाय आहे. तसेच एरंडेल तेलानेही पोट साफ होण्यास मदत होते. पोटातील साठलेली घाण बाहेर पडण्यास ठराविक कालावधीने एरंडेल घेणे आवश्यक असल्याचे आयुर्वेदात सांगितले आहे. मात्र ते किती प्रमाणात, कसे घ्यायचे याबाबत तज्ज्ञांकडून योग्य ती माहिती घेऊन मगच घ्यायला हवे.