- वैद्य राजश्री कुलकर्णी
बायका सतत पायात गोळे येण्याची तक्रार करत असतात. गोळे येणं हे थोड्या वेळापुरती असतं पण त्या वेदना असह्य असतात. अनेकींना तर वारंवार पायात गोळे येत असतात. यावर त्या उपाय शोधत असतात. पण सतत पायात गोळे येण्यामागची आधी कारणं माहित असायला हवीत. कारण बरीचशी कारणं ही सवयींशी, उठण्या बसण्याशी निगडित असतात.
पायात गोळे येणं ही खरंतर खूपच कॉमन तक्रार असते. विशेषत:30 ते 55 या वयोगटातील महिलांमधे ही तक्रार प्रामुख्याने आढळते. पोटरीच्या स्नायुंमधे अशा हालचालीे निर्माण होतात ज्यावर आपलं नियंत्रण नसतं.अशा पध्दतींच्या हालचालींमुळे स्नायू एकदम कडक होतात.स्नायू अचानक आखडल्यानं आणि कडक झाल्यानं वेदना होतात. बहुतांश केसेसमधे पायात गोळे येण्याची तक्रार रात्री झोपेतच येते. प्रचंड वेदनांनी जाग येते, बराच वेळ पाय हलवता येत नाही. कधी कधी जास्त तीव्रतेचा गोळा आला असेल तर दुसर्या दिवशी पोटरीत वेदना होत राहातात. पुरुषांच्या तुलनेत बायकांमधे पायात गोळे येण्याचं प्रमाण जास्त आहे. पायात गोळे येण्याची कारणं अनेक आहेत.
छायाचित्र- गुगल
पायात गोळे का येतात?
1. सध्या तर ज्या महिला वर्क फ्रॉम होम करत आहे त्यांच्यात पायात गोळे येण्याची तक्रार मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे. याचं कारण खूप वेळ बसून काम केलं जातंय. मांडी घालून किंवा खुर्चीत पाय जमिनीला न टेकवता खूप वेळ बसलेलं असणं यामुळे हा त्रास होऊ शकतो.
2. बैठ्या जीवनशैलीमुळे ही तक्रार वाढलेली आहे. शरीराला हालचाल नाही, चालणं फिरणं नाही, इतर कुठला व्यायाम नाही यामुळे विशिष्ट प्रकारचे अँसिडस तयार होवून पायात गोळे येतात.
3. शरीराचे विशिष्ट अवयवांचे स्नायू जसे हात पाय यांच्या स्नायुंचं स्ट्रेचिंग होणं गरजेचं असतं. त्याच्यामधे पायाचे स्नायू त्यातही मांडी आणि पोटर्यांचे स्नायू यांना स्ट्रेचिंग खूप आवश्यक आहे.पण ते जर स्ट्रेचिंग मिळालं नाही तर तिथले स्नायू शिथील होतात. त्यामुळे पायात गोळे येतात.
4. बरेचदा तासनतास खुर्चीत बसून जेव्हा काम केलं जातं तेव्हा पायावर पाय टाकून बसलं जातं. तर तसं केल्यानंही पायात गोळे येण्याचा त्रास होतो.
5. जसं हालचाल नसणं,स्ट्रेचिंग नसणं ही पायात गोळे येण्यामागची कारणं आहेत तशी त्या उलटही कारणं आहेत. म्हणजे तासनतास उभं राहून काम करावं लागत असल्यानेही हा त्रास होतो. कारण तासनतास उभं राहिल्याने जो रक्तप्रवाह आहे तो पायाच्या दिशेने जास्त होतो आणि त्यामानानं तो हदयाकडे परत येत नाही. बरेचदा पायाच्या रक्तवाहिन्यांच्या ज्या झडपा असतात त्या जेवढ्या कार्यशील राहायला हव्यात तेवढ्या राहात नाही त्यामुळे रक्ताचा प्रवाह पायाकडून हदयाकडे जो पुन्हा जायला हवा तो जावू शकत नाही त्यामुळे रात्री झोपल्यावर पायात गोळे येतात.
6. सध्या तरुण मुला-मुलींमधेही पायात गोळे येण्याचं प्रमाण जास्त आढळतं. याचं कारण मुलांमधे प्रमाणापेक्षा जास्त व्यायाम करणं हे आहे. खूप जास्त व्यायामामुळे पोटरीचे स्नायुंवर जास्त ताण येतो. आणि झोपल्यानंतर जेव्हा स्नायू शिथिल होतात तेव्हा मग पायात गोळे येतात.
7. जे नियमित व्यायाम करत नाही, पण अचानक एखाद दिवशी ट्रेकिंगला जातात आणि तिथून आल्यावर त्यांना हा त्रास होतो. कारण चढ चढताना आणि उतरताना गुडघ्यांना आणि पोटर्यांना जो ताण पडतो त्यामुळे पायात गोळे येतात. गुडघ्याला जोडलेले पोटरीचे स्नायू शिवाय मांडीचे स्नायू हे जेव्हा खूप हालचाल करतात तेव्हा मग त्यावर ताण येतो आणि पायात गोळे येतात. पण अशा स्वरुपाचा त्रास हा तात्पुरता येतो.
8. घरात कुठल्या कार्यक्रमानिमित्त खूप धावपळ करावी लागत आहे, ही धावपळ सलग सात आठ दिवस झाली, त्यात जर पुरेशी झोप झाली नाही तर अपुर्या विश्रांतीमुळेही पायात गोळे येण्याचा त्रास होतो.
छायाचित्र- गुगल
9. तरुण मुलींचा विचार करता त्यांना पायात गोळे येण्याचं सर्वसामान्य कारण म्हणजे ते वापरत असलेले चप्पल बूट्. उंच टाचेची पादत्राणं वापरल्यानं हा त्रास होतो. हाय हिल्स घालून खूप वावरायचं नसेल तर हा त्रास होत नाही. पण तासनतास हाय हिल्स घालून उभं राहिल्यानं, अवघडून चालल्यानं पोटरीच्या स्नायुंवर ताण येतो, टाचेच्या हाडाला हिल्सचं टोक टोचत राहातं. चालताना शरीराला जो तोल सांभाळावा लागतो तो हाय हिल्स घालून चालताना प्रयत्नपूर्वक सांभाळावा लागतो. त्यामुळे जपून जपून पावलं टाकली जातात. यामुळे कमरेपासून ते पावलापर्यंतच्या स्नायुंवर अतिरेकी ताण येतो आणि पायात गोळे येतात.
10. वरील कारणं नसताना वारंवार पायात तीव्र स्वरुपाचे गोळे येत असतील तर त्याच्या संबंध आरोग्याशी निगडित समस्यांशीही असतो. शरीरातील कॅल्शियम किंवा पोटॅशियम हे जेव्हा कमी होतं तेव्हा पोटर्यांमधे गोळे येतात.
11. तसेच काहींची पावलं सपाट असतात. त्याला फ्लॅट फूट म्हणतात. पावलाला जी कमान असते ती या सपाट पावलांमधे नसते. त्यामुळे चालताना शरीराचा भार पावलांच्या कमानीवर पेलला जातो तसं या फ्लॅट फूट असलेल्यांमधे पेलला जात नाही. संपुृण पाऊल जमिनीला टेकतं. त्यामुळे शरीराचा बॅलन्स साधण्यासाठी पोटरीच्या स्नायुंना खूप कष्ट घ्यावे लागतात. त्यांच्यामधे पायात गोळे येण्याचं प्रमाण जास्त असतं.
12. गरोदरपणात संपूर्ण शरीरातच रक्तप्रवाह वाढलेला असतो, हदयावर खूप दाब असतो. पायाच्या स्नायुंवर जास्त ताण येतो. आणि गरोदरपणात जर व्यवस्थित कॅल्शियम शरीरात गेलं नाही तर मग पोटरीत गोळे येतात.
13 ज्यांना हाडांसंबंधी आजार असतात, संधीवात असतो त्यांना पायात गोळे येतात.
14. ज्यांना मधुमेह आहे किंवा मधुमेह होण्याची शक्यता आहे त्यांना पायात गोळे येण्याचा त्रास होतो. त्यामुळे सतत पायात गोळे येत असतील तर त्यामागची वैद्यकीय कारण तपासण्या करुन कळू शकतात. फक्त त्यासाठी आपल्या या त्रासाकडे जागरुकपणे पाहायला हवं.
छायाचित्र- गुगल
हा त्रास कसा कमी होईल?
* सर्वप्रथम आपल्याला पायात गोळे का येतात ह समजून घेणं गरजेचं आहे. जर ते विशिष्ट जीवनशैलीमुळे येत असतील तर त्यात बदल करणं गरजेचं असतं. आणि जर ते कोणत्या आजाराशी संबंधित असेल तर तशा तपासण्या होणं आणि औषधं उपचार होणं गरजेचं आहे. हा त्रास जर शरीरातील कॅल्शियम कमी असल्यामुळे होत असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्यानं कॅल्शियम सप्लिमेण्टस घ्याव्या लागतात. आहाराचा विचार करता दूध पिणं आणि कॅशिअम असलेले पदार्थ सेवन करणं आवश्यक आहे. किमान दिवसातून एकदा एक कपभर दूध पिण्याची सवय लावली तर हे त्रास आपण टाळू शकतो.
* सतत पायात गोळे येण्याची तक्रार असेल तर त्यांनी उठल्याबरोबर स्नायुंचे स्ट्रेचिंग व्यायाम करावेत. त्यामुळे स्नायू लवचिक राहतात.
*पोटरीत जिथे गोळा येतो तिथे बोटांनी गोल गोल चोळावं. मसाज करावा. आणि तो नुसता कोरडा न करता घरात जे तेल उपलब्ध असेल खोबरेल तेल, तिळाचं तेल लावून मसाज करावा. यामुळे वेदना कमी होतात आणि स्नायू पूर्व स्थितीला लवकर येतात.
* पायात गोळे येवून गेल्यावर जर खूप जास्त दिवस पायात वेदना होत असेल तर टॉवेल गरम पाण्यात लपेटून तो कडकडीत पिळून पायाला लपेटून ठेवावा. पायात गोळे येणं हा शरीरातील वात वाढण्याचंही लक्षण आहे. त्यामुळे वात कमी होण्यासाठी उष्ण उपाय केले तर वात लवकर नियंत्रित होतो आणि वेदना कमी होतात.
* ज्यांना सतत पायात गोळे येण्याची प्रवृत्ती आहे त्यांनी रात्री झोपल्यावर आधी गुडघ्याच्या खाली उशी ठेवावी. साधारण दहा पंधरा मिनिटं त्या उशीवर पाय सरळ ठेवून पाठीवर झोपावं. झोप लागण्याआधी ही उशी काढून टाकावी. त्यामुळे पायात गोळे येण्याचं प्रमाण कमी होतं.
* उंच टाचेची पादत्राणं वापरणं विशेषत: ज्यांचे फ्लॅट फूट आहेत त्यांनी टाळावं. अशी समस्या असलेल्यांसाठी विशिष्ट प्रकरची पादत्राणं ( ज्यात पावलाची कमान कृत्रिमरित्या तयार केलेली असते) मिळतात ती वापरावीत.यामुळे चालताना पोटरीवर अनावश्यक ताण न येता सहज बॅलन्स साधला जातो.
आहारातील द्रव पदार्थांचं प्रमाण व्यवस्थित ठेवावं.
( वैद्य राजश्री कुलकर्णी या नाशिकस्थित प्रसिध्द आयुर्वेद तज्ज्ञ आहेत. )
rajashree.abhay@gmail.com