डोकेदुखी ही एक जागतिक समस्या आहे. सतत काही ना काही कारणाने डोके दुखणारे आपल्या आजुबाजूलाच असतात. डोकं दुखतं म्हणून कधी ते काही गोळ्या घेतात तर कधी डोकं दुखणं सहन न झाल्याने अनेकांवर डॉक्टरकडे जायचीही वेळ येते. डोकेदुखीची अनेक कारणे असली तरी आपले डोके नेमके कोणत्या कारणाने दुखते आहे हे समजून घेणे आणि त्यानुसार उपचार करणे आवश्यक आहे. कधी उन्हाचा तडाखा बसल्याने तर कधी अॅसिडीटीमुळे किंवा कधी आणखी काही कारणाने डोकेदुखी होऊ शकते.
जगभरात डोकेदुखीने हैराण असणाऱ्यांची संख्या ५२ असून यातील १४ टक्के लोक मायग्रेनने हैराण असल्याचे समजते. विशेष म्हणजे पुरुषांच्या तुलनेत महिलांना डोकेदुखीचा त्रास जास्त होत असल्याचेही नुकतेच समोर आले आहे. नॉर्वेमधील सायन्स अँड टेक्नॉलॉजीच्या संशोधकांनी नुकतेच एक संशोधन केले. त्यानुसार २० ते ६५ या वयोगटात डोकेदुखीचा त्रास असणाऱ्यांची संख्या जास्त असल्याचे यामध्ये म्हणण्यात आले आहे. मात्र विविध कारणांनी इतके लोक डोकेदुखीसारख्या समस्येने त्रस्त असतात ही आश्चर्याची बाब आहे. काही वेळा झोप घेतल्यावर किंवा आराम केल्यावर ही डोकेदुखी थांबते. मात्र काही वेळा ही डोकेदुखी थांबणारी नसल्याने यावर औषधोपचार करण्याशिवाय पर्याय नसतो.
ताणामुळे होते डोकेदुखी
डोकेदुखीसाठी अनेक कारणे असली तरी दिवसेंदिवस वाढत असलेला ताण हे यामागील एक महत्त्वाचे कारण आहे. या संशोधनासाठी १९६१ ते २०२० हा कालावधी घेण्यात आला असून २६ टक्के लोक तणावामुळे होणाऱ्या डोकेदुखीने हैराण आहेत. इतकेच नाही तर ४.६ टक्के लोकांना महिन्यातून १५ दिवसांपेक्षा जास्त दिवस डोकेदुखीचा त्रास होतो.
मायग्रेन हे आणखी एक मुख्य कारण
जवळपास १५.८ टक्के लोकांना दिवसाच्या कोणत्याही वेळी अचानक डोकेदुखी सुरू होते. यातील ५० टक्क्यांहून जास्त जण मायग्रेनमुळे डोके दुखत असल्याचे सांगतात. त्यामुळे डोकेदुखी ही अतिशय सामान्य समस्या वाटत असली तरी ती वेगवेगळ्या स्वरुपात असल्याने डोकेदुखी थांबवण्यासाठी आणि त्यावर उत्तम उपाय शोधण्याची आवश्यकता आहे.
पुरुषांपेक्षा महिलांमध्ये डोकेदुखीचा त्रास जास्त
महिलांना पुरुषांपेक्षा डोकेदुखीचा त्रास जास्त सतावतो. ८.६ टक्के पुरुषांना मायग्रेनचा त्रास होतो तर महिलांमध्ये याचे प्रमाण १७ टक्के असते. याचप्रमाणे ६ टक्के महिलांमध्ये १५ दिवस किंवा त्याहून जास्त दिवस डोकेदुखी असते तर पुरुषांमध्ये हे प्रमाण २.९ इतकेच असते असे या संशोधनातून समोर आले आहे. आता महिलांना डोकेदुखी जास्त होण्यामागे नेमके काय कारण असावे याबाबत मात्र अद्याप काही समजलेले नाही.