सतत होणारी चिकचिक आणि घाम यामुळे वैतागणारे अनेक जण आपल्या आजुबाजूला असतात. कोणाला खूप व्यायाम केल्यानंतर घाम येतो. तर काहींना काहीच न करताही खूप घाम येतो. आता उन्हाळ्याच्या दिवसात उन्हात फिरल्यावर घाम येणे ठिक आहे. पण एरवीही तुम्हाला खूप घाम येत असेल तर? याची वेगवेगळी कारणे असू शकतात. काहींचे घाम येणे अनुवंशिक असते. आता आपल्याला खूप घाम येत असेल आणि अशावेळी आपण ऑफीसमध्ये असू तर सतत घाम पुसूनही कंटाळा येतो. अनेकदा पाण्याने चेहरा धुतला तरीही हा घाम येण्याचे काही कमी होत नाही. मग कधी चेहऱ्याला पावडर लावण्याचा पर्याय निवडला जातो. तर कधी घामाचा वास येतो आणि त्याची आपल्याला लाज वाटते म्हणून अंगावर आणि कपड्यांवर डिओड्रंट आणि परफ्यूमचा मारा केला जातो. हल्ली तर पॉकेट पर्फ्युम आणि अत्तर बॅगमध्ये ठेवणारेही अनेक जण पाहायला मिळतात.
आता हा घाम येणे आरोग्यासाठी चांगले की, वाईट असा प्रश्न आपल्यापैकी अनेकांना पडतो. तर उत्तम आरोग्यासाठी आणि निरोगी राहण्यासाठी घाम येणे महत्वाचे आहे. सध्या अनेकांची कामे लॅपटॉप आणि मोबाईलवर असतात. अशावेळी बसून काम केले जाते. तरीही घाम येत असेल आणि वातावरणात विशेष उष्णता नसेल तर मात्र वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. घामामध्ये अमोनिया, युरिया, मीठ आणि साखर इत्यादी घटक असतात. आपल्या शरीराचे तापमान सामान्य तापमानापेक्षा जास्त होते, तेव्हा घामाच्या ग्रंथी शरीराच्या तापमानाचे नियमन करण्यासाठी शरीरातून पाणी शोषून घेतात. यामुळे घाम घेणे शरीरासाठी चांगलेच असते. घाम आल्यामुळे शरीरातील अनावश्यक घटक बाहेर पडण्यास मदत होते. घामामुळे त्वचा स्वच्छ होण्यासही मदत होते. आता घाम येणे का चांगले पाहूया
१. शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर टाकली जातात
घामामधून शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर टाकली जातात. शरीरात अनेक रसायने तयार होत असतात. यातील अनावश्यक गोष्टी घामाच्या माध्यमातून बाहेर फेकल्या जातात. त्यामुळे घाम येणे आरोग्यासाठी चांगले आहे.
२. त्वचा चांगली राहण्यास मदत
घाम येताना त्वचेच्या रंध्रातून तो बाहेर येतो. त्यामुळे त्वचेची रंध्रे मोकळी होण्यास मदत होते. अनेकांना चेहऱ्यावर ब्लॅक हेडस किंवा व्हाइट हेडस येतात. पण तुम्हाला पुरेसा घाम आला तर त्वचेची रंध्रे मोकळी होतात आणि अशाप्रकारची समस्या उद्भवत नाही. घाम आल्यानंतर त्वचा निरोगी होते. त्वचेवरील धूळही घामाच्या माध्यमातून पुसली जाते, किंवा धुतली जाते. तसेच चेहऱ्यावर येणाऱ्या पुटकुळ्या, मुरुम यांचे प्रमाण घामामुळे कमी होते. कोरडी त्वचा असणाऱ्यांसाठी घाम येणे एकप्रकारे चांगले आहे, कारण त्यामुळे ओलावा टिकून राहतो.
३. बाहेरील तापमानाशी शरीर जुळवून घेते
वातावरणातील बदलांचा आपल्या शरीरावर परिणाम होत असतो. तापमान वाढले की आपले शरीर या तापमानाशी जुळवून घेत असते. त्यामुळे आपल्याला जास्त घाम येतो. तसेच या काळात आपल्याला तहानही जास्त लागते. त्यामुळे शरीरातील अनावश्यक घटक बाहेर पडतात आणि नव्याने पाणी प्यायल्याने शरीराची पाण्याची गरज भगवली जाते.
४. व्यायाम करताना घाम येणे चांगले
व्यायाम करताना शरीराचे तापमान वाढते. तसेच हृदयाची गतीही वाढते. अशावेळी घाम आल्याने शरीराच्या तापमानाचे संतुलन होण्यास मदत होते. घामाच्या माध्यमातून मीठ, साखर तसेच कोलेस्टेरॉल आणि अल्कोहोलसारखे पदार्थ बाहेर पडण्यास मदत होते. त्यामुळे तुम्ही नियमित व्यायाम करणे आणि घाम येणे आरोग्य चांगले राहण्यासाठी चांगले आहे.
५. कॅलरी बर्न होतात
वजन कमी करणे आणि त्यासाठी कॅलरीज बर्न करणे हा सध्या अनेकांसाठी एक टास्क असतो. पण गामामुळे हे का अगदी सहज होते. घामामुळे शरीरातील कॅलरीज बर्न होतात म्हणजेच जाळल्या जातात. त्यामुळे नकळत आपल्या वजनावर नियंत्रण येण्यास मदत होते.
मात्र वातावरणात उष्णता नसेल, तुम्ही व्यायाम किंवा फारशी कष्टाची कामे करत नसाल आणि तरीही तुम्हाला जास्त घाम येत असेल तर त्यामागे काही इतर वैद्यकीय कारणेही असू शकतात. मधुमेह, थायरॉईड, रजोनिवृत्ती, हृदयाशी संबंधित आजार, ताण-तणाव, मद्यपान यांमुळेही जास्त घाम येऊ शकतो. अशावेळी वेळ न दवडता तज्ज्ञांचा सल्ला घेणे फायद्याचे ठरते.