Join us   

कोठा जड आहे, रोजच्या रोज पोट साफ होत नाही? तज्ज्ञ सांगतात ६ सोपे उपाय...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2022 2:20 PM

Constipation Digestion Problem Home Remedies : पोट साफ नसेल तर आरोग्याबरोबरच सौंदर्यावरही त्याचा परीणाम होतो...

ठळक मुद्दे योगासनांमधील पवनमुक्तासन, बलासन, उत्तानपादासन यांसारखी आसने नियमित केल्यास चांगला फायदा होतो. वेळच्या वेळी पुरेशी झोप घेणे अतिशय आवश्यक आहे. यासाठी मानसिक ताणतणावांपासून दूर राहणेही गरजेचे आहे

अनेकदा आपण नेहमीसारखाच नाश्ता, दुपारचे जेवण, चहा आणि रात्रीचे जेवण घेतो. तरी सकाळी रोजसारखे पोट साफ होत नाही. अनेकदा तर आपल्याला संडासलाच लागत नाही. मग सवयीप्रमाणे आपण भूक नसूनही नाश्ता करतो आणि रोजच्या कामाला लागतो. मात्र पोट साफ झालेले नसल्याने आपल्याला म्हणावे तसे फ्रेश वाटत नाही. मग कोठा जड झाला म्हणून आपण भरपूर पाणी पितो, एखादा जास्तीचा चहा घेतो. मात्र तरीही प्रेशर येत नाही. अशावेळी आपल्याला कॉन्स्टीपेशन किंवा बद्धकोष्ठतेचा त्रास झाला असे आपण म्हणतो. पोट साफ न झाल्याने नेहमीसारखी भूक लागत नाही, अस्वस्थ होत राहते. इतकेच नाही तर पोट वेळच्या वेळी नीट साफ न झाल्याने आरोग्याच्या इतर तक्रारीही डोके वर काढतात. पोट साफ नसल्याने चेहऱ्यावरही फोड येणे, चेहरा निस्तेज दिसणे अशा सौंदर्याशी निगडीत समस्या निर्माण होतात ते वेगळेच (Constipation Digestion Problem Home Remedies). 

खाल्लेल्या अन्नाचे पचन चांगले झाले तर आपल्या सगळ्या क्रिया सुरळीत होतात, नाहीतर पोटाची आणि एकूण आरोग्याच्या तक्रारी निर्माण व्हायला वेळ लागत नाही. पचनक्रिया व्यवस्थित असेल तर खाल्लेल्या चांगल्या भागाचे धातू म्हणजेच हाडे, स्नायू, मेंदू यांना पोषण मिळते आणि शरीराला अनावश्यक असलेला भाग बाहेर टाकला जातो. मात्र असे झाले नाही तर आपण जे खातो त्याचा शरीराला काहीच फायदा होत नाही. आता असे होण्यामागे चुकीची जीवनशैली हे मुख्य कारण असते. त्याशिवाय विविधप्रकारचे औषधोपचार, वातावरणात होणारे बदल, अनुवंशिकता यांसारख्या गोष्टींचा समावेश असतो. मात्र तुम्हाला नेहमीच या समस्येचा सामना करावा लागत असेल तर घरच्या घरी कोणते उपाय करता येतील याविषयी आयुर्वेदतज्ज्ञ  डॉ पोर्णिमा काळे काही सोपे उपाय सांगतात...

१. रात्री झोपताना पाण्यात १५ ते २० काळे मनुके भिजत घालावेत आणि सकाळी ब्रश झाल्यावर हे मनुके खायचे. यामुळे पोट साफ व्हायला मदत होते. 

२. कोमट पाण्यातून एरंडेल तेल घेणे हा आणखी एक चांगला उपाय आहे. रात्री झोपताना हा उपाय करावा. दुसऱ्या दिवशी पोट चांगल्या पद्धतीने साफ व्हायला मदत होते. गंधर्व हरीतकी सारखे औषध डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावे.

३. आपली आजी जेवण झाल्यावर पाचक म्हणून घरात केलेली सुपारी खायची. त्यामध्ये भाजलेला ओवा, जिरे, सैंधव यांचा समावेश असायचा. रात्री जेवणानंतर कोमट पाण्यासोबत हे मिश्रण घेतल्यास त्याचा चांगला फायदा होतो. यासोबतच जवस भाजून त्यामध्ये घातले तरी पोटासाठी ते अतिशय उपयुक्त ठरतात.

४. झोपू पूर्ण झाली नाही तरी अनेकदा पोट साफ होण्याचा त्रास होतो. त्यामुळे वेळच्या वेळी पुरेशी झोप घेणे अतिशय आवश्यक आहे. यासाठी मानसिक ताणतणावांपासून दूर राहणेही गरजेचे असून त्याकडेही लक्ष द्यायला हवे. 

५. आपण खात असलेले अन्न चांगल्या पद्धतीने चावून खाणे, जेवताना मोबाइल, टीव्ही यांचा वापर न करणे, मैद्याचे पदार्थ, शिळे अन्न टाळणे, फळभाज्या, पालेभाज्या यांचा आहारात समावेश करणे या गोष्टींकडे आवर्जून लक्ष द्यायला हवे. 

६.  जेवण झाल्याझाल्या बैठे काम न करता आवर्जून शतपावली करावी. त्यानंतर वज्रासनात बसावे. जेवल्यावर आराम करायचा असल्यास केवळ २० मिनीटांसाठी डाव्या कुशीवर पडून राहावे, यामुळे पचनक्रिया सुरळीत होण्यास मदत होते. योगासनांमधील पवनमुक्तासन, बलासन, उत्तानपादासन यांसारखी आसने नियमित केल्यास चांगला फायदा होतो. 

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सघरगुती उपाय