डाॅ. संजय जानवळे (एम.डी. बालरोग तज्ज्ञ)
लहान मुलात बद्धकोष्ठतेची अनेक कारणे आहेत. कारण कुठलेही असो, एकदा बद्धकोष्ठतेचा त्रास सुरु झाला तर तो त्रास दीर्घकाळ चालू राहण्याचा धोका असतो. बद्धकोष्ठतेवर उपचार करताना त्यास हायपोथायराॅयडिझम सारखे आजार किंवा काही सर्जिकल आजार कारणीभूत आहे का हे सर्वप्रथम पहावे लागते.
दहा वर्षाच्या सुमनचे पोट सुमारे एक वर्षाहून अधिक काळ दुखत होते. या काळात तिला उपचार म्हणून वारंवार जंताचे औषध दिले देण्यात आले होते. दुधाची ॲलर्जी असेल, म्हणून तिचे दूध व दुग्धजन्य पदार्थाचे सेवनही बंद करण्यात आले. प्रयोग म्हणून तिला गव्हाचे अन्न देणे बंद करण्यात आले. पण त्याचा फारसा उपयोग झाला नाही, तिचे पोट दुखणे चालूच होते. अपेंडिक्सला सूज असेल म्हणून तिला आता सर्जनला दाखविण्याचा सल्ला देण्यात आला.
तिच्या सर्व तपासण्या नाॅर्मल होत्या, पण पोटाच्या सोनोग्राफीमध्ये अपेंडिक्सला सूज असल्याचे सांगण्यात आले आणि शस्त्रक्रियेचा सल्लाही देण्यात आला. सेकंड ओपिनियन घ्यायचे म्हणून तिच्या आईबाबाना दुसऱ्या सर्जनला दाखवले असता त्यांनी निदान पक्के करण्यासाठी पोटाचा स्कॅन करण्याचा सल्ला दिला. पोटाच्या सिटी स्कॅनमध्ये ‘मेझेंटेरिक लिंफ नोड’ सुजले असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे तिला पोटाचा टीबी आहे का हे पाहण्यासाठी ‘बेरियम मिल’ ही तपासणी करण्याचा सल्ला दिला.
(Image : google)
पालकांना आता काय करावे, हे सुचेनासे झाले. हैराण झालेल्या पालकांनी परत तिला बालरोगतज्ज्ञाकडे नेले. डाॅक्टरांनी पुर्वइतिहास जाणून घेतला. पोटाची तपासणी करताना तुझे पोट कुठे दुखते असे विचारले असता तिने पुर्ण पोटावर हात फिरवत सगळे पोट दुखत असल्याचे सांगितले. कुठल्या एका विशिष्ट जागी तिचं पोट दुखत नसल्याने तपासणीवरही निदान होत नव्हते. अधूनमधून तिला कळ येत होती. तिच्या पोटदुखीचा परिणाम अद्याप तिच्या दैंनदिंन ॲक्टिव्हीटीवर झालेला नव्हता. शौचास गेल्यानंतर मात्र तिचे पोट दुखणे कमी होत असे. तिला उलट्या होत नव्हत्या, ताप नव्हता, तिचे वजन कमी झालेले नव्हते. पालकांना तिला संडास करताना काही त्रास होतो का, हे निश्चित माहित नव्हते. पुर्वइतिहास जाणून घेतल्यावर तिचे खाणे खूप कमी असल्याचे दिसून आले. ती जास्त करुन नुडल्स्, बिस्किटेच खात होती. त्यासोबत रोज दोन ते तीन ग्लास दूध पित असे. पोटाची बारकाईने तपासणी केली असते पोटात खडा संडास असल्याचे दिसले. यावरुन तिला बद्धकोष्ठता/ मलावरोध असल्याचे निदान डाॅक्टरांनी केले. आणि म्हणूनच तिचे पोट दुखत होते.
मुलांत दीर्घकाळ पोट दुखण्याच्या कारणात बद्धकोष्ठता या आजाराचा क्रमांक अगदी वरचा आहे.
बद्धकोष्ठता म्हणजे काय?
१. बद्धकोष्ठ म्हणजे शौचास होताना त्रासदायक होणे, शोचास अनियमितता असणे व कडक शौचास असल्याने शौच करणे अवघड होणे. दिवसातून एकदा किंवा एकापेक्षा कमी वेळा शौचास होणे नाॅर्मल असते, पण जर शौच कडक होत असेल व होण्यात अनियमितता असेल त्याला बद्धकोष्ठता झालेली असते. जर हा त्रास ४ आठवड्याहून अधिक काळ होत असेल तर वैद्यकीय सल्ला घेणे अनिवार्य असते.
२. लहान मुल संडास करताना शौचास बाहेर ढकलण्याऐवजी रोखून धरते. कधी-कधी पॅंटमध्येच संडास करते. लघवीला वारंवार जाणे, पोटात गडगड करणे, गॅस होणे, भूक कमी होणे ही बद्धकोष्ठतेती काही लक्षणे होत. कडक शौचास होताना गुद्दद्वाराला चीर ( फिशर ) पडते व त्यातून रक्तस्राव होतो.
३. अडकलेल्या कडक शौचाबाहेरुन पातळ शौच बाहेर पडल्याने मूल पॅण्ट करते. याला वैद्यकीय परिभाषेत इन्कोप्रेसिस असे म्हणतात. पॅन्टमध्ये संडास केल्यामुळे तुमच्या मुलाला रागावू नका. त्याचा चांगलाच अनिष्ट परिणाम मुलाच्या मनावर होत असतो.
(Image : google)
या आजाराची कारणं काय?
१. आहार कमी असणे व तो चुकीचा असणे, व्यायामाचा वा शारीरिक हालचालीचा अभाव असणे, शौचास वेळेवर न जाणे, ही काही मुलात आढळणाऱ्या बद्धकोष्ठतेची मुख्य कारणे होत. आहारात दुधाचा व दुग्धजन्य पदार्थांचा अधिक समावेश असणे, बाटलीने पाजणे, आहारात तंतुमय पदार्थाचा समावेश नसणे, कृत्रिम दूध पावडरचा वापर करणे, ही काही बद्धकोष्ठतेची इतर कारणे होत. जर मुल शौचास जाणे टाळत असेल तर उदा. सकाळी शाळेत जाण्यास उशिर होत असेल किंवा टीव्ही, मोबाईल, व्हिडीओ गेम, पाहण्यात व्यस्त असेल, आळशी, बैठेकाम करणारी मुले, मैदानावर खेळण्याचा अभाव, काही औषधांचा दुष्परिणाम, अशा मुलात बद्धकोष्ठ होण्याची शक्यता असते. याबरोबरच हायपोथायराॅडिझम, जन्मजात दोष, पाठीच्या मणक्यात दोष आणि शिसेविषबाधा या आजारात बद्धकोष्ठ होते.
२. लहान मुलात बद्धकोष्ठतेमुळे पोटात दुखण्याने प्रमाण अलिकडे मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसून आले आहे. शाळेत जाणारी मुले काय व किती खातात, त्यांचे पोट नीट साफ होते का याकडे पालकांचे लक्ष कमी असते. स्वच्छतागृहात जाऊन शौचास साफ होते की त्रास होते हे आपण पहात नाही.
रुग्णाचा पुर्वेइतिहास जाणून घेऊन बद्धकोष्ठतेचे निदान होते व लक्षणानुसार काही चाचण्या कराव्या लागतात.
उपचार काय?
१. बद्धकोष्ठतेवर उपचार करण्यासाठी आहार व जीवनशैलीत बदल अनिवार्य आहेत. आहारात दूध व दुग्धजन्य पदार्थ, मैदा, ब्रेड, बिस्किट वर्ज्य करा.
२. तंतुमय पदार्थांचे अधिकाधिक सेवन हवे. त्यासाठी चपाती- भाकरीचे पीठ चाळू नका. मुगदाळ, मसुरदाळ याचा आहारात समावेश करा.
३. हिरव्या पालेभाज्या, पिवळी फळे यांचे प्रमाण वाढवा. पेरु, पिअर अशी फळे सेवन केल्यास पोट गडगड न करता साफ होते.
४. शौचाला दिवसातून किमान तीनदा तरी जायला हवे व शौचास झाली नाही तरी बसणे अत्यंत महत्वाचे असते. लहान मुलांना टाॅयलेट ट्रेनिंग द्या व ही ट्रेनिंग देण्याच्या वय २-३ वर्षे इतके असते. पाश्चिमात्य पद्धतीने कमोड वापरत असाल तर मुले त्यावर नीट बसतात का अन् त्याना ते अवघडल्यासारखे होते का, ते पहा. ५. मैदानी खेळ, शारीरिक हालचाली व व्यायाम केल्याने बद्धकोष्ठ होत नाही.
६. बद्धकोष्ठतेला जर हायपोथायराॅडिझमसारखी कारणे असतील तर त्यावर आधी उपचार करावे लागतात.
७. माणसाला आनंदी ठेवणार्या सिरोटोनिन सारख्या हार्मोन्सची निमिर्ती आतड्यात होत असते. जर बद्धकोष्ठ असेल तर ही मुले नेहमी दुःखी, निरस असतात. त्यांचे अभ्यासात, खेळण्यात लक्ष लागत नाही. त्यासाठी मुलाला बद्धकोष्ठ होऊ नये म्हणून पालकांनी त्याच्या आहाराकडे, व्यायामाकडे व चांगल्या सवयीकडे लक्ष द्यावे.
dr.sanjayjanwale@gmail.com