सकाळी जर पोट साफ झालं नाही तर पूर्ण दिवस खराब होतो. काम घरात असू देत किंवा ऑफिसात, कशातच मन लागत नाही. पोट साफ न होणे ही कोणासाठी कधीकधीची तर कोणासाठी नेहमीची समस्या असते. पोट नीट साफ न झाल्यास पोट दुखी, गॅसेस होणं, पोटात कळा येणं, सुस्ती येणं ,डोकं जड पडणं, फ्रेश न वाटणं, तोंड कडू पडणं अशा इतर समस्याही निर्माण होतात.
पोट साफ न होणं ही समस्या एकच एक कारणामुळे नाही तर अनेक कारणांमुळे निर्माण होते. आयुर्वेद तज्ज्ञ दीक्षा भावसार म्हणतात की पोट साफ न होण्यामागे चयापचय क्रिया बिघडलेली असणं हे मुख्य कारण असतं. ते बिघडलं तर बध्दकोष्ठतेची समस्या निर्माण होते. शरीराची क्रिया सुरळीत चालवणारे हार्मोन्स आतड्यांमध्येही निर्माण होतात. हे हार्मोन्स तयार होण्यासाठी पोट स्वच्छ असणं आवश्यक असतं. त्यामुळेच पोट साफ नसेल तर हार्मोन्स निर्मितीवरही परिणाम होवून शरीराची क्रिया बिघडते. पोट साफ असणं हे केवळ मूडसाठीच नाहीतर एकूणच शरीराची क्रिया सुरळीत चालण्यासाठी आवश्यक असतं.
पोट साफ का होत नाही?
चयापचय क्रिया बिघडणे या कारणामुळे पोट साफ होण्यास अडचण निर्माण होते. चयापचय क्रिया बिघडण्यास अनेक कारणं कारणीभूत असतात.
1. लक्ष देऊन न खाणं.
2. सतत कोरडं अन्न खाणं, थंड किंवा तिखट, तळलेले पदार्थ जास्त खाणं.
3. पुरेसं पाणी न पिणं.
4. झोप व्यवस्थित नसणं.
5. रात्री खूप उशिरा जेवणं.
6. रोजच्या दिनक्रमात अजिबात व्यायाम न करणं.
Image: Google
रोज पोट साफ होण्यासाठी..
1. पोट साफ होण्यासाठी पुरेसा वेळ देणं आवश्यक आहे. टाॅयलेटमध्ये गेल्यावर घाई केल्यास पोट नीट स्वच्छ होत नाही. मुळातच पोट साफ होण्याची समस्या असल्यास टाॅयलेटला गेल्यावर थोडा वेळ देणं आवश्यक आहे.
टाॅयलेटला गेल्यावर पुस्तक वाचणं, मोबाइल बघणं ही कामं करु नये. यामुळे लक्ष विचलित होतं.
2. पोट रोज नीट साफ होण्यासाठी टाॅयलेटला जाण्याची एक वेळ ठरवणं आवश्यक आहे. आपण विशिष्ट वेळी जेवण करतो, पाणी पितो तसंच विशिष्ट वेळी टाॅयलेटला जाण्याची सवय लागल्यास पोट स्वच्छ होतं.
3. पोट नीट साफ होण्यासाठी घरगुती उपायही करता येतात. रोज सकाळी उठल्यानंतर एक चमचा गाईचं तूप कोमट पाण्यासोबत घ्यावं किंवा रोज रात्री झोपताना 1 चमचा गाईचं तूप कोमट दुधासोबत सेवन करावं. या उपायामुळे आतडे स्वच्छ होण्यास मदत होते.
4. दोन वेळेसच्या जेवणापैकी कोणत्या तरी एका जेवणात कच्च्या सॅलेडचा अवश्य समावेश करावा.
5. रोज न चुकता व्यायाम करावा. पुरेशा शारीरिक हालचाली होण्यासाठी रोज 30 ते 40 मिनिटं व्यायाम करणं आवश्यक आहे. शारीरिक हालचाल पुरेशी असल्यास पोट साफ होण्यास मदत होते.
6. पोट साफ होण्यासाठी मलासन, अर्ध मत्स्यासन, सर्वांगासन, पवनमुक्तासन ही योग आसनं रोज करावीत.