रक्तातील वाढलेली शुगर किंवा डायबिटीस हा सध्या अनेकांसाठी एक महत्त्वाचा प्रश्न झाला आहे. ताणतणाव, आहाराच्या चुकीच्या पद्धती, व्यायामाचा अभाव आणि बैठी जीवनशैली यांमुळे कमी वयात डायबिटीस असणाऱ्यांचे प्रमाण गेल्या काही वर्षात वेगाने वाढले आहे. रक्तातील साखर नियंत्रणात ठेवली तर ठिक नाहीतर आरोग्याची गुंतागुंत व्हायला वेळ लागत नाही. रक्तातील साखर सतत वाढलेली असेल तर किडणी, यकृत, डोळे यांसारख्या अवयवांवर त्याचा विपरीत परिणाम होतो आणि आरोग्याच्या समस्या वाढत जातात. शुगर ही सायलेंट किलरप्रमाणे असल्याने ती हळूहळू शरीरातील विविध क्रियांसाठी घातक ठरते (Coriander Seeds Can Control Blood Sugar Level Naturally).
आता ही शुगर नियंत्रणात ठेवायची तर औषधोपचारांना पर्याय नाही. हे जरी खरे असले तरी स्वयंपाक घरातील काही पदार्थ रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यास अतिशय उपयुक्त असतात. मेथ्या खाणे, कारले, जांभूळ यांसारख्या गोष्टी शुगर कमी होण्यासाठी फायदेशीर असतात त्याचप्रमाणे धणेही अतिशय उपयुक्त ठरतात. पदार्थांना चव येण्यासाठी आपण धणे पावडर आवर्जून वापरतो. तसेच विविध प्रकारच्या मसाल्यांमध्येही धण्याचा उपयोग केलेला असतो. हेच धणे रक्तातील साखर कमी होण्यासाठी कसे उपयुक्त ठरतात पाहूया...
१. ग्लायसेमिक इंडेक्स कमी होण्यासाठी
धण्याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो, त्यामुळे धणे पचायला सोपे असतात. अनेकदा अचानकपणे रक्तातील साखरेचे प्रमाण अचानक वाढते अशावेळी धण्याचा आहारात समावेश केल्यास ही स्थिती नियंत्रणात येऊ शकते. ३३ ग्लायसेमिक इंडेक्स असलेले धणे डायबिटीस असणाऱ्या व्यक्तींनी आहारात आवर्जून घ्यायला हवेत.
२. अँटी हायपरग्लायसेमिक घटक
जर्नल ऑफ न्यूट्रीशनमध्ये प्रकाशित झालेल्या एका अहवालानुसार धण्यात असे घटक असतात की ज्यामुळे शुगर कमी होण्यास मदत होते. हे घटक रक्तात शोषले गेल्याने इन्शुलिनचे प्रमाण योग्य राहण्यास आणि शुगर नियंत्रणात राहण्यास मदत होते.
३. इन्शुलिन नियंत्रणात ठेवण्यास मदत
धणे शुगर लेव्हल एका मर्यादेच्या पुढे जाण्यापासून रोखतात. तसेच धण्यामध्ये असणारे इथेनॉल ग्लुकोज कमी करण्यास अत्यंत प्रभावी असते. त्यामुळे इन्शुलिनच्या निर्मितीला रोखण्यासाठी धण्याचा अतिशय चांगला उपयोग होतो.
४. पचनक्रिया सुधारण्यास उपयुक्त
धण्यामध्ये अतिशय उत्तम असे अँटीऑक्सिडंटस असतात. तसेच फायबर्सचे प्रमाण चांगले असल्याने पचनाशी निगडीत तक्रारी दूर करण्यासाठी धण्याचा चांगला उपयोग होतो. बद्धकोष्ठता आणि पचनाशी निगडीत इतर समस्या नियंत्रणात ठेवण्यासाठी याचा धणे उपयुक्त ठरतात.