थंड पाण्यात जास्तवेळ काम केले, धुळ- मातीत खूप चालणे झाले किंवा मग अनवाणी पायाने चालावे लागले, तर पाय फुटतात, पायाला भेगा पडतात, हे आपल्याला माहिती होते. पण आता मात्र बदललेल्या जीवनशैलीमुळे हा त्रास सर्वच वयोगटातील आणि सर्वच आर्थिक गटातील स्त्रियांमध्ये पाहायला मिळतो आहे. अगदी आतापर्यंत केवळ कष्टकरी वर्गातील महिलांच्या पायालाच भेगा दिसून यायच्या. धुळ, मातीमध्ये न जावे लागणाऱ्या, घरातही चप्पल घालणाऱ्या उच्चभ्रू महिलांचे तळपाय चांगले स्वच्छ आणि भेगारहित असणार असा एक सर्वसामान्यांचा समज असतो. तो आतापर्यंत काही प्रमाणात खराही ठरलेला आहे. पण आता मात्र बदललेल्या जीवनशैलीमुळे पायांच्या भेगांची समस्या खूपच कॉमन झाली असून कष्टकरी वर्गाप्रमाणेच उच्चभ्रू महिलाही यामुळे त्रस्त आहेत.
याविषयी सांगताना काही तज्ज्ञ म्हणाले की उष्ण आणि कोरड्या हवामानामुळे पायांना भेगा पडतात. आता बऱ्याच जणांची स्थिती अशी आहे की, ज्यांच्या घरात एसी आहे. गाडीमध्ये एसी आहे आणि ऑफिसमध्ये देखील ते एसीत बसूनच काम करतात. सतत एसीच्या थंडगार हवेशी संपर्क आल्याने त्वचेतील आर्द्रता कमी होत जाते आणि त्वचा कोरडी होऊ लागते. ए.सी.मुळे शरीरातील घर्मरंध्रे बंद होतात. त्यामुळे घाम येणे बंद होते आणि त्वचेची रूक्षता वाढत जाते.
तळपायांचा भाग हा शरीराच्या इतर त्वचेच्या तुलनेत मुळातच जरा कोरडा आणि शुष्क असतो. त्यामुळे या भागावर जास्त परिणाम दिसून येतो. दिवसरात्र एसीत राहणे आणि पाणी कमी पिणे या दोन गोष्टी एकत्र आल्या की, पायांच्या भेगा तर वाढू लागतातच पण इतर त्वचाही लवकर सुरूकुतू लागते.
पायांना भेगा पडण्याची अन्य कारणे
- धुळीत- मातीत काम करावे लागणे,
- अनवाणी पायाने चालणे,
- चुकीची पादत्राणे घालणे,
- खूप जास्त ट्रेकिंग किंवा वॉकिंग करणे,
- पायांची योग्य ती काळजी न घेणे,
- पायांची स्वच्छता न ठेवणे,
- पाणी कमी पिणे,
- शरीराची उष्णता वाढलेली असणे.
पायांच्या भेगा कमी करण्याचे उपाय १. बाहेर जाताना चपल किंवा सॅण्डलऐवजी बुटांचा वापर केल्याने भेगा कमी होऊ शकतात. २. दररोज रात्री गरम पाण्यात मीठ घालावे आणि पाय १५ ते २० मिनिटे त्यात बुडवून ठेवावेत. यानंतर खोबरेल तेलाने पायांना मालिश करावी आणि सॉक्स घालून झोपावे. ३. गरम पाण्यात १५ मिनिटे पाय बुडवून ठेवावेत आणि त्यानंतर प्युमिक स्टोनने पाय घासावेत. यामुळे त्वचेवरील मृत त्वचा निघून जाईल. यानंतर मात्र खोबरेल तेल किंवा बदाम तेल लावून पायांना चांगली मसाज करावी.
४. तळपायांना मेहंदी लावल्यानेही शरीरातील उष्णता कमी होते आणि पायांच्या भेगांना थंडावा मिळतो. ५. गायीचे शुद्ध तूप काशाच्या वाटीने तळपायांवर घासावे. ६. कोरफडीचा गर पायांवर घासून लावल्यानेही तळपायांच्या भेगा कमी होतात.