हिवाळ्यात कडाक्याच्या थंडीत मस्त गरमागरम वाफाळलेला चहा आणि कॉफी पिणे कोणाला आवडणार नाही. आपल्यापैकी बऱ्याच लोकांच्या दिवसाची सुरुवात ही गरम चहा किंवा कॉफी पिऊन होते. चहा, कॉफी घेतल्याशिवाय कितेक्यांना दिवसाची सुरुवात झाली आहे असे वाटतच नाही. चहा - कॉफी म्हणजे काही लोकांसाठी अमृतासारखे असते. चहा कॉफी विना जगणे अशक्यच होईल अशी अनेक लोकांना सवय असते.
काही जणांना सतत चहा पिण्याची सवय असते. ऑफिस किंवा घरी असल्यावर काहीजण वारंवार चहा - कॉफी घेत असतात. भरपूर काम असले की अनेकांना चहा किंवा कॉफी घेण्याची सवय असते. काही जणांना दर दोन-तीन तासांनी चहा-कॉफी घेण्याची सवय असते. चहा-कॉफीच्या अतिरेकामुळे ॲसिडिटीचा त्रास होतो. त्यापाठोपाठ इतर आजारांनाही आमंत्रण मिळत असते. सर्वसामान्यांनी दिवसभरात दोन छोटे कप चहा किंवा कॉफी पिणेही भरपूर असते. चहा-कॉफी ही गरज नव्हे; सर्जनशीलतेला चालना देणारी शक्ती नव्हे तर ते आरोग्याला घातक ठरणारे व्यसन आहे. त्यामुळे चहा-कॉफीचे सेवन प्रमाणातच करणे योग्य आहे. चहा - कॉफीचे क्रेव्हिंग कमी कसे करता येतील याबाबतचे काही खास उपाय समजून घेऊयात(6 Ways To Control Your Tea & Coffee Cravings This Winter).
नक्की काय उपाय करता येऊ शकतात ?
१. चहा - कॉफीला पर्याय शोधा : चहा - कॉफी पिण्याची तलप लागली असेल किंवा वारंवार चहा - कॉफी पिण्याची सवय असेल तर चहा - कॉफीला पर्याय म्हणून काहीतरी हेल्दी ड्रिंकचा पर्याय निवडा. चहा - कॉफी पिण्याऐवजी ग्रीन टी, हर्बल टी, हळद घातलेले दूध तसेच वेलची किंवा जायफळयुक्त दूध अशा पर्यायी हेल्दी ड्रिंकचा वापर करू शकता. या प्रकारचे हेल्दी ड्रिंक प्यायल्याने तुमच्या पचनशक्तीत सुधारणा होईल तसेच तुमचा अॅसिडिटीचा त्रास कमी होईल. यामुळे आपली चहा - कॉफी पिण्याची सवय हळुहळु मोडेल.
२. पुरेशी झोप घ्या : आपल्यापैकी काहीजणांना रात्री जागरण करण्याची सवय असते. रात्री जागरण केल्यामुळे तुमचा संपूर्ण दिवस आळसावलेला जातो. हा दिवभरात आलेला आळस दूर करण्यासाठी आपण चहा - कॉफीचे अनेक कप घटाघट पिऊन जातो. परंतु हे शरीरासाठी हानिकारक ठरू शकते. योग्य प्रमाणात झोप घेतल्याने दिवसभर तुम्ही फ्रेश, ताजेतवाने व उत्साही रहाल. दिवसभर फ्रेश राहिल्यामुळे आपोआपच आपली चहा किंवा कॉफी पिण्याच्या सवयीवर नियंत्रण मिळवता येईल.
३. रुटीनला ब्रेक द्या : जेव्हा आपल्याला चहा - कॉफी पिण्याची इच्छा होते तेव्हा आपल्या या रोजच्या रुटीनला काही काळ ब्रेक द्या. चहा - कॉफी पिण्यासाठी छोटे ब्रेक घेण्याऐवजी आपल्या मित्र - मैत्रिणींसोबत थोडा फेरफटका मारण्यासाठी ब्रेक घ्या. मित्र - मैत्रिणींसोबत किंवा सहकर्मचाऱ्यांसोबत थोडा वेळ वॉकिंग करण्याला प्राधान्य द्या. यामुळे तुमच्या शरीराचा व्यायाम तर होईलच परंतु यासोबतच चहा - कॉफी पिण्याच्या रुटीनला ब्रेक मिळेल. तसेच काही दिवसांनी हळुहळु तुमची चहा - कॉफी पिण्याची सवय देखील सुटली असेल.
४. दिवसाची सुरुवात अशी करा : दिवसाची सुरुवात चहा - कॉफीने अजिबात करू नका. चहा - कॉफी पिण्याऐवजी सकाळी एक ग्लास गरम पाण्यात १ टेबलस्पून लिंबाचा रस मिसळून ते पाणी प्या. यामुळे आपली पचनशक्ती सुधारून शरीराला व्हिटॅमिन 'सी' ची मात्रा योग्य प्रमाणात मिळेल.
५. संतुलित आहाराचे सेवन : रोजच्या जेवणात संतुलित आहाराचा समावेश करणे गरजेचे असते. आपल्या जेवणात आवश्यक पोषक घटकांचा समावेश करणे आवश्यक आहे कारण यामुळे तुमच्या शरीरातील ऊर्जेची पातळी वाढविण्यास मदत होईल. जेव्हा तुमच्या शरीरातील ऊर्जेची पातळी उत्तम असेल तेव्हा जास्तीची ऊर्जा मिळवण्यासाठी तुम्हाला चहा - कॉफी पिण्याची गरज भासणार नाही. यामुळे तुमची चहा - कॉफी पिण्याची सवय सुटेल.
६. चहा - कॉफी पिण्याचे मूळ कारण शोधा : वरील दिलेल्या उपायांचा नक्की वापर करून पाहा. याशिवाय चहा - कॉफी पिण्याचे मूळ कारण शोधा. अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्यामुळे आपल्याला वारंवार चहा - कॉफी पिण्याची इच्छा होते या कारणांचा मागोवा घ्या. चहा - कॉफी प्रमाणापेक्षा जास्त पिणे हे आरोग्याला घातक ठरणारे व्यसन आहे. त्यामुळे या उपायांचा वापर करून पहा तसेच या उपायांनी जर चहा - कॉफी पिण्याची सवय मोडत नसेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.