दही आरोग्यासाठी चांगेल की वाईट हा वाद मागील बऱ्याच काळापासून आहे. पण दही खूप आवडतं त्यामुळे त्याशिवाय जेवणच पूर्ण होत नाही असे म्हणणारे अनेक जण आपल्या आजुबाजूला असतात. जेवणात दही असेल तर पोटाला शांत वाटते, दह्यामुळे जेवणाचा स्वाद वाढण्यास मदत होत असल्याचे म्हणत अनेक जण रोजच्या जेवणात दह्यावर ताव मारतात. दह्यात प्रोटीन, कॅल्शियम व्हीटॅमिन बी ६, बी १२ असे आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त घटक असतात असे मॉडर्न सायन्स म्हणत असले तरी आयुर्वेदानुसार दही खाण्याचे काही नियम आहेत. त्यामुळे कोणी, केव्हा आणि कसे दही खायचे याचे नियम समजून घेतले तर तुमच्या आरोग्यावर दह्याचे विपरित परिणा होणार नाहीत.
याबाबत वैद्य लीना बावडेकर यांना विचारले असता त्या म्हणाल्या, आयुर्वेदानुसार दही पचायला जड असते त्यामुळे शक्यतो ते टाळलेलेच बरे. मात्र जे लोक भरपूर व्यायाम करतात त्यांनी आहारात मर्यादित प्रमाणात दह्याचा समावेश केल्यास चालतो. पण खायचेच असेल तर कमी प्रमाणात तेही साखर, मध किंवा तूप घालून खावे म्हणजे ते पचायला सोपे होते. तसेच ज्यांना ताप, सर्दी आहे किंवा त्वचेशी आणि रक्ताशी निगडित आजार आहेत त्यांनी दह्याचा आहारात अजिबात समावेश करु नये. नुसते दही खाण्यापेक्षा त्याचे ताक करुन प्यायलेले उत्तम असेही त्या म्हणाल्या.
१. दही खायचेच असेल तर सकाळी किंवा दुपारी खावे, संध्याकाळनंतर दही अजिबात खाऊ नये.
२. कोशिंबीरीमध्ये अनेकदा दह्याचा वापर केला जातो, तो ठिक आहे कारण त्यामुळे सलाडमधील फायबर पचायला मदत होते. पण हे दह्याचे प्रमाण कमी असावे.
३. दह्याचे ताक केल्याने कमी प्रमाणात दही पोटात जाते तसेच पाण्यात मिसळल्याने तसेच त्यात मीठ, हिंग किंवा जीरेपूड घातल्याने त्यावर प्रक्रिया होते आणि ते पचायला सोपे होते.
४. दही रक्तात योग्य पद्धतीने मिसळत नसल्याने रक्तदोष निर्माण होतात. त्यामुळे विविध आजारांना विनाकारण निमंत्रण मिळू शकते.
५. ज्यांना अॅसिडीटीचा त्रास आहे अशांसाठी दही अजिबात चांगले नाही. अॅसिडीटीमध्ये आधीच शरीरातील आम्ले खवळलेली असतात. यामध्ये दही खाल्ल्यास हा त्रास वाढण्याचीच शक्यता जास्त असते. कारम दह्यामध्येही वेगवेगळी आम्ले असतात त्याचा शरीरावर परिणाम होतो.
६. दही कितीही आवडत असेल आणि तुम्हाला अस्थमा असेल तर दही अजिबात खाऊ नये. कारण त्यामुळे श्वसनाशी निगडित तक्रारी उद्भवू शकतात. दह्यामुळे कफ वाढण्याची शक्यता असते, त्यामुळे अस्थमा रुग्णांना जास्त त्रास होऊ शकतो.
७. ज्यांना सांधेदुखीचा त्रास आहे त्यांनी आहारात दह्याचा समावेश केल्यास हा त्रास जास्त वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे सांधेदुखी असणाऱ्यांनी दही खाणे टाळलेलेच बरे.
८. दूध, कांदा, तळलेले पदार्थ, आंबा किंवा इतर फळे यांच्याबरोबर दही खाणे धोक्याचे असते. यामुळे शरीरात विषारी पदार्थ तयार होतात आणि त्याचा आरोग्यावर विपरित परिणाम होतो.