रोज सकाळी उठल्यावर आपल्याला छान फ्रेश आणि एनर्जेटीक वाटावे अशी आपली इच्छा असते. मात्र काही ना काही कारणाने आपल्याला सकाळी उठल्यावर डाऊन वाटते. कधी झोप पूर्ण झाली नाही म्हणून तर कधी आरोग्याच्या काही तक्रारींमुळे, इतर ताणतणाव यांसारख्या गोष्टींमुळे आपल्याला सकाळी उठल्यावर फ्रेश वाटत नाही. पण सकाळी फ्रेश वाटलं नाही तर आपला पूर्ण दिवस आळसात आणि कंटाळवाणा जातो. असं होऊ नये आणि सकाळी उठल्यापासून आपल्याला फ्रेश वाटावं यासाठी उठल्यावर काही गोष्टी करणं आवश्यक असतं. प्रसिद्ध आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. हंसाजी योगेंद्र सकाळी उठल्यावर काय करावं याबाबत ३ महत्त्वाच्या गोष्टी सांगतात. मॉर्निंग रुटीनमध्ये या गोष्टींचा समावेश केल्यास आपला दिवस नक्कीच छान जायला मदत होईल (Daily Morning Routine for Good Health).
१. प्राणायमाचे महत्त्व
आपण दिवसभर श्वास घेत असतो पण त्या श्वासाकडे आपण लक्ष देतोच असं नाही. मात्र सकाळच्या वेळी लक्षपूर्वक श्वासावर लक्ष दिल्यास त्याचा आपल्या दिवसावर अतिशय सकारात्मक परीणाम होतो. श्वासाशी निगडीत विविध प्राणायाम प्रकार केल्याने दिवस चांगला जाण्यास मदत होते. आपल्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर या प्राणायमाचा चांगला परीणाम होतो.
२. नाश्त्याबाबत लक्षात ठेवा
सकाळी उठल्यावरचे पहिले खाणे म्हणजेच नाश्ता आपल्या आहारातील सर्वात महत्त्वाची गोष्ट असते. हा नाश्ता शरीराला पोषण देणारा असेल तर आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते. नाश्ताला आहारात प्रोटीन्स म्हणजेच प्रथिने असतील तर पोट भरण्यास, स्नायू बळकट होण्यास आणि प्रतिकारशक्ती चांगली राहण्यास मदत होते. दिवसभर ऊर्जा टिकून राहण्यास आणि रक्तातील साखरेचे प्रमाण योग्य राहण्यासही प्रोटीन महत्त्वाचे असते. यामध्ये शाकाहारी पदार्थांतील डाळी, पनीर, चीज, कडधान्य यांचा समावेश होऊ शकतो. यात भाज्या आणि धान्यांचा समावेश केल्यास हे पदार्थ जास्त पोषण देणारे ठरतात.
३. सूर्यप्रकाश अंगावर घेणे महत्त्वाचे, कारण...
सूर्यप्रकाश हा आपल्या एकूण आरोग्यासाठी अतिशय आवश्यक गोष्ट असते. सकाळच्या वेळी झोपेचे वेळापत्रक चांगले ठेवण्यासाठी, व्हिटॅमिन डी मिळण्यासाठी आणि दिवसभरासाठीची ऊर्जा टिकून राहण्यासाठी सूर्यप्रकाश अतिशय गरजेचा असतो. शरीरात सेराटोनिन या आनंदाच्या हार्मोनची निर्मिती व्हावी यासाठीही सूर्यप्रकाश अतिशय गरजेचा असतो. यामुळे मूड सुधारण्यास मदत होते, त्यामुळे रोजच्या रोज थोडा तरी सूर्यप्रकाश अंगावर आवर्जून घ्यायला हवा.