बॉलीवूड सिनेसृष्टीतील दंगल गर्ल फातिमा सना शेख हिने अनेक चित्रपटात मुख्य भूमिका साकारली आहे. मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खान यांच्यासोबत साकारलेला दंगल हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड गाजला. या चित्रपटाच्या ट्रेनिंग दरम्यान, सना 'एपिलेप्सी’ नावाच्या आजाराने ग्रस्त झाली. ज्याला आपण ‘अपस्मार’ या नावाने देखील ओळखतो. सध्या कलाकारांमध्ये विविध आजारांचं प्रमाण वाढत चाललं आहे. बदलती जीवनशैली असो या इतर काही. त्याचा थेट परिणाम आपल्या शरीरावर होतो. 'एपिलेप्सी' हा आजार ट्रेनिंग दरम्यान निदान झाल्याचे तिने सांगितले. तिने सोशल मिडीयाद्वारे एक पोस्ट शेअर करत या गंभीर आजाराबाबत आपल्या चाहत्यांना माहिती दिली आहे.
अपस्मार आजार म्हणजे काय ?
फिट येणं, आकडी, मिरगी आदी नावांनी अपस्मार हा आजार ओळखला जातो. या आजारावर उपचार शक्य आहे. औषधांनी तो बरा न झाल्यास शस्त्रक्रिया हा उत्तम पर्याय आहे. या आजाराविषयी नीट माहिती घेणं, गैरसमज दूर करणं यातून उपचारांविषयीची जागरुकता वाढेल आणि त्याचा उपयोग रुग्णांना होईल. हा आजार जगभरात आढळतो. या आजारामुळे खेळणं, पोहणं, वाहन चालवणं, रोजगार, शिक्षण, लग्न अशा बऱ्याच गोष्टींपासून रुग्ण वंचित राहतो. लहान मुलांमध्ये हा प्रश्न अधिक बिकट होत चालला आहे. योग्य त्या वयात आणि वेळीच अचूक निदान होऊन उपचार न झाल्यास मेंदूची वाढ व्यवस्थित होत नाही. या मुलांवर योग्य वेळी शस्त्रक्रिया आणि वैद्यकीय उपचार झाले तर ती व्यक्ती पूर्णतः सामान्य आयुष्य जगू शकते.
‘अपस्मार’ आजाराची लक्षणे
बेशुद्ध पडणे
त्वचा सुन्न पडणे
शरीरात झटका येणे
विचार करण्याची क्षमता कमी होणे
तोंडाला फेस येणे
दातखिळी बसने
‘अपस्मार’ होण्याची कारणे
मानसिक ताणतनावामुळे, अपूर्ण झोपेमुळे, ताप-सर्दी- खोकला हे आजार झाल्यास, रक्तदाब वाढल्यास, रक्तातील साखरेची पातळी कमी झाल्यास, स्त्रियांमध्ये मासिक पाळीच्या वेळी, औषधांच्या दुष्परिणामामुळे, डोक्याला मार लागल्यामुळे, कडक उन्हाच्या त्रासामुळे अपस्माराचा झटका येण्याची संभावना वाढते.
फेफरे येणे याचे असे केले जाते निदान
वारंवार फिट येत असल्यास मेंदूरोग तज्ज्ञाकडून अपस्माराबाबतचे निदान करून घेणे आवश्यक असते. पेशंटची हिस्ट्री, शारीरिक तपासणी आणि E.E.G (Electroencephalography), MRI स्कॅन, CT स्कॅन इत्यादी चाचण्या करून याचे निदान केले जाते.
एखाद्यास फिट आल्यास काय करावे?
जर एखाद्या व्यक्तीस फिट आल्यावर, स्वत: आपण शांत राहा व भयभीत होऊ नका.
रुग्णाला डाव्या किंवा उजव्या बाजूस वळवावे त्यामुळे रुग्णाच्या तोंडात अडकलेली लाळ किंवा फेस बाहेर पडून जाईल.
त्यानंतर रुग्णाला पाठीवर झोपवावे व त्याच्या डोक्याखाली उशी ठेवावी.
रुग्णाचे तोंड उघडण्यासाठी चमचा वगैरे कोणतीही वस्तू घालू नका.
चप्पल, कांदा यासारख्या वस्तू रुग्णाच्या नाकाला हुंगायला लावू नका.
फिट यावर घरगुती उपाय
डॉक्टरांनी दिलेली औषधे नियमित घ्यावीत. व डॉक्टरांकडून तपासणी करून घ्यावी.
पुरेशी झोप घ्यावी.
मनशांत ठेवण्यासाठी योगा, प्राणायाम, ध्यानधारणा करावे.
नियमित व्यायाम करावा.
चहा, कॉफी, सिगारेट, बीडी, तंबाखू आणि अल्कोहोल यांचे सेवन करणे टाळा.
रुग्णाने आपल्या खिशामध्ये आपले नाव, पत्ता, घरातील फोननंबर आणि अपस्मार रुग्ण असल्यासंबंधी माहिती लिहिलेली चिट्टी ठेवावी. या चिट्टीमध्ये फेफरे आल्यास आजूबाजूच्या लोकांनी काय करावे याविषयी ही माहिती लिहिलेली असावी.