मागच्या दीड वर्षभरात कोरोना संक्रमणाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे जास्तीत जास्त लोक वर्क फ्रॉम होम करत आहेत. घरून काम केल्यानं स्क्रिन टाईम आधीच्या तुलनेत आता जास्त वाढला आहे. याव्यतिरिक्त बॅक-टू-बॅक मीटिंग्स, वर्क कॉल्स, गाणी ऐकण्याासाठी लोक आधीपेक्षा जास्त ईअरफोन्सचा वापर करत आहेत. तुम्हीसुद्धा ईअरफोन्ससारख्या उपकरणांचा उपयोग जास्त प्रमाणात करत असाल तर वेळीच सावध व्हायला हवं. कारण ही उपकरणं गंभीर समस्यांचे कारण ठरू शकते.
आरोग्यतज्ज्ञ सांगतात की, ''मागच्या एका वर्षात लोकांमध्ये कानाचं संक्रमण आणि खाजेची समस्या, बहिरेपणा या तक्रारींमध्ये वाढ झाली आहे. ईअरफोन्सचा वापर हे या समस्यांचे मुळ कारण असल्याचं सांगितलं जात आहे. ईअरफोन्सच्या जास्त वापरानं कमी वयातील लोकांना कानाच्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. सगळ्यांनीच याबाबत गांभिर्यानं विचार करणं गरजेचं आहे. ''
डॉक्टर म्हणतात, ''पूर्वी फक्त किशोरवयीन आणि तरुण लोक मनोरंजनासाठी ईअरफोन्स वापरत असत. आता लहान मुलं आणि वृद्धांनाही याची सवय झाली आहे. अशा उपकरणांमुळे कानांना गंभीर नुकसान होत आहे, ज्यामुळे लहान वयातच लोकांची श्रवणशक्ती कमी होते आणि बहिरेपणा देखील येतो. मोठ्या आवाजातील इअरफोनचा दीर्घकाळ वापर केल्यामुळे लोकांमध्ये कानांशी संबंधित समस्या वेगाने वाढत आहेत.''
ईअरफोन्सचा वापर करताना आवाज किती असावा?
तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार जागतिक आरोग्य संघटना ध्वनी नियंत्रणासाठी लोकांना आवाहन करत आहे. डब्ल्यूएचओच्या शिफारसीनुसार ईअरफोन्ससारख्या उपकरणांचा आवाज नियंत्रणात ठेवणं महत्वाचं आहे. ९० डिबीपेक्षा जास्त आवाज, लॉनमध्ये गवत कापण्याच्या मशिनच्या आवाजाप्रमाणे असतो. सतत असा आवाज कानावर पडणं कानांच्या पडद्यांसाठी नुकसानकराक ठरू शकतं. डब्ल्यूएचओनुसार या उपकरणांच्या आवाजाचा स्तर ८० ते ९० डीबी यामध्ये असायला हवा. १०० डीबीपेक्षा जास्त आवाज कानाचे गंभीर आजार निर्माण करू शकतो.
सावधगिरीनं वापर करायला हवा
ईयरफोनमुळे कानाला होणारे नुकसान सावधगिरी बाळगून कमी केले जाऊ शकते. सर्वप्रथम, हे लक्षात ठेवा की ईयरफोनचा आवाज जास्त जोरात नसावा किंवा तो बराच काळ चालू ठेवू नये. ईयरफोनचा रबर अल्कोहोल लिक्विडने स्वच्छ करा आणि वापरण्यापूर्वी सुकवा. जर कानात खाज येत असेल तर बाहेरील भागावर नारळाचे तेल लावा, यावेळी जास्त घासू नका.
आरोग्य तज्ञांचे म्हणणे आहे की, ईयरफोनचा कमीतकमी वापर करा. जर तुम्हाला त्याची खूप गरज असेल तर इअर-प्लगऐवजी ओव्हर-द-हेड इयरफोन वापरणे चांगले. यामुळे, कोरडेपणा आणि कान खाजवण्याच्या समस्येसह संसर्गाचा धोकाही कमी होऊ शकतो. चांगल्या दर्जाचे ईयरफोन वापरणे फायद्याचे ठरेल. ईयरफोनच्या आकारामुळे किंवा आवाजामुळे कान दुखत असेल तर ते त्वरित काढून टाका. कानांच्या स्वच्छतेची विशेष काळजी घ्या.