हृदय विकाराच्या झटक्याने सिद्धार्थ शुक्लाचा झालेला मृत्यू ही खरोखरच चटका लावणारी बाब आहे. अवघा देश या घटनेने हादरला आहे आणि यानिमित्ताने पुन्हा एकदा हृदय विकाराचा तरूणांना असलेला धोका ही बाब अधोरेखित झाली आहे. एवढे फिट असतानाही हृदयविकार कसा होऊ शकतो, हा प्रश्न सगळ्यांनाच अस्वस्थ करत आहे. सिद्धार्थ प्रमाणेच आपल्या आजूबाजूला तरूण वयात हार्टअटॅक येऊन मृत्यू झाल्याची अनेक उदाहरणे सापडतात. तरूण वयात असलेला हृदयविकार कसा ओळखायचा? कोणती आहेत त्याची लक्षणं?
कसा येतो हार्टअटॅक?
हृदयाजवळ असणाऱ्या कोरोनरी धमन्यांच्या आतील बाजूला दिवसेंदिवस चरबी साचत जाते. चरबी साचून साचून आपली कोरोनरी धमनी अतिशय अरूंद होत जाते आणि त्यातून मग योग्य प्रमाणात रक्त प्रवाहित होऊ शकत नाही. याचा परिणाम म्हणजे हृदयाला हवे तेवढे रक्त मिळत नाही. त्यामुे हृदयाच्या कामाचा वेग कमी- कमी होत जातो. जेव्हा चरबी साचण्याचे प्रमाण ६० ते ८० टक्के एवढे वाढते, तेव्हा हार्ट अटॅक येण्याचा धोका जबरदस्त वाढलेला असतो. त्यामुळे धूम्रपान, मधुमेह, उच्च रक्तदाब, लठ्ठपणा आणि हार्ट अटॅक येण्याची अनुवंशिकता ज्यांच्या घरात आहे, अशा तरूणांनी वेळीच सावध झाले पाहिजे.
या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका
हार्ट अटॅक काही अचानक येत नाही.हार्ट अटॅक येण्याआधी आपले शरीर आपल्याला काही सूचना देत असते. पण आपण या सूचनांकडे दुर्लक्ष करतो. त्यामुळे जर तुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबातील व्यक्तींना, मित्र- मैत्रिणींना अशी काही लक्षणे जाणवत असतील, तर त्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका.
१. हाताला किंवा टाचेला सूज येणे
जर एखाद्या व्यक्तीच्या तळहाताला किंवा तळपायाला, टाचेला वारंवार सूज येत असेल, तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. हृदयविकार असण्याचे हे एक लक्षण आहे.
२. घाम येणे
ज्या व्यक्तींना एरवी कधीही खूप घाम येत नाही, अशा व्यक्तींना जर अचानक खूप घाम येऊ लागला असेल, थंड तापमानातही डोक्यावर घर्मबिंदू दिसत असतील, तर तात्काळ हृदयरोग तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
३. जबडा किंवा दात दुखणे
जबडा, दात यांचा हृदयविकाराशी काय संबंध असेल, असे आपल्याला वाटते. पण अनेक रूग्णांना हृदयविकाराचा झटका येण्यापुर्वी अशी लक्षणे जाणवली आहेत.
४. डोकेदुखी, मळमळ
या लक्षणांद्वारेही आपल्याला हृदयविकाराचे संकेत मिळू शकतात. डोकेदुखी आणि मळमळ ही खूपच सर्वसामान्य लक्षणे आहेत. त्यामुळे प्रत्येकवेळी ते हृदयविकाराचे कारण असू शकत नाहीत. पण बऱ्याच रूग्णांना हा त्रास जाणवला असून अनेकजण त्याकडे ॲसिडिटी झाली असावी, असे समजून दुर्लक्ष करतात.
५. धाप लागणे
व्यवस्थित श्वासोच्छवास न घेता येणे, जोरजोरात श्वास घ्यावा लागणे, धाप लागणे हे हृदयविकाराचे लक्षण आहे. याशिवाय छातीत जळजळ होणे, छाती गच्च झाल्यासारखे, छातीवर ओझे ठेवल्यासारखे वाटणे, अशी लक्षणेही हृदयरोगाचे संकेत देत असतात.
महिलांमध्ये ही लक्षणेही दिसू शकतात
हृदयविकाराचा झटका येण्याआधी अनेक महिलांमध्ये ओटीपोटात प्रचंड वेदना आणि उलट्या असा त्रास दिसून आला आहे. त्यामुळे वरील लक्षणांसोबत जर असेही लक्षण जाणवत असेल, तर महिलांनी त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.