सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण नेहमीच तिच्या मानसिक आरोग्याबद्दल माध्यमांसमोर स्पष्ट बोलताना दिसते. दीपिकाने मानसिक आरोग्याच्या समस्यांविरुद्ध समाजातून निषिद्धता दूर करण्यासाठी आवाज उठवला असल्याचे आपल्याला सगळ्यांनाच माहित आहे. एका जुन्या मुलाखतीत दीपिका पदुकोण म्हणाली की, मानसिक आरोग्याच्या समस्या कोणालाही होऊ शकतात आणि लोक आपल्याला काय बोलतील या भीतीने ते कधीही लपवू नये. तसेच, मदतीसाठी तज्ज्ञाशी संपर्क साधण्यात कोणतीही लाज वाटू नये.
मानसिक आरोग्याबाबत अधिक जागरुकतेची गरज असल्याचे दीपिकाचे मत आहे. आजच्या काळात मानसिक आरोग्याबाबत खुली चर्चा व्हायला हवी आणि या संदर्भात अधिक जागरूकता निर्माण करण्याची गरज असल्याचे तिचे मत आहे. दीपिका पदुकोणच्या म्हणण्यानुसार, आता लोक मानसिक आरोग्याबद्दल उघडपणे बोलू लागले आहेत. आता ही पूर्वीसारखी खूपच भयंकर समस्या मानली जात नसून याबाबत अधिक जनजागृती करण्याची गरज आहे. दीपिका सोशल मीडियावर नैराश्य आणि मानसिक आरोग्याबाबत जागरूकता पसरवण्यासाठी काम करत असते. दीपिका पदुकोणने तिच्या इंस्टाग्रामवरुन एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये तिने लिहिले आहे - 'रीपीट आफ्टर मी : डिप्रेशनवर उपचार केले जाऊ शकतात. रीपीट आफ्टर मी : नैराश्याचा उपचार शक्य आहे. रीपीट आफ्टर मी : नैराश्य टाळता येऊ शकते'(Deepika Padukone's Tips On How You Can Tackle Depression).
नक्की काय उपाय करता येऊ शकतात?
१. आजूबाजूला शांततापूर्वक वातावरण तयार करा :- जर आपल्याला खुपच ताण किंवा स्ट्रेस वाटत असेल तर सर्वात आधी डोकं शांत ठेवा. आपले मन आणि मेंदू स्थिर राहण्यासाठी, आपल्या सभोवतालच्या गोष्टी आणि वातावरण देखील तितक्याच स्थिर आणि व्यवस्थित असणे फार महत्वाचे असते. तुमच्या सभोवतालच्या गोष्टी जेव्हा पसरलेल्या आणि विखुरलेल्या असतात तेव्हा मनही अस्ताव्यस्त असते. त्यामुळे आपल्या दैनंदिन कामात एक शिस्तबद्धता आणा. तसेच समोर येणाऱ्या गोष्टींचा विचार करुन चिडचिड करण्यापेक्षा शांत राहून विचार करा. ताण तणाव रहित जीवन जगण्यासाठी आजूबाजूला शांततापूर्वक वातावरण तयार करा.
२. डेली रुटीन व्यवस्थित फॉलो करा :- रोजची व्यग्र जीवनशैली तसेच कामाचा ताण - तणाव यामुळे जीवन खूप गुंतागुंतीचे बनले आहे. स्वतःला तणावमुक्त ठेवण्यासाठी असे डेली रुटीन फॉलो करा ज्यामुळे जे तुम्हांला आवडेल व तणावमुक्त ठेवेल.
३. आवडीचा छंद जोपासा :- तणावमुक्त जीवन जगण्यासाठी प्रत्येकाने आपल्या आवडीचा छंद जोपासला पाहिजे. आपण आपल्या आवडीचा छंद जोपासला की त्यात आपला दिवसभराचा वेळ कसा निघून जातो हे लक्षात येत नाही. त्यासाठी आपल्या आवडीच्या छंदात मन रमवण्यास सुरुवात करावी. जेणेकरुन आपल्याला रोजच्या डेली रुटीनपासून थोडा विरंगुळा मिळेल. आवडीचा छंद जोपासल्याने डेली रुटीनमध्ये आलेला एकसुरीपणा दूर होऊन काहीतरी वेगळं केल्याचा आनंद आपल्याला मिळेल. स्वयंपाक बनवून जर आपल्याला समाधान मिळत असेल तर आपला आवडता पदार्थ नक्की बनवा. दुसरीकडे, जर आपल्याला चित्रकलेची आवड असेल तर सुंदर चित्रेही काढा.
४. प्रियजनांशी संपर्कात रहा : - आपल्याला आवडत्या किंवा प्रिय व्यक्तींच्या कायम संपर्कात राहा. आपल्या मनातील विचार जवळच्या किंवा आवडत्या व्यक्तीला सांगून जर आपल्याला तणावमुक्त वाटत असेल तर जवळच्या व्यक्तींशी सतत बोलत राहा. दिवसांतील काही मोजके तास आपल्या आवडत्या व्यक्तींशी गप्पा मारण्यात घालवा, यामुळे आपल्याला तणावमुक्त होण्यास मदत होईल. तणावमुक्त आयुष्य जगण्यासाठी आपल्या प्रियजनांशी मनमोकळेपणाने संभाषण करणे अत्यंत महत्वाचे आहे.
५. निसर्गाशी नाळ जोडा :- आपल्या व्यस्त शेड्युलमधून थोडा वेळ काढून निसर्गासोबत वेळ घालवा. जर आपल्याला बागकामाची आवड असेल तर झाडे लावा आणि थोडा वेळ बागकाम करा. असे केल्याने आपण सकारात्मक उर्जेने परिपूर्ण रहाल आणि निसर्गाच्या मुळाशी आपली नाळ परत एकदा जोडली जाईल.
६. ध्यान आणि व्यायाम करा :- सकारात्मक ऊर्जेने परिपूर्ण राहण्यासाठी ध्यान आणि व्यायामाची मदत घ्या. आपल्या दैनंदिन जीवनात ध्यान आणि व्यायामाचा समावेश करण्याचा प्रयत्न करावा. ध्यान व व्यायाम केल्याने आपल्या शारीरिक व मानसिक आरोग्यावर खूप सकारात्मक परिणाम होतो.
७. आवडते संगीत ऐका :- दिवसभरातून किमान दोन वेळा तरी आपली आवडती गाणी ऐका. यामुळे आपला मूड फ्रेश राहील तसेच मानसिक आरोग्यही चांगले राहील.