दात किडणे (Dental decay) ही अतिशय सामान्य समस्या आहे. लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच कधी ना कधी दाताचे दुखणे मागे लागते. एकदा दात किडायला सुरुवात झाली कि त्याकडे वेळीच लक्ष दिले नाही तर त्याचा ठणका इतका वाढतो की आपल्याला काही सुचत नाही (Dental pain). दात किडतात म्हणून चॉकलेट कमी खावं, गोड कमी खावं, प्रत्येक खाण्यानंतर ब्रश करावा. यांसारख्या सामान्य सूचना आपल्याला माहित असतात. पण प्रत्यक्षात त्या कितपत फॉलो होतात हा प्रश्न आहे. गोड खायची इच्छा झाली की आपण भरपूर गोड खातो. काम करुन थकवा आला की चहा - कॉफी घेतो आणि चूळ पण न भरताच तसेच पुढच्या कामाला लागतो. रात्रीच्या वेळी तर आपण इतके थकलेलो असतो की ब्रश करायचे त्राणही अंगात नसते किंवा आपण त्याचा कंटाळा करतो. मग दात किडत जातात आणि नेमके काय करावे कळत नाही....पण वेळीच योग्य ती काळजी घेतली तर दातांच्या (Dental Health) किडण्यापासून, दुखण्यापासून (Cavity) आणि त्यावरच्या खर्चापासून तुम्ही स्वत:ला वाचवू शकता.
१. व्यसने
वेगवेगळ्या गोष्टींचा ताण आला की लोक दारु पिणे, स्मोकींग करणे यांसारख्या गोष्टी सुरू करतात. व्यसन करताना आपल्याला त्याचे दुष्परिणाम माहित असले तरी आपण त्याच्या इतके आहारी गेलेले असतो की त्यामुळे आपले शरीर, दात इतर अनेक अवयव खराब होत असून आपण त्याकडे पुरेसे लक्ष देत नाही. मात्र वेळीच व्यसनांपासून दूर राहिल्यास दात चांगले राहण्यास मदत होते.
२. जंक फूड आणि गोड पदार्थांचे सेवन
शहरी भागात आणि आता ग्रामीण भागातही जंक फूड खाण्याचे प्रमाण वाढले आहे. मसालेदार पदार्थ, तळलेले, चमचमीत, ब्रेडचे पदार्थ यांमुळे दातांच्या समस्यांमध्ये वाढ होते. याशिवाय सतत गोड खाणे, चहा-कॉफीचे अतिसेवन यामुळेही दाताच्या समस्या निर्माण होतात. त्यामुळे जंक फूड आणि अतिप्रमाणात गोड खाणे टाळायला हवे.
३. दातांच्या दुखण्याकडे दुर्लक्ष
दात किडताहेत असे वाटले किंवा दातांचे दुखणे सुरू झाले की लगेचच त्याकडे लक्ष द्यायला हवे. वेळीच योग्य ते उपचार केले तर भविष्यात कोणत्याही समस्या उद्भवणार नाहीत. मात्र वेळीच लक्ष दिले नाही तर दातांतील किड वाढते आणि मग त्यावर करावी लागणारे उपचार, त्याच खर्च सगळेच वाढत जाते. पण हा त्रास कमी असतानाच उपचार केले तर मात्र त्याचा नक्कीच चांगला उपयोग होऊ शकतो.
दातांना किडण्यापासून वाचवायचे असेल तर ५ उपाय
१. दिवसातून न चुकता २ वेळा ब्रश करायला हवा
२. ज्याठिकाणी ब्रश जाऊ शकत नाही अशाठिकाणी साफ करण्यासाठी फ्लॉसिंगचा आवर्जून वापर करा.
३. सतत गोड खाणे टाळा, स्टार्च असलेल्या पदार्थांमुळेही दात खराब होऊन किडू शकतात.
४. जीभ नियमितपणे साफ करा, त्यामुळे तोंडाचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होईल.
५. दातांच्या कोणत्याही समस्येकडे दुर्लक्ष करु नका, पुढे हे दुखणे वाढते. दर ६ महिन्यांनी नियमितपणे दातांची तपासणी करुन घ्या.