डायबिटीस हा स्लो पॉयझनिंग म्हणून ओळखला जाणारा आजार. एकदा डायबिटीस झाला की थेट आपल्या खाण्यापिण्यावरच बंधने येतात. हळूहळू अवयवांचे कार्य खराब करणारी ही समस्या एकदा उद्भवली की बरी होणे अवघडच. जीवनशैलीशी निगडीत असणारी ही समस्या चुकीचा आहार, ताणतणाव, अनुवंशिकता, व्यायामाचा अभाव यांमुळे उद्भवते. एकदा डायबिटीस मागे लागला की औषधोपचार, इन्शुलिन यांना पर्याय नसतो. मात्र तो होऊच नये आणि झाला तरी नियंत्रणात राहावा यासाठी आरोग्याकडे वेळीच लक्ष देणे आवश्यक आहे.
टाइप १ डायबिटीसचे प्रमाण गेल्या काही वर्षात वेगाने वाढते आहे. जगभरात टाइप १ डायबिटीस असणाऱ्यांमध्ये भारत दुसऱ्या स्थानावर असून या रुग्णांमध्ये मागच्या जवळपास ३५ वर्षांत १५० टक्क्यांनी वाढ झाली आहे. म्हणजेच सहा व्यक्तींपैकी एका व्यक्तीला डायबिटीस असल्याचे इंडियन काऊंसिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या (ICMR) सर्वेक्षणात स्पष्ट करण्यात आले आहे. गेल्या २ वर्षात कोविडवरील उपचारांचा साईड इफेक्ट म्हणून होणाऱ्या डायबिटीसच्या प्रमाणात वाढ झाली आहे. सुरुवातीला ठराविक वयानंतर होणारा टाईप २ डायबिटीस आता लहान मुलांमध्ये आणि तरुणांमध्ये वाढल्याचे दिसते. ही चिंतेची बाब असल्याचे ICMRचे म्हणणे आहे. गेल्या काही वर्षात २५ ते ३४ या तरुण वयोगटातील शहरी आणि ग्रामीण व्यक्तींना डायबिटीस होण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे.
टाईप १ डायबिटीस म्हणजे काय?
इन्शुलिनची कमतरता आणि हायपर ग्लायसेमिया यामुळे होणारा हा डायबिटीस साधारणपणे अनुवंशिक आहे. आईला असेल तर तो होण्याची शक्यता ३ टक्के असते, वडिलांना असेल तर ५ टक्के आणि बहिण-भावंडांना असेल तर ती ८ टक्क्यांपर्यंत वाढते. लहान मुलांमध्ये होणारा हा डायबिटीस आपल्या स्वादुपिंडातील इन्शुलिनची निर्मीती करण्याच्या कामात अडथळा आणतो. इन्शुलिनशिवाय रक्तातील साखर पेशींमध्ये जात नाही आणि त्यामुळे रक्तप्रवाहात अडथळे निर्माण होतात.
टाईप १ डायबिटीसवर उपाय काय?
१. आहार आणि व्यायाम
ICMR च्या म्हणण्यानुसार टाईप १ डायबिटीसमध्ये जीवनशैलीची अतिशय महत्त्वाची भूमिका असते. या व्यक्ती जे खातात त्याचे साखरेत रुपांतर होत असताना शरीरावर त्याचा काय परिणाम होतो हे पाहणे महत्त्वाचे असते. रक्तदाब, वजन, लिपीडची पातळी, अन्नातून शरीराला मिळणारे पोषण या सगळ्याचा या समस्येवर परिणाम होत असल्याने त्याकडे योग्य पद्धतीने लक्ष देणे आवश्यक असते. तसेच तब्येत चांगली ठेवायची असल्यास व्यायाम करणे अतिशय आवश्यक असून त्यामुळे लठ्ठपणा कमी होण्यास मदत होते.
२. इन्शुलिन थेरपी
टाईप १ डायबिटीस झालेल्या लहान मुलांना आणि तरुणांना लवकरच इन्शुलिन घ्यावे लागते. शरीरातील इन्शुलिनची पातळी योग्य नसल्याने शरीरावर त्याचे विपरित परिणाम होतात. मात्र इन्शुनिल घेतल्याने ही समस्या दूर होण्यास मदत होते. इन्शुलिन घेत असताना रुग्ण ते योग्य पद्धतीने घेत आहे की नाही हे पाहणे महत्त्वाचे असून वैद्यकीय तज्ज्ञांनी रुग्ण व त्याच्या नातेवाईकांना याबाबत योग्य ते प्रशिक्षण देणे आवश्यक आहे.
३. रक्तातील साखरेच्या प्रमाणाकडे लक्ष देणे
टाईप १ स्वरुपाचा डायबिटीस असणाऱ्यांनी आपल्या रक्तातील साखरेची पातळी वेळच्या वेळी तपासणे आवश्यक असते. त्यानुसार त्यांना वेळीच योग्य ते उपचार घेता येतात. अमेरिकन डायबिटीस असोसिएशनच्या म्हणण्यानुसार ज्यांना टाईप १ डायबिटीस आहे अशांनी शुगर लो होण्याचा त्रास असल्यास जेवणाच्या आधी, नाश्त्याच्या आधी, झोपायच्या आधी व्यायामाच्या आधी शुगरची पातळी तपासायला हवी. त्यामुळे त्यांना अचानक कोणताही त्रास होण्यापासून त्यांची सुटका होईल.