डॉ. देविका दामले
मधुमेह हा सायलेंट किलर म्हणून ओळखला जाणारा आजार आहे. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे डायबिटीस असणाऱ्या रुग्णांना डोळ्यांच्या समस्या उद्भवतात. यामध्ये रेटिनावर सूज येणे, डोळ्यांच्या आत रक्तस्त्राव होणे, पडदा आपल्या जागेवरून निसटणे यासारख्या समस्या उद्भवतात आणि नजर अधू होते. डोळ्यांच्या पुढे काळे ठिपके येणे, नजरेसमोर काही ठिपके फिरताना दिसणे, डोळ्यांपुढे मधेच उजेड चमकल्यासारखे वाटणे, नजरेपुढे पडदा आल्यासारखे वाटणे आणि अचानक नजर कमी होणे ही काही लक्षणे आहेत. मात्र अचानक डोळ्यांचा त्रास उद्भवला की नंतर गुंतागुंत वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे मधुमेहींनी डोळ्यांची वेळीच काळजी घ्यायला हवी (Diabetes and Eye Care Tips).
रक्तातील शुगर सतत वाढते? डोळे जपा, तज्ज्ञ सांगतात, डायबिटीक रेटीनोपॅथी होण्याचा धोका...
मधुमेही रुग्णांनी डोळ्यांची तपासणी कधी करावी ?
मधुमेहींना सुरुवातीला कुठलीही लक्षणे नसतात त्यामुळे काहीही त्रास जाणवत नाही. जेव्हा थोडी लक्षणे जाणवायला लागतात तोपर्यंत डोळ्यांचे बहुतांश नुकसान आधीच झालेले असते. म्हणूनच मधुमेहाला 'Silent killer'म्हणतात. त्यामुळे ज्या वेळी मधुमेहाचे निदान होईल त्यावेळीच आपल्या रेटिनाची तपासणी करून घेणे अतिशय गरजेचे आहे. ज्या रुग्णांना डोळ्याचा कोणताही त्रास उद्भवलेला नाही अशांनी दर वर्षांतून एकदा तरी डोळ्यांची तपासणी करून घेणे गरजेचे आहे.
डोळ्यांमधे इंजेक्शन का दिले जाते?
ज्या मधुमेही रुग्णांमध्ये मॅक्युला म्हणजेच रेटिनाच्या केंद्रबिंदूवर सूज आढळून येते अशांना ही सूज कमी करण्यासाठी इंजेक्शनद्वारे डोळ्यांच्या आतल्या भागात औषध सोडले जाते.
डायबिटीसमुळे वाढतात डोळ्यांच्या समस्या, वेळीच काळजी घ्या, नाहीतर..तज्ज्ञांचा मोलाचा सल्ला
रेटिनाचे ऑपरेशन कधी करावे लागते?
जेव्हा रेटिना आपल्या जागेवरून निसटला जातो तेव्हा तो परत जोडण्यासाठी ऑपरेशन करणे हा उपाय असतो. तसेच डोळ्याच्या आत काही रक्तस्राव प्रदीर्घ कालावधीपर्यंत साचून राहिला असेल तर तो ऑपरेशन करून साफ करावा लागू शकतो.
डायबेटिक रेटिनोपथी टाळण्यासाठी उपाययोजना
लवकर रोगाचे निदान होणे आणि त्याचे योग्य ते उपचार घेणे हा डायबेटिक रेटिनोपधीमुळे अंधत्व टाळण्यासाठी महत्त्वाचा उपाय आहे. म्हणून मधुमेहींनी आपल्या मधुमेहाचे निदान झाल्यावर लगेच डोळ्यांची तपासणी करून घेणे व पुढेही नेत्ररोगतज्ज्ञ सांगतील त्याप्रमाणे नियमितपणे डोळ्यांची तपासणी करून घेणे गरजेचे आहे. मला काहीच त्रास होत नाही तर मी उगाच तपासणी का करून घेऊ' हा विचार टाळा. आपली रक्तशर्करेची पातळी, आहार व औषधांचे पथ्य तज्ज्ञांच्या सल्यानुसार व्यवस्थित पाळा. आपले ब्लडप्रेशर, कोलेस्टेरॉल पातळी नियमित तपासून नियंत्रणात ठेवा. व्यसने न करणे, शक्य तितका व्यायाम नियमितपणे करणे आणि उत्तम जीवनशैली हाच रेटिनोपथी टाळण्याचा खरा कानमंत्र आहे.
लेखिका नेत्रतज्ज्ञ आहेत.
devikadamle@gmail.com