डायबिटीसला आपण अनेकदा आजार म्हणून संबोधतो. पण हा आजार नसून ती जीवनशैलीविषयक एक समस्या आहे. गेल्या काही वर्षात डायबिटीसचे प्रमाण वेगाने वाढत असल्याने घरोघरी या समस्येने ग्रासलेल्या व्यक्ती आपण आजुबाजूला पाहतो. अनुवंशिकता, चुकीची जीवनशैली, आहाराच्या चुकीच्या पद्धती, ताणतणाव यांसारख्या विविध गोष्टींमुळे डायबिटीसची समस्या उद्भवते. एकदा डायबिटीस झाला की तो नियंत्रणात ठेवण्याशिवाय आपल्याकडे दुसरा कोणताच पर्याय नसतो. कारण शुगर वाढली तर त्याचा शरीराच्या विविध अवयवांवर परिणाम होतो. हे जास्त प्रमाणात झाले तर अवयव निकामी होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. स्लो पॉयझनिंग म्हणून ओळखली जाणारी ही समस्या एकदा मागे लागली की लागली (How Does lifestyle affect Diabetes). एकदा डायबिटीस झाला की थेट आपल्या खाण्यापिण्यावरच बंधने येतात. औषधोपचार, इन्शुलिन घेणे, आहार, व्यायाम यांकडे योग्य पद्धतीने लक्ष न दिल्यास समस्या दिवसेंदिवस वाढत जातात. मात्र कुटुंबात डायबिटीसचा इतिहास असेल तर आपण सुरुवातीपासूनच योग्य ती काळजी घेतलेली केव्हाही चांगली. डायबिटीसची औषधोपचार करुनही काही सवयी बदलल्या नाहीत तर मात्र औषधांचा काहीच उपयोग होत नाही. पाहूया या सवयी कोणत्या (one should change 5 habits for Diabetes Control) ...
१. व्यायाम
ज्यांना बऱ्याच वर्षांपासून डायबिटीस आहे अशांनी नियमितपणे व्यायाम करणे आवश्यक आहे. हा व्यायाम खूप कष्टाचा नसला तरी तो मध्यम तीव्रतेचा आणि ४० ते ४५ मिनीटांचा असेल याची काळजी घ्यायला हवी. चालणे, सायकलिंग, स्विमिंग, दोरीच्या उड्या, जॉगिंग अशा कोणत्याही प्रकारचा आपल्याला सोयीचा असेल असा व्यायाम न चुकता करायला हवा. यामुळे आपली रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहण्यास निश्चित मदत होईल.
२. वजन नियंत्रणात ठेवणे
वजन ही अनेक आजारांसाठी एक महत्त्वाची समस्या मानली जाते. त्यामुळे वजन नियंत्रणात असणे केव्हाही फायद्याचेच ठरते. वजन कमी करण्यासाठी योग्य आहार घेणे, व्यायाम करणे आणि ताणतणावांपासून दूर राहणे यांची आवश्यकता असते. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी या गोष्टींची योग्य ती काळजी घ्यायला हवी.
३. जास्तीत जास्त भाज्या खाणे
पालेभाज्यांमध्ये व्हिटॅमिन, खनिजे आणि कार्बोहायड्रेटस मोठ्या प्रमाणात असतात. कार्बोहायड्रेटसमध्ये असणारी शुगर आणि स्टार्च आपल्या शरीराला ऊर्जा देण्यासाठी आणि फायबरचा पुरवठा करण्यासाठी उत्तम स्त्रोत असतात. फायबर असणारे पदार्थ खाल्ल्यास वजन कमी होण्यास मदत तर होतेच याशिवाय मधुमेहाची समस्या कमी करण्यासाठीही याचा चांगला उपयोग होतो. टोमॅटो, मिरची, पालेभाज्या, फळभाज्या, ब्रोकोली, बिन्स, छोले, डाळी यांचा आहारात समावेश हवा.
४. आहारात हेल्दी फॅटस घेणे
चरबीयुक्त पदार्थांमध्ये कॅलरीज जास्त असतात त्यामुळे हे पदार्थ कमी प्रमाणात खायला हवेत. वजन कमी करण्यासाठी आणि नियंत्रणात ठेवण्यासाठी आपल्या आहारात असंतृप्त चरबी असलेले विविध प्रकारचे पदार्थ असायला हवेत. मोनोसॅच्युरेटेड आणि पॉलीसॅच्युरेटेड फॅटस दोन्ही हेल्दी कोलेस्टेरॉलचा स्तर आणि हृदयाचे आरोग्य यांच्यासाठी आवश्यक असतात. यासाठी आहारात सूर्यफूल, करडई, शेंगादाणे, बदाम, फ्लेक्ससीडस, भोपळ्याच्या बिया यांचे तेल घ्यायला हवे. त्याशिवाय सॅलमन, ट्यूना, कॉर्ड यांसारख्या माशांचाही आहारात समावेश हवा.
५. ताण न घेणे
मधुमेह असलेल्या व्यक्तींनी कोणत्याही गोष्टीचा ताण घेऊ नये. तणावामुळे रक्तदाब वाढतो, तसेच तणावामुळे रक्तातील साखरेची पातळीही वाढते. त्यामुळे जास्ती ताण घेतला तर त्याचा थेट आपल्या हृदयावर आणि मेंदूवर परीणाम होतो. ताण येऊ नये यासाठी रोज ८ तासांची झोप, आपल्या आवडीचे संगीत ऐकणे, चित्रपट पाहणे, मनोरंजनात्मक कार्यक्रम पाहणे, आपल्या आवडत्या व्यक्तींबरोबर वेळ घालवणे या गोष्टी आवर्जून करायला हव्यात.