डायबिटीस हा असा आजार आहे की जो एकदा झाला की मरेपर्यंत आपल्यासोबत राहतो. इतकेच नाही तर डायबिटीसमुळे हळूहळू शरीराच्या विविध अवयवांवर परीणाम व्हायला सुरुवात होते आणि अवयव निकामी होण्याचीही शक्यता असते. डायबिटीस हा आजार नसून ती एक जीवनशैलीविषयक समस्या आहे. हल्ली साधारणपणे प्रत्येक कुटुंबात एक किंवा २ व्यक्तींना डायबिटीस असणे अतिशय सामान्य आहे. अनेकदा डायबिटीस झाला हे लक्षातच येत नाही आणि मग एकाएकी कधीतरी आपल्याला ही समस्या असल्याचे कळते मात्र तेव्हा खूप उशीर झालेला असतो. आपले शरीर आपल्याला काही लक्षणे दाखवत असते, मात्र आपण त्याकडे पुरेसे लक्ष न देता कानाडोळा करतो. त्यामुळे ही समस्या वेळीच लक्षात येत नाही आणि गुंतागुंत वाढत जाते. पाहूया डायबिटीसचे संकेत देणारे ५ अवयव (Diabetes Symptoms 5 Body Parts that can Signal High Blood Sugar)...
१. डोळे
डायबिटीस झाल्यावर त्याचा डोळ्यांवर सगळ्यात आधी परिणाम होतो. धुसर दिसणे, मोतीबिंदू, रेटीनाशी निगडीत समस्या उद्भवतात. इतकेच नाही तर रक्तातील साखर प्रमाणापेक्षा जास्त वाढली तर दृष्टी जाण्याचीही शक्यता असते.
२. पाय
काहीवेळा पायाच्या नसा खराब होतात, ज्यामुळे पायाचे सेन्सेशन जाण्याची शक्यता असते. काहीवेळा शुगर वाढली तर पायाच्या दिशेने रक्तपुरवठा कमी होतो आणि त्यामुळे पायाला काही जखम किंवा दुखापत झाली तर ती बरी होण्यास बराच वेळ लागतो.
३. किडनी
किडनी हा शरीरातील अतिशय महत्त्वाचा अवयव असून शरीरातील अनावश्यक घटक बाहेर फेकण्याचे काम किडनीद्वारे केले जाते. रक्तातील साखर बेरच दिवस लक्षात आली नाही आणि ती वाढत राहीली तर किडनीच्या कार्यात अडथळे निर्माण होतात. प्रसंगी किडनी निकामी होण्याचीही शक्यता असते.
४. नसा
डायबिटीस नियंत्रणाबाहेर असेल तर त्याचा नसांवरही परीणाम होतो. नसा खराब झाल्यामुळे काहीवेळा त्यांना बधीरपणा येतो तर काही वेळा खूप जास्त प्रमाणात दाह होतो. यामुळे नसांशी निगडीत विविध प्रकारच्या समस्या भेडसावतात.
५. हिरड्या
रक्तातील साखरेचे प्रमाण वाढले तर हिरड्यांनाही त्रास होण्याची शक्यता असते. हिरड्यांना होणारा रक्तप्रवाह कमी झाल्याने त्याच्याशी निगडीत समस्या उद्भवतात. शुगरमुळे बॅक्टेरीयाची वाढ होते आणि हिरड्यांचे त्रास सुरू होतात. हिरड्यांतून रक्त येणे, दुखणे असे त्रास उद्भवतात.